मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.[१] कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे.[२][३] मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.
मराठी राजभाषा दिवस
अनेक वेळा सर्व सामान्य माणसाकडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन १९६५ पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंंतराव नाईक सरकारने केला. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.[४][५]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2024-02-26). "मराठी भाषा गौरव दिवस अन् मराठी राजभाषा दिनात गल्लत करू नका, आधी इतिहास समजून घ्या!". marathi.abplive.com. 2024-02-27 रोजी पाहिले.
- ^ "मराठी भाषा गौरव दिन शासन निर्णय" (PDF). maharashtra.gov.in/. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "esakal | मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको |". www.esakal.com. 2021-11-01 रोजी पाहिले.
- ^ "मराठी राजभाषा अधिनियम 1964" (PDF). directorate.marathi.gov.in. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "esakal | मराठी राजभाषा, मराठी गौरव दिनाची गल्लत नको |". www.esakal.com. 2021-11-01 रोजी पाहिले.