मराठी ख्रिस्ती साहित्य
मराठी ख्रिस्ती साहित्य ही संज्ञा ख्रिश्चनधर्मीय मराठ्यांनी लिहिलेल्या मराठी साहित्यास उद्देशून वापरली जाते.
मराठी ख्रिस्ती साहित्य लेखनाचा सुरुवातीचा काळ
इ.स. १६१६ साली फादर स्टीफन्स यांनी १०,९६२ ओव्यांचे 'ख्रिस्तपुराण' हे पुस्तक लिहिले. सोळाव्या शतकामध्ये फादर आंतुनिया साल्दाज आणि सतराव्या शतकामध्ये फादर जुवांव पेत्रोझ यांनी मराठीमध्ये काव्यलेखन केले. एकोणिसाव्या शतकामध्ये रेव्हरंड हरिपंत खिस्ती यांनी ओवीबद्ध 'ख्रिस्तचरित्र' लिहिले. बाबुराव पवार हे ख्रिस्ती समाजातले पहिले शाहीर होते. इ.स. १९१४ साली रेव्हरंड भास्कर कृष्ण उजगरे यांनी 'वनवासी फूल', 'केवढे हे क्रौर्य' अशा कविता लिहिणाऱ्या नारायण वामन टिळक यांची कविता संपादित केली. इ.स. १९२० साली भास्करराव उजगरे यांनीच ना.वा. टिळकांची 'अभंगांजली' प्रकाशित केली. १९३८ साली नारायण वामन टिळकांचा 'ख्रिस्तायन' हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात एकूण शहात्तर अध्याय आहेत. पहिले साडेबारा अध्याय स्वतः रेव्हरंड टिळकांनी, शेवटचा अध्याय देवदत्त टिळकांनी आणि बाकी सर्व ख्रिस्तायन, लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिले. १९३० साली शाहू दगडोबा उजगरे या कवीचे 'नवे अंजन' हे खंडकाव्य प्रसिद्ध झाले. हे खंडकाव्य १२० श्लोकांचे असून दिंडी वृत्तामध्ये लिहिलेले आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्यातील लेखिकांचे योगदान
पंडिता रमाबाईंनी इ.स. १८८२ साली 'स्त्रीधर्मनीती' नावाचे स्त्री जीवनाला मार्गदर्शक असे पुस्तक लिहिले. पंडिता रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर बायबलचे मराठीत भाषांतरही केले. त्यानंतर त्यांनी 'इंग्लंडचा प्रवास' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा पहिला भाग म्हणजे सदा पांडुरंग केळकर यांना लिहिलेले पत्र आहे तर दुसऱ्या भागात इंग्लंडमधील स्त्रीजीवनाचे वर्णन आहे. 'युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवासवर्णन' हे पुस्तकही रमाबाईंनी लिहिले. लक्ष्मीबाई टिळक यांनीही मराठी ख्रिस्ती साहित्य निर्मितीमध्ये भर घातलेली आहे. लक्ष्मीबाई टिळक या १८९० सालापर्यंत निरक्षर होत्या रेव्हरंड टिळकांनी त्यांना लिहायला वाचायला शिकविले. इ.स. १८९४ साली लक्ष्मीबाई टिळकांची 'भरली घागर' ही पहिली कविता प्रसिद्ध झाली. लक्ष्मीबाईंनी स्मृतिचित्रे हे पुस्तकही लिहिले. रेव्हरंड ना.वा. टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे अपूर्ण राहिलेले 'ख्रिस्तायन'ही लक्ष्मीबाईंनी पूर्ण केले. रामकुंवर सूर्यवंशी यांचा 'मयूरपंख' हा कथासंग्रह इ.स. १९८० साली प्रकाशित झाला. या संग्रहात 'झुंज', 'बडी हवेली', 'भैरवाच्या परिसरात' यासारख्या एकूण आठ कथा आहेत. 'मयूरपंख' या पुस्तकाला रवींद्र पिंगे यांची प्रस्तावना आहे. रामकुंवर सूर्यवंशी यांनीच ख्रिस्तचरित्रावर आधारलेली दोन हजार ओव्यांची 'भक्तिमंगला' ही रचनाही केलेली आहे. अनुपमा उजगरे यांनी 'तुम्हाला काय वाटतं?' या नावाचे सामाजिक व कौटुंबिक समस्यांवर आधारित सदर ज्ञानोदय या नियतकालिकातून लिहिले. उषा हरिश्चंद्र उजगरे यांचे 'एकेक वेस ओलांडताना' आणि डॉ. उषा विजय कोल्हटकर यांचे 'अमेरिका किती मोठी? किती छोटी?' ही पुस्तकेही महत्त्वाची आहेत. सिसिलिया कार्व्हालो यांचे 'उन्मेष', 'प्रकाशझोत', 'काठ' हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. 'पंडिता रमाबाई:व्यक्ती व वाङ्मय' हा त्यांचा प्रबंधही प्रकाशित आहे.
मराठी ख्रिस्ती साहित्यातील काही लेखक-लेखिका
- श्यामसुंदर आढाव
- सुनील आढाव
- डॉ. अनुपमा उजगरे
- विजयानंद उजगरे
- देवदत्त कांबळे
- रॉक कार्व्हालो
- सिसिलिया कार्व्हालो
- इनास कून
- संपतकुमार गायकवाड
- अशोक टिळक
- जोजेफ तुस्कानो
- फेलिक्स तुस्कानो
- अमृतराव त्रिभुवन
- इंदिरा त्रिभुवन
- कैतान दोडती
- हिलरी फर्नांडीस
- जयंत भांबळ
- सायमन मार्टिन
- प्रल्हाद शांतवन रणदिवे
- रमण रणदिवे
- जॉर्ज लोपीझ
- सुधीर शर्मा