मराठी प्रबंध सूची (पुस्तक)
मराठी प्रबंध सूची ही महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध विद्यापीठांत सादर करण्यात येऊन मान्यता मिळालेल्या 'मराठीविषयक' प्रबंधाची सूची आहे. 'मराठीविषयक' ह्या संज्ञेने मराठी साहित्य, तौलनिक साहित्याभ्यास, भाषाविज्ञान आणि शिक्षणशास्त्र ह्या विषयांशी संबंधित अशा मराठी भाषेतील तसेच अन्य भाषांतील प्रबंधांचा निर्देश केलेला आहे.[१] ह्या सूचीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून त्यांत १९३८ ते २००७ [२] [३] ह्या कालखंडातील प्रबंधांचा समावेश झालेला आहे.
डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी हे १९८५ साली नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मराठीच्या प्रेमापोटी मराठीतील प्रबंधसंपदा विद्यार्थी आणि संशोधकांच्या कार्यासाठी उपयोगी पडावी म्हणून सन १९८५ ते १९९१ पर्यंत शोधकार्य करून, त्यांनी प्रथम डी.लिट. आणि आचार्य पदवी मिळविणाऱ्यांच्या प्रबंधांची व नंतर १९९१ पर्यंतच्या मराठी विषयातील तब्बल ७५८ प्रबंधांची नावे, त्यातील विषय व संशोधनकारांच्या नावे गोळा केली. त्यानंतर मराठी प्रबंधसूची हे पुस्तक प्रकाशित केले.
त्यासाठी कुळकर्णी यांनी स्वखर्चाने राज्यातील सर्व विद्यापीठे फिरून माहिती गोळा करण्याचे काम केले. केवळ माहिती गोळा करून त्यांचे काम थांबलेले नव्हते; तर प्रत्येक विद्यापीठात संशोधन करणाऱ्या महिला संशोधकांची आणि त्यांच्या विषयांची प्रकारनिहाय नावे त्यांनी गोळ केली. त्यांतही एकसारखे लिखाण असलेल्या शोधप्रबंधांची यादी त्यांनी तयार केली. सध्या डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी यांच्याकडे २००७ पर्यंतची तब्बल सतराशे प्रबंधांची सूची आहे. त्याचे ग्रंथस्वरूपात प्रकाशन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. केवळ मराठी प्रबंधांची यादीच नव्हे; तर डॉ. कुळकर्णी यांनी सर्वाधिक अकरा कोशही प्रकाशित केले आहेत.
प्रबंधसूची तयार करण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर देशात मराठीखेरीज कोणत्याही प्रादेशिक भाषेत अशी सूची असल्याचे ऐकिवात नाही, असा दावा डॉ. कुळकर्णींचा आहे. मराठीत प्रबंधलेखनाची सुरुवात झालेल्याला २०१२ साली ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने २००७ ते २०१२ या दरम्यानच्या प्रबंधांचा आढावा असलेली सूची प्रकाशित करण्याची शेवटची इच्छा असल्याचे ते बोलून दाखवितात.
ही सूची करताना नागपूर विद्यापीठाने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. त्यांच्या ग्रंथालयाकडे मराठीविषयीचे अनेक प्रबंध नसल्याची बाबही समोर आली
या पुस्तकात समाविष्ट केलेल्या प्रबंधांची वर्गवारी :
- इ.स. १९३८ ते १९५० : ९ प्रबंध (१ महिला)
- इ.स. १९५१ ते १९६० : २३ प्रबंध (४ महिला)
- इ.स. १९६१ ते १९७० : ४९ प्रबंध (१४ महिला)
- इ.स. १९७१ ते १९८० : १५४ प्रबंध (५४ महिला)
- इ.स. १९८१ ते १९९० : २७० प्रबंध (१३८ महिला)
- इ.स. १९९१ ते २००० : ३६७ प्रबंध (२०६- महिला)
- इ.स. २००१ ते २००७ : ४४० प्रबंध (१८९ महिला)
संदर्भ
संदर्भसूची
- कुलकर्णी, वसंत विष्णू (२०११). मराठी प्रबंध सूची : १९३८ ते २००७ (२री ed.). नागपूर: साहित्य प्रसार केंद्र.
- कुलकर्णी, वसंत विष्णू (२०१४). मराठी प्रबंध सूची : २००८ ते २०१२ (३री ed.). नागपूर: साहित्य प्रसार केंद्र.