Jump to content

महादेव डोंगररांगा

  महादेव डोंगररांगा

देशभारत
राज्यमहाराष्ट्र
महादेव डोंगररांगा

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख डोंगररांग. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर सह्याद्री ही प्रमुख पर्वतश्रेणी उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली आहे. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून अनेक फाटे पूर्व किंवा आग्नेय दिशेत विस्तारलेले आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट आणि महादेव या नावांनी हे फाटे ओळखले जातात. त्यांपैकी सर्वांत दक्षिणेकडील, सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील फाटा म्हणजेच महादेव डोंगररांग होय. या डोंगररांगेला शंभू महादेवाचे डोंगर असेही संबोधले जाते. या डोंगररांगेत सलग श्रेणीबरोबरच  अनेक लहान लहान डोंगररांगा किंवा फाटे, अनेक एकाकी टेकड्या किंवा टेकाडे (Knolls) आढळतात. या डोंगररांगा बऱ्याच विदारित स्वरूपाच्या आहेत.[]

भौगोलिक रचना:

सातारा जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यात व महाबळेश्वरच्या उत्तरेस सुमारे १६ किमी. वर या फाट्याचा प्रारंभ होतो. प्रथमत: हा फाटा पश्चिम-पूर्व दिशेत विस्तारलेला आहे. त्यानंतर ही डोंगररांग आग्नेयीस आणि दक्षिणेस गेलेली आहे. महादेव डोंगररांगा बऱ्याच मोठ्या, उघड्या व खडकाळ असून त्यांमध्ये अनेक ठिकाणी काळ्या कातळातील उभे कडे आढळतात. महादेव श्रेणीची प्रारंभीची सुमारे ४८ किमी.पर्यंतची म्हणजेच खंबाटकी घाटाच्या पुढे काही अंतरापर्यंतची दिशा पश्चिम-पूर्व अशी आहे. ही महादेव श्रेणीमधील मुख्य डोंगररांग आहे. येथपर्यंतची डोंगररांग सातारा जिल्ह्यातील वाई व खंडाळा या दोन तालुक्यांच्या सीमेवरून जात असल्यामुळे उत्तरेकडील नीरा नदीचे खोरे दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे. येथील डोंगररांगेची सस. पासूनची सर्वसाधारण उंची सुमारे १,२०० मी. दरम्यान आहे. येथे तिचा उत्तरेकडील नीरा नदीच्या खोऱ्याकडील उतार तीव्र स्वरूपाचा असून दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या खोऱ्याकडील उतार तुलनेने बराच कमी आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यानच्या या रांगेत केंजळगड किंवा घेरा-केळंजा (१,३०१ मी.), येरूळी किंवा वेरूळी (१,३८१ मी.), पांडवगड (१,२७३ मी.), मांढरदेव (१,३७५ मी.), बालेघर, धामणा, हरळी हे प्रमुख डोंगर आहेत. त्यांपैकी केंजळगड व पांडवगड हे दोन किल्ले आहेत. वाई नगरीपासून वायव्येस सुमारे १८ किमी., तर महाबळेश्वरपासून ईशान्येस सुमारे २२ किमी.वर केंजळगड आणि वाईच्या उत्तरेस पाच किमी. वर पांडवगड आहे. वाईच्याच उत्तरेस २० किमी.वर मांढरदेव हे धार्मिक ठिकाण या डोंगरावर असून तेथील काळूबाई मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे भरणाऱ्या यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. येथील वेरूळी पठाराजवळून महादेव डोंगराचा एक फाटा उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील नीरा नदीकडे विस्तारलेला आहे.

किल्ले:

कोरेगाव-खटाव या तालुक्यांच्या सीमेवर, या डोंगररांगेच्या एका सोंडेवर वर्धनगड (१,०६७ मी.) किल्ला आहे. वर्धनगड डोंगररांगेमुळे कृष्णेच्या वसना-वंगना आणि येरळा या उपनद्यांची खोरी अलग झाली आहेत. वर्धनगड फाट्यास जेथून सुरुवात होते, त्याच्या पूर्वेस १४ किमी.वर महिमानगड डोंगररांग सुरू होते. हिचा विस्तार आग्नेयीस सांगली जिल्ह्यातील खानापूरपर्यंत झाला आहे. या डोंगररांगेत महिमानगड (९८१  मी.) हा किल्ला आहे. या रांगेमुळे येरळा व माण (माणगंगा) या नद्यांची खोरी अलग झाली आहेत. दक्षिणेकडे विस्तारलेल्या महादेव डोंगररांगेच्या सोंडीवर संतोषगड (ताथवडा) व वारूगड हे दोन किल्ले आहेत. कोरेगाव तालुक्यातील महादेव डोंगररांगेच्या फाट्यांमध्ये हर्णेश्वर, चवणेश्वर, जरंडा, नांदगिरी व चंदन या पाच टेकड्या असून त्यांतील नांदगिरी किंवा कल्याणगड, चंदन व जरंडा हे डोंगरी किल्ले आहेत. कराड शहराजवळील सदाशिवगड किल्ला हा महादेव डोंगररांगेच्या फाट्यावर आहे. शिखर शिंगणापूर हे धार्मिक ठिकाणही महादेव डोंगररांगेच्याच एका फाट्यावर आहे.

नद्या:

सह्याद्रीच्या इतर डोंगररांगांप्रमाणेच महादेव डोंगररांगांनीही सातारा जिल्ह्यातील प्रमुख नदीप्रणाली घेरल्या आहेत. कृष्णा नदीच्या काही उपनद्यांचे शीर्षप्रवाह या डोंगररांगेत उगम पावले आहेत. वसना ही कृष्णेची डाव्या तीरावरील उपनदी कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावाजवळ उगम पावते. माण ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावते. आग्नेय दिशेत वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगरात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून दक्षिणेस वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात कृष्णेला मिळते.

प्राणिजगत:

सह्याद्रीतील प्रारंभापासून ते खंबाटकी घाटापर्यंतच्या डोंगररांगेत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या भागात बऱ्यापैकी दाट अरण्ये आढळतात. त्यामध्ये रानडुक्कर, तरस, कोल्हा, लांडगा इत्यादी प्राणि, तर मोर व इतर पक्षी आढळतात.

शंभू महादेव रंगाचे उप शाखा

उपरांगा ठिकाण

  1. बामणोली डोंगर सातारा
  2. आगाशिव डोंगर सातारा -कऱ्हाड
  3. सीताबाई डोंगर सातारा
  4. औध पठार मध्य भागत
  5. खानापूरचे पठार दक्षिणेला
  6. सासवड पठार (उंची ८०० m ) उत्तरेला (पुणे)
  7. जतचे पठार (उंची ७०० m ) सांगली

मुख्य डोंगररांगेच्या आग्नेयीकडे आणि दक्षिणेकडे गेलेल्या फाट्यांवर अनेक ठिकाणी पवनचक्क्या उभारलेल्या आहेत.

  1. ^ "https://marathivishwakosh.org/43244/". External link in |title= (सहाय्य)