मराठी भाषा
मराठी भाषा | |
---|---|
मराठी | |
"मराठी" - देवनागरी आणि मोडी लिपीमध्ये | |
प्रदेश | महाराष्ट्र, गोवा, काही प्रमाणात- गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली |
लोकसंख्या | १३ कोटी |
क्रम | ९ |
बोलीभाषा | कोळी, आगरी, माणदेशी, वऱ्हाडी, तंजावर मराठी, कुणबी, महाराष्ट्रीय कोंकणी |
भाषाकुळ | इंडो-युरोपीय इंडो-आर्य
|
लिपी | देवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची) |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | भारत राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | mar |
ISO ६३९-२ | mr |
मराठी भाषा बोलली जाणारा प्रदेश लाल रंगात दर्शविलेला आहे |
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे.[१]
मराठी भाषा भाषिक प्रदेश
मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या संघराज्यशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ९ राज्ये, ४ संघराज्यशासित प्रदेश आणि ११३ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.
मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[२] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[३]
राजभाषा
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे.महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात नियमानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली[४] या संघराज्यशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी)[५], महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे)[६], उस्मानिया विद्यापीठ (तेलंगणा), गुलबर्गा विद्यापीठ[७], देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)[८] व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)[९] येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
प्रमाणभाषा
प्रमाणभाषा ही एक बोली भाषाच असते. तथापि त्याचे नियम पक्के बांधलेले आणि मान्यताप्राप्त असतात. यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे लेखन केले जाते आणि त्यामुळे भाषा वाढीस त्याचा उपयोग होतो. यास मानक भाषा अथवा प्रमाण भाषा असेही म्हंटले जाते. भाषेचे मानकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. भाषा प्रमाणीकरण प्रक्रिया स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जावे लागतात. मानक भाषा हा समाजात वापरल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित संप्रेषणांमध्ये व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या परंपरांचा संग्रह असतो. मराठी साहित्य महामंडळाने पाठवलेल्या लेखनविषयक नियमांची यादी इ.स. १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केली. त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि ते त्वरित अंमलात आणावेत, असा शासकीय आदेश काढला आहे. मराठी भाषेमध्ये त्या नियमांनुसार मानक भाषा मराठीचे लेखन केले जाते.[१०] औपचारिक लेखन करतांना मराठी प्रमाणभाषा वापरली जाते. औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक असते. औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या सूचना फलक, वर्तमानपत्र बातम्या, संपादकीय, मासिकातील लेख, शासकीय पत्रव्यवहार इत्यादी लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे.[११] याशिवाय व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये प्रमाणभाषेचाच वापर केला गेला जातो. प्रमाण भाषा म्हणजे एकसारखी भाषा वापरल्याने भाषेला स्थिरता येते.
प्रमाणभाषा महत्त्व आणि उपयोग
एका प्रकारे लिहिलेल्या भाषेला संगणकीकृत शोध घेतांना प्रमाणभाषा वापरलेली असेल तर त्याचा उपयोग होतो आणि योग्य ते लेखन शोधयंत्रास सापडते. अन्यथा प्रत्येक वेळी निराळा शोध देत बसावे लागेल आणि इतके करूनही सर्व माहिती मिळाली असे म्हणता येणार नाही. तसेच नियम विषयक लेखन करतांना एकाच प्रकारच्या भाषेमध्ये करणे आवश्यक आहे. अन्यथा नियमाचा अर्थ लावणे अशक्य होईल. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही निदान करणे अवघड होईल. कारण एकाच रोगासाठी वैद्य/डॉक्टर अनेक शब्द वापरू लागले तर रुग्णास नक्की काय होते आहे याचे निदान करून त्याची औषधे मिळवणे शक्य होणार नाही. यामुळे मानक भाषेचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. एकच भाषा वापरल्याने सामायिक मराठी संस्कृती स्थापित होते आणि आम्ही मराठी आहोत असे म्हणत येते. असा भाषेचा उपयोग चीनमध्ये झालेला दिसून येतो. चीन मध्ये अनेक बोली भाषा होत्या पण एकच प्रमाणित चीनी भाषा ही मानक भाषा म्हणून लागू केल्याने सर्व चीनी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसेच इस्राएल देशा मध्ये हिब्रू भाषा संवर्धनात मानक भाषा वापरल्याने हिब्रू भाषा समर्थ झाली आणि आज एकेकाळी मृत झालेलेल्या भाषेत आज शास्त्रीय संशोधने प्रकाशित होत आहेत. याच प्रमाणे मराठी भाषेत लेखन करतांना अथवा संशोधन निबंध प्रकाशित करण्यासाठी व्याकरणाचे शासकीय नियम असलेली मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे.
मराठी भाषा दिवस
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी पुस्तके
'लीळाचरित्र' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि शासकीय प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. शासकीय संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारताच्या सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे[ संदर्भ हवा ], आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे[ संदर्भ हवा ]. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत[ संदर्भ हवा ].
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे) वाङ्मयकोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्रीधर व्यंकटेश केतकर), असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो[ संदर्भ हवा ].
पुरस्कार
- विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
- 'मूर्तिदेवी पुरस्कार' शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
- महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना 'सरस्वती सन्मान' मिळाले आहेत.
- विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना 'कालिदास सन्मान' मिळाले आहेत.
- महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांचा नावाने 'अखिल भारतीय कला सन्मान' दिला जातो.
- भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर बालगंधर्वना मिळाले आहेत.
- सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ आचार्य अत्रे यांच्या ''श्यामची आई'’ चित्रपटास मिळाले होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, भीमसेन जोशी, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे आणि लता मंगेशकर हे आजवरचे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.
- भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. नव्या संशोधनानुसार मराठी अन् प्राकृत ह्या एकच भाषा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. सदर महाराष्ट्र शासनाच्या संशोधन अभिजात मराठी प्रतिवृत्ताने केले आहे. ज्ञात इतिहासावर पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.
मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण [१२] आदि ग्रंथांची भर घातली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा राजव्यवहारकोश तयार करून घेतला. आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. तत्कालीन भारतावर (आताचा पाकिस्तान, इंडिया आणि बांग्लादेश) राज्य करतांना देखील मराठीचा अधिकृत भाषा म्हणून वापर होत असे. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत/ इंडिया देशाने मराठीला अधिकृत भाषेचं पद दिलं. इ.स. १९६०[१३] मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे [ संदर्भ हवा ]. अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ.स. १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे -
गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री-
वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने । सकु संवतु : ९३४ प्रधा-
वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-
लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ
कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
मीची वआण । लुनया कचली ज
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
अर्थ : "जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले." लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।' कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.
मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे २५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाळ
हा काळ इ.स. १२०० पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.
हा काळ इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीचा यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङ्मयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यानी समृद्ध केले.
बहामनी आणि सल्तनत काळ
हा लेख बघा:मराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी काळ सुरू झ़ाला. सल्तनत काळात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. राज्यकर्ते मुस्लिम असले तरी स्थानिक सरंजामदार, जमीनदार,महसूल गोळा करणारे अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती. प्रशासन आणि महसूल संकलन सुलभ करण्यासाठी, सुलतानांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये मराठीच्या वापरास प्रोत्साहन दिले. तथापि, त्या काळातील मराठी भाषेत बरेच फारसी प्रचलित झाले. उदाहरणार्थ, दररोजच्या भाषणात वापरलेले शब्द जसे की बाग, कारखाना, शहर, बाजार, दुकान, हुशार, कागद,खुर्ची, जमिन,जाहिरात), हजार इत्यादी.[१४][१५][१६] अहमदनगर सल्तनत काळात मराठी ही प्रशासनाची भाषा बनली.[१७][20] विजापूरच्या आदिलशाहीनेही प्रशासन आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी मराठीचा वापर केला.[१८] अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.
मराठा साम्राज्याचा काळ
हा काळ अंदाजे इ.स. १६५० ते इ.स. १८१८ असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. असे मानले ज़ाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
इंग्रजी कालखंड
हा काळ इ.स. १८१८ ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.
छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅंडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1926 पासून राबवली त्यातूनच अनेक मराठी शब्द निर्माण झाले आणि ते आज प्रचलित आहेत . ते वापरण्यात येऊ लागले
स्वातंत्र्योत्तर कालखंड
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली त्यातूनच महानगरपालिका क्रीडांगण सारखे महत्त्वाचे मराठी शब्द निर्माण झाले साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पॅंथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.[ संदर्भ हवा ]
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पॅंथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री.ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.
अभिजात मराठी
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
- इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
- गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाआधी किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
- भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.
मराठी साहित्य
मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही लेख - कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाट्य, बाल साहित्य, बालगीते, ललित लेख, विनोद, मराठी साहित्य संमेलने, अग्रलेख संपादकीय स्तंभलेख समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्प्रचार
मराठीचे आद्य कवी
मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.
- मुकुंदराज
- माहीमभट
- महदंबा
- ज्ञानेश्वर
- नामदेव
- जगमित्रनागा
- एकनाथ
- तुकाराम
- रामदास
- वामन पंडित
- श्रीधर
- मुक्तेश्वर
- मोरोपंत
- माधवस्वामी - तंजावरचे लेखक
- होनाजी
- महिपती
- केशीराजव्यास - मराठीतील पहिले संपादक
- दामोदर पंडित
- मुसलमान मराठी संतकवी
मराठी विश्वकोश
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर १९६०ला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. त्याआधि श्री.व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहीला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.
मराठीतील बोली भाषा
मुख्य पान: मराठीतील बोली भाषा
प्रांतिक भेद
प्रमुख विभागणी -
- कोकणी
- अहिराणी
- माणदेशी
- मालवणी
- वऱ्हाडी
- तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.
- मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
तपशीलवार माहिती -
- उत्तर महाराष्ट्र
- अहिराणी - जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.
- तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात आहेत. 'क'च्या जागी 'ख'च़ा उच्चार केला ज़ातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीच़ा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समज़त असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
- देहवाली - भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेच़े खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
- कोकण
- कोंकणी / चित्पावनी - कोकणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक बोली आहेत. अधिक माहितीसाठी कोकणी भाषा हा लेख पहा.
- माणदेशी सांगली, सातारा, या जिल्ह्यांतील आटपाडी, माण या तालुक्यांत प्रामुख्याने तर सांगली जिल्ह्यातील जत, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या, सातारा जिल्ह्यातील खटाव या तालुक्याच्या, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांच्या काही भागांत बोलली जाते.
- मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेत केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धीस आली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
- कोळी - मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरा नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली ज़ाते. कोळी जातीतील अनेक उपजातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, कोळी, मांगेली, वैती, आगरी इ..या भाषेत " ळ " उच्चार " ल " ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील " मांगेली " भाषेत "ळ"ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत मराठी, गुजराती, हिंदी आणि फारशी भाषेच़े शब्द दडलेले आहेत. शब्दशः " त्याने जेवण केलं होतं " ( त्यान जेवण करीलता ), " तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे " ( तुमाना कायतरी हांग्याय ).[ संदर्भ हवा ]
- कर्नाटक सीमा
- कोल्हापुरी - कोल्हापूर भागात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच़ कोकणी भाषेच़ा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांच़ा वापर आढळतो.
- चंदगडी बोली - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींच़ा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेचा प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराच़ा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याच़ा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याचा सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाज़ारास गेल्लो'(मी बाज़ारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
- बेळगावी - बेळगाव या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
- मराठवाडा
- मराठवाडी - मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. सहसा गावठी किंवा शिवराळपणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठीचे समज़ले ज़ाते. नांदेड जिल्ह्यात तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'आव' या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी
- विदर्भ
- नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वऱ्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
- वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वऱ्हाडी बोलली जाते. मूळ मराठी अशी ही बोली कुठल्याही प्रकारचा हेल न काढता, अनुनासिक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली जाते. प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुद्ध वाटते. म्हाइंभट यांच़ा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झ़ाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला ज़ातो. ज़से, 'नदीचा गायात, गाय फसली' (नदीचा गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईज़ो, येईज़ो, घेईज़ो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
- झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच़ व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
- इतर
- डांगी
- नारायणपेठी बोली - महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीभाषा बोलतात.
- तंजावर मराठी - ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारताच्या तमिळनाडू ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.
- नंदभाषा - व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.
- भटक्या विमुक्त - भटक्या विमुक्त जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभागातील डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
- इस्रायली मराठी
- मॉरिशसची मराठी
मराठी मुळाक्षरे
मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच बहुसंख्य (पण सर्व नाही!) मराठी मुळाक्षरे होत. यात एकोणीस स्वर आणि छत्तीस व्यंजने आहेत. देवनागरी लिपीत नसलेली ॲ, ऑ, दीर्घ ॠ, दीर्घ ॡ, दंततालव्य च, छ, झ,आणि ऱ्य, ऱ्ह ही खास मराठी अक्षरे आहेत.
स्वर
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡ
ए ऐ ओ औ अं अः
ॲ ॲा
व्यंजने
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व
श षस ह ळ
क्ष ज्ञ
विशेष - 'ङ' आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो.
- 'ङ' हा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जूषा=मंजूषा.
अधिक माहितीसाठी पहा देवनागरी
मराठी मुळाक्षरांचे उच्चार
Labial | Dental | Alveolar | Retroflex | Alveopalatal | Velar | Glottal | |
---|---|---|---|---|---|---|---|
Voiceless stops | p pʰ | t̪ t̪ʰ | ʈ ʈʰ | cɕ cɕʰ | k kʰ | ||
Voiced stops | b bʱ | d̪ d̪ʱ | ɖ ɖʱ | ɟʑ ɟʑʱ | ɡ ɡʱ | ||
Voiceless fricatives | s | ɕ | h | ||||
Nasals | m mʱ | n̪ n̪ʱ | ɳ ɳʱ | ɲ | ŋ | ||
Liquids | ʋ ʋʱ | l ɾ lʱ ɾʱ | ɭ ɽ | j |
Front | Central | Back | |
---|---|---|---|
High | iː i | uː u | |
Mid | eː | ə | oː |
Low | aː |
संगणकावर मराठी
आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी लेखन
संगणकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात मराठी लेखनासाठी विविध अडचणी होत्या -
- प्रथमत: मराठी छपाई क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध मराठी मुद्रांमध्ये एकमानकता (स्टॅंडर्डायझेशन) नसल्यामुळे सुसंगती (कंपॅटिबिलिटीही) नसते. टंकणयंत्रावरील मराठी लिपीसाठीचा कळफलक अजून प्रमणित होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक माणूस अनेक टंक वापरू शकत नाही. यासाठी राज्य मराठी विकास संस्था प्रयत्नशील आहे.
- मराठीचे टंक (फॉन्ट) हे व्यापारी तत्त्वावर निर्माण केले असल्याने ते महाग किंमतीला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित होतो व सर्वसामान्य जनतेला ते सहजासहजी मिळत नाहीत. सी डॅक या संस्थेने निर्माण केलेले टंक मोफत उपलब्ध आहेत. मात्र असे टंक मर्यादित संख्येत आहेत.
- हे व्यापारी मराठी फॉन्ट विकताना ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला टंकांमध्ये ANSI ते UNICODE (युनिकोड)असा पर्याय पुरवत नाहीत.
- आंतरजालावर शोध घेण्यासाठी युनिकोडचा (इंग्रजी : UNICODE) वापर गुगलसारख्या शोध यंत्रामध्ये करता येतो. आपोआप डाउनलोड होणारे डायनामिक टंक युनिकोड कंपॅटिबल नसल्यामुळे शोध यंत्रात चालत नाहीत.
- युनिकोड धर्तीचे टंक विंडोज २००० व त्या पुढील प्रणालींबरोबर मुळातच असतात. जुन्या विंडोज प्रणाली वापरणाऱ्यांना युनिकोड वापरणे जड जाते. परंतु लिनक्सवर आधारित संचालन प्रणालींत युनिकोडचा मूळ म्हणून वापर केल्यामुळे अशा संगणकांवर मराठी वापरताना कमी समस्या येतात.
- हे टंक देवनागरी लिपीसाठी तयार केलेलेअसल्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात. परंतु काही अक्षरे मराठीसाठी विशेष आहेत, ती सगळी टाईप करता येतील असे टंक कमी आहेत[ संदर्भ हवा ].
सध्या युनिकोडमुळे मराठी ही संगणकावर बरीच स्थिरस्थावर झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
काळानुसार आणि वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार संगणकावरील टंकलेखनपद्धतीचे पूर्व-टंकनपद्धती आणि आधुनिक टंकनपद्धती असे दोन प्रकार करता येतील[ संदर्भ हवा ].
पूर्व टंकनपद्धती
युनिकोडच्या आधी ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप कर '
- 'ता येत असत. (उदा. शिवाजी, कृतिदेव, किरण इत्यादी non-Unicode फॉन्ट आहेत.) तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक softwares बनविण्यात आली होती. (उदा. मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी C-DACचे ISM-OFFICE, श्री-लिपी, इत्यादी)
आधुनिक टंकनपद्धती-१
आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड टंक व त्या विविध keyboard layout यांचा समावेश होतो.
युनिकोड टंकनपद्धती व software.
- कगप :- कगप हा भाषाशास्त्रानुसार विकसित केलेला keyboard layout असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े
- देवनागरी इनस्क्रिप्ट - ज्यांना पारंपरिक टंकन यंत्रावर टंकलेखनाचा सराव आहे, अशांसाठी देवनागरी इनस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परिचालन प्रणालींवर मिळतो.
- बोलनागरी
- Traditional :-
आधुनिक टंकन पद्धती-२
यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून softwareच्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रिय आहेत.
- Microsoft Indic Tool / मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल : इंडिक टूल हे microsoft या कंपनीने विकसित केले आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 आदी प्रणाल्यांवर चालते.
- Google Input Tool / गूगल इनपुट टूल : गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लिप्यंतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच गूगल क्रोम ब्राउजरच्या साहाय्याने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.
OCR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीतील स्कॅन केलेले दस्तऐवज, छायाचित्रांचे स्वयंचलित पद्धतीने टंकन करता येते.
टेसरॅक्ट ओसीआर हे software लिनक्स परिचालन प्रणालीवर उपलब्ध आहे.
मराठी आणि परिचालन प्रणाली
मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि ॲपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.
युनिकोड तक्ता
हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली जात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.
- मराठीत वापरली जाणारी पण युनिकोड तक्त्यात नसणारी अक्षरे
- ॲ
- च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख [ संदर्भ हवा ]
- ऱ्य
- ऱ्ह
- पाऊण य
- युनिकोड तक्त्यात असलेली पण मराठीत न वापरली जाणारी अक्षरे
- ऄ (हे अक्षर तक्त्यात २४ वेळा आले आहे, त्यांतले एकही मराठीत नाही)
- ऍ
- ऐ
- ओ
- े
- ो
- क़ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे; दोन्ही अक्षरे मराठीत नाहीत.)
- ख़
- ग़
- ड़
- ढ़
- ङ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे, दोघांपैकी एक मराठीत आहे)
- न
- य़
- ऱ
- ळ
देवनागरी युनिकोड | 0 | 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | A | B | C | D | E | F |
U+090x | ऀ | ँ | ं | ः | ऄ | अ | आ | इ | ई | उ | ऊ | ऋ | ऌ | ऍ | ऎ | ए |
U+091x | ऐ | ऑ | ऒ | ओ | औ | क | ख | ग | घ | ङ | ङ | च | छ | ज | झ | ञ |
U+092x | ट | ठ | ड | ढ | ण | त | थ | द | न | ऩ | प | फ | ब | भ | म | य |
U+093x | र | ऱ | ल | ळ | ऴ | व | श | ष | स | ह | ऻ | ऽ | ा | ि | ी | ु |
U+094x | ू | ृ | ॄ | ॅ | ॆ | े | ै | ॉ | ॊ | ो | ौ | ् | ॎ | ॏ | ॐ | ॒ |
U+095x | ॓ | ॔ | ॕ | ॖ | ॗ | क़ | ॖ | ॗ | क़ | ख़ | ग़ | ज़ | ड़ | ढ़ | फ़ | य़ |
U+096x | ॠ | ॡ | ॢ | ॣ | । | ॥ | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
U+097x | ॰ | ॱ | ॲ | ॳ | ॴ | ॵ | ॶ | ॷ | ॸ | ॹ | ॺ | ॻ | ॼ | ॽ | ॾ | ॿ |
↓ ☸ → | ० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | A | B | C | D | E | F |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
u+A8Ex | ꣠ | ꣡ | ꣢ | ꣣ | ꣤ | ꣥ | ꣦ | ꣧ | ꣨ | ꣩ | ꣪ | ꣫ | ꣬ | ꣭ | ꣮ | ꣯ |
u+A8Fx | ꣰ | ꣱ | ꣲ | ꣳ | ꣴ | ꣵ | ꣶ | ꣷ | ꣸ | ꣹ | ꣺ | ꣻ |
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान
- भाषा सल्लागार मंडळ : हे बंद पडले आहे[ संदर्भ हवा ].
- भाषा संचालनालय
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
- विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : हे बंद पडले आहे[ संदर्भ हवा ].
- भाषा सल्लागार समिती
- विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती (केवळ अस्तित्वमात्र शिल्लक आहे)[ संदर्भ हवा ].
- राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे)[ संदर्भ हवा ].
- मराठी भाषा अभ्यास परिषद
- मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
- विदर्भ साहित्य संघ : ही बिनसरकारी संस्था आहे.
- महाराष्ट्र साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था .
- मराठवाडा साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
- कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
- बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
संस्था आहे.
- अभिजात मराठी भाषा परिषद : ही बिनसकारी संस्थ आहे. [ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
- शुद्धलेखनाचे नियम
- देवनागरी
- मोडी
- युनिकोड
- संगणक आणि मराठी
- महाराष्ट्र
- मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने
- मराठी साहित्य संमेलने
- अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
- मराठी-मराठी शब्दकोशांची सूची
- शब्दकोशांची सूची
- अभिजात मराठी भाषा परिषद
मराठी संकेतस्थळे
- विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे स्थळ नसल्यामुळे, कृपया संकेतस्थळांचे दुवे मुख्य लेख - मराठी संकेतस्थळे
या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
संदर्भ आणि नोंदी
- ^ [१]
- ^ एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल
- ^ इंडियनलॅंग्वेजेस.कॉम- मराठी Archived 2008-03-16 at the Wayback Machine..
- ^ [२]
- ^ "गोवा विद्यापीठ- मराठी विभाग". 2013-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-25 रोजी पाहिले.
- ^ "महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा". 2012-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-25 रोजी पाहिले.
- ^ "गुलबर्गा विद्यापीठ". 2008-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-25 रोजी पाहिले.
- ^ देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर
- ^ जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली
- ^ "मराठी प्रमाणभाषेचे लेखननियम | मराठी अभ्यास परिषद". maparishad.com. 2022-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-04 रोजी पाहिले.
- ^ "भाषासूत्र : मराठीच्या जपणुकीसाठी." Loksatta. 2022-01-04 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2013-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-26 रोजी पाहिले.
- ^ १९६० मधे महाराष्ट्राच़े एकभाषिक राज्य स्थापन झाले Archived 2014-07-04 at the Wayback Machine. - मराठीमाती
- ^ Kulkarni, G.T. (1992). "DECCAN (MAHARASHTRA) UNDER THE MUSLIM RULERS FROM KHALJIS TO SHIVAJI : A STUDY IN INTERACTION, PROFESSOR S.M KATRE Felicitation". Bulletin of the Deccan College Research Institute. 51/52: 501–510. JSTOR 42930434.
- ^ Qasemi, S. H. "MARATHI LANGUAGE, PERSIAN ELEMENTS IN". Encyclopedia Iranica. 17 September 2017 रोजी पाहिले.
- ^ Pathan, Y. M. (2006). Farsi-Marathi Anubandh (फारसी मराठी अनुबंध) (PDF). Mumbai: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 13 February 2022 रोजी पाहिले.
- ^ Gordon, Stewart (1993). Cambridge History of India: The Marathas 1600-1818. Cambridge, UK: Cambridge University press. p. 16. ISBN 978-0-521-26883-7.
- ^ Kamat, Jyotsna. "The Adil Shahi Kingdom (1510 CE to 1686 CE)". Kamat's Potpourri. 4 December 2014 रोजी पाहिले.