Jump to content

मराठी अभिमानगीत

मराठी अभिमानगीत हे मराठीतील एक गीत आहे. हे गीत मराठी कवी सुरेश भट यांनी लिहिले असून कौशल इनामदार यांनी त्यास संगीत दिले आहे. ३५६ गायक, एक गाणे, एक गीतकार, एक चाल, एक ताल असे या गाण्याचे स्वरूप आहे.

वैशिष्ट्ये

ज्याला ४५० पेक्षा अधिक कलाकारांनी आपला आवाज बहाल केला आहे, असे मराठी अभिमानगीत हे बहुधा एकमेव गाणे असावे. .[] हे गाणे मराठी अभिमानगीत या अल्बममध्ये ठाण्यात २७ फेब्रुवारी, इ.स. २०१० रोजी, मराठी भाषा दिनी प्रकाशित झाले. []

मराठी अभिमानगीत हे ११२ प्रथितयश गायक-गायिकांनी व ३५६ होतकरू समूहगायकांनी गायले आहे. प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर,शाहीर विठ्ठल उमपांपासून अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, अजित परब, स्वप्नील बांदोडकर, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायनपर्यंत गायक गायिका तसेच अशोक पत्की, श्रीधर फडकेंपासून मिलिंद जोशी, मिथिलेश पाटणकरांपर्यंत बरेच संगीतकार या शिवाय अमराठी असलेले गायक-गायिका हरीहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर अशा अनेकांनी अतिशय प्रेमाने यात सहभाग घेतला आहे. हे गाणे मुंबई, चेन्नईठाणे येथील ३ स्टुडियोंमध्ये ध्वनिमुद्रित झाले आहे. या ध्वनिमुद्रणात १२ ध्वानिकी अभियंत्यांचा व ६५ वादक कलाकारांचा सहभाग आहे.

या गाण्यात २५००हून जास्त व्यक्तींचा प्रात्यक्षिक वा अ-प्रात्यक्षिक सहभाग आहे.[]

शब्दरचना

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

कौशल इनामदार यांनी मूळ कवितेमधील शेवटचे कडवे गाळले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे:

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

संदर्भ व नोंदी

  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=68015:2010-05-07-15-14-32&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=166 [मृत दुवा]
  2. ^ "संग्रहित प्रत". 2010-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-18 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". 2010-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-09-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे