Jump to content

मराठा (मराठी वृत्तपत्र)

मराठा
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मुख्य संपादकप्र.के. अत्रे
स्थापनानोव्हेंबर १५, १९५६  
भाषामराठी
मुख्यालयभारत महाराष्ट्र, भारत
खपसुरुवातीला २५००० हजार, नंतर >१,००,०००.
भगिनी वृत्तपत्रेसांज मराठा,

नवयुग,

जयहिंद


मराठा हे एक मराठी भाषेतील दैनिक होते. विजय तेंडुलकर तसेच प्र.के. अत्रे यांनी या दैनिकातून अनेक अग्रलेख लिहिले.

इतिहास

आचार्य प्र. के. अत्रे त्यांचे मुंबईत निघालेले आणि सतत गाजत राहिलेले दैनिक 'मराठा' हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अपत्य होते. त्या लढ्याच्या गरजेतून, भांडवलाची व अन्य काही तरतूद झालेली नसताना 'मराठा' पत्र काढण्याची घोषणा अत्रे यांनी उस्फूर्तपणे केली आणि तशाच अवस्थेत घोषणेनंतर ३ दिवसात पहिला अंक निघाला.
अत्यंत अडचणीत निघालेल्या पत्राला मराठी जनतेने मात्र प्रथमपासून उचलून धरले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे जसे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व पर्व होते, त्याप्रमाणेच 'मराठा' पत्राची स्थापना आणि त्याची झपाट्याने झालेली वाढ हा एक चमत्कारच होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही खरीखुरी लोकचळवळ होती त्याप्रमाणे 'मराठा' हे सुद्धा लोकपत्रच होते.[]

पहिला अंक

दैनिक 'मराठा'चा पहिला अंक ८ नोव्हेंबर १९५६ रोजी प्रसिद्ध होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात ७ नोव्हेंबर १९५६ रोजी जेव्हा अंक मुद्रणयंत्रातून बाहेर पडला तेव्हा त्याचे स्वरूप समाधानकारक नव्हते.म्हणून ८ दिवस नमुना अंक काढण्याचे ठरवून संपादन तंत्रात रोजच्या रोज नवनवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयोगामुळे आत्मविश्वास वाढला.  १५ नोव्हेंबर १९५६ रोजी सकाळी 'मराठा'चा पहिला अंक अधिकृतरीत्या बाहेर पडला. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळून, खपाचा आकडा २५ हजारांवर गेला.[]

पहिले संपादक मंडळ

१९५६ च्या नोव्हेंबरमध्ये 'मराठा' सुरू झाला आणि मार्च १९५७ मध्ये सावत्रिक निवडणुका झाल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने आपले अधिकृत उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते. त्यांचा प्रचार करण्याची कामगिरी 'मराठ्या'ने पार पाडली. समितीला पश्चिम महाराष्ट्रात भरघोस यश मिळाले. ऐन मोक्यावर एक प्रकारे 'मराठा' निघाला होता. पुढे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समितीला बहुमत मिळवून देण्यात 'मराठ्या'चा सिंहाचा वाटा होता. 
ज्या मुंबई शहरासाठी एवढी रण माजले होते, त्या शहरावर संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला झेंडा फडकवून विरोधकांना साप चीत केले.[]

वृत्तपत्राच्या आवृत्त्या

१९५७ सालच्या सार्वजनिक निवडणुकीच्या काळात, म्हणजे 'मराठा' सुरू झाल्यावर चार सहा महिन्यांतच 'सांज मराठा' हे सायंदैनिक सुरू करण्यात आले होते.  १५ फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हे सायंदैनिकही उत्तम चालत होते. पण संस्थाच संपल्यावर या सायंदैनिकाचा शेवट झाला. त्याचे सूत्रधार म्हणून सुरुवातीला एक ज्येष्ठ पत्रकार 'नवाकाळ'चे माजी सहसंपादक के.रा. पुरोहित हे काम पाहत असत.

रचना

'मराठा' पत्राच्या शिरोभागी 'मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवाव' हे ब्रीदवाक्य,श्री शिवछत्रपती,महात्मा फुले,लोकमान्य टिळक ह्या तीन दैवतांची चित्रेही होती.पुढे ह्या चित्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चित्राचाही समावेश करण्यात आला. 'भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊं माथा' ही तुकाराम महाराजांची उक्ती अग्रलेखाच्यावर टाकण्यात आली होती.
पहिल्या अंकात पहिल्याच पानावर सेनापती पा. म. बापट ह्यांचा पुढील आशीर्वाद छापला होता.- "आपले दैनिक मराठी स्त्री-पुरुषांना रोजच्या रोज त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देईल आणि चालू लोकशाहीच्या लढ्यात त्यांना स्फूर्ती देऊन मार्गदर्शन करेल अशी मला खात्री आहे. कम्युनिस्ट नेते कॉ. डांगे यांनी म्हणले होते की "दैनिक 'मराठा' पत्र संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील एक आणीबाणीच्या प्रसंगी सुरू होत आहे. आजच्या उध्वस्त महाराष्ट्रीयन जीवनाची लोकशाहीच्या पायावर नव्याने उभारणी करणारा किमान कार्यक्रम जनतेच्या मनावर खोलवर बिबवयाचा आहे. भांडवलदारी वृत्रपत्रांना तोंड देऊन हे कार्य पार पडण्याच्या प्रतिज्ञा प्रतिज्ञाने जन्माला येणारे दैनिक 'मराठा' हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन लाभलेले एक प्रभावी अस्त्रच आहे." कवी सुरेश भट यांची 'मराठया' ही स्फुर्तीदायक कविताही अंकात होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे एस. एम. जोशी आदी नेते याचेही संदेश पहिल्या अंकात होते.
अंकात अग्रलेखाखेरीज 'ढाल तलवार','पाचामुखी','कोपरखळ्या', अशी सदरेही होती. पहिला अंक संपादक अत्रे यांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मथळा होता 'मराठी जनतेचा आवाज' हा मथळा सार्थच होता.[]

संदर्भ

  1. ^ a b c d लेले, रा. के. (तृतीयावृत्ती २००९). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  1. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास - रा. के. लेले, : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, तृतीयावृत्ती २००९ किमंत ७५०/-
  2. पत्रकारितेची मूलतत्त्वे - प्रा. डॉ. सुधाकर पवार : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक १३४०, तृतीयावृत्ती २०१२ किमंत १७५/-