मराठवाडा
?मराठवाडा महाराष्ट्र • भारत | |
— प्रांत — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ६४,८११ चौ. किमी |
जिल्हे | छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
लोकसंख्या • घनता साक्षरता | १,५५,८९,२२३ (2001) • २४१/किमी२ ६८.९५ % |
मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. छत्रपती संभाजीनगर शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. कोरडवाहू शेतीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अंबाजोगाई, परळी आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्याची मराठी ही मुख्य बोलीभाषा आहे. मराठवाड्यास संतांची भूमी असे म्हणले जाते. बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी ३ ज्योतिर्लिंग याच भागात आहे.
इतिहास
आज ज्या प्रदेशाला मराठवाडा म्हणतात त्याची तशी ओळख इ.स. १८६१ पासून झालेली आहे. भूतपूर्व हैद्राबाद संस्थानच्या ज्या भागात मराठी भाषेचा वापर होत असे त्याला प्रारंभी मराठवाडी असे संबोधिले जाई. इ.स. १८६१ पासून हा प्रदेश मराठवाडा म्हणून संबोधिला जाऊ लागला. मराठवाड्याला इसवीपूर्व ४ व्या शतकापासूनचा इतिहास असला तरी त्यापूर्वीच्या काळीही तेथे वस्ती होती असे आढळते. ज्या काळात भारताच्या कोणत्याच प्रदेशाला काहीही नाव नव्हते त्या काळातील जनजीवनाची पुसटशी का होईना कल्पना उत्खननातून आणि पुरातत्वीय अन्वेषणातून उपलब्ध झालेल्या अवशेषांवरून करता येते. मात्र सामान्यतः या अवशेषांचें रूप सर्वत्र सारखेच असल्यामुळे त्या आधारे प्रादेशिक वेगळेपण दाखविणे शक्यच नाही. भारतात सर्वात आधीच्या मानवी वस्तीच्या पाऊलखुणा आढळल्या त्या पुराश्म युगातल्या. पुराश्म वा पुरापाषाण युगाचे तीन भाग करावे लागतात, आद्य पुराश्मयुग, मध्यपुराश्मयुग आणि उत्तर पुराश्मयुग. यानंतर अवतरले ते मध्याश्मयुग (मेसॉलिथिक) आणि मग आले ते नवाश्मयुग. यापैकी मराठवाड्यात आद्यपुराश्मयुग आणि नवाश्मयुगाच्या खुणा अजूनतरी उपलब्ध झालेल्या नाहीत. याचा अर्थ असा मात्र नव्हे की या काळात येथे मानवी वस्ती नव्हतीच. एवढे मात्र खरे की यासंबंधीचा धांडोळा पुरातत्ववेत्त्यांनी अजूनपर्यंत घेतलेला नाही.
मध्यपुराश्मयुगातील मानवी वस्तीच्या खुणा नांदेड जिल्ह्यातील किवळा या खेड्यात आढळल्या. हा काळ साधारणपणे ४० हजार वर्षांपूर्वीचा आहे. वन्य प्राण्यांची शिकार या हत्यारांनी करणे आणि कंदमुळे गोळा करून त्यावर उपजिविका करणे असे त्याचे जीवन होते. प्रायः हे भटके जीवन होते. या नंतरच्या म्हणजे उत्तरपुराश्म काळात सुमारे २५ हजार वर्षापूर्वीचे याचे अस्तित्व नांदेड जवळील भोकर या गावी फार मोठ्या प्रमाणात मिळालेल्या दगडी हत्यारांच्या साठ्यामुळे कळू शकले. या काळातही दगड हेच माध्यम राहिले. मात्र दगडांचे वेगळाले प्रकार वापरात आणले गेले नि हत्यारे व अवजारे यांच्या घडणीत थोडी सफाई आणली गेली. अॅश्युलियन म्हणून यांची ओळख सांगतात. यावेळपावेतो मानव पुराश्मयुगातून मध्याश्मयुगात आला होता. त्याच्या जीवनमानात सुधारणा झाली होती. आता हत्यारे चर्ट या जातीच्या दगडांची बनवली होती. ती करण्याचे तंत्रही सुधारले होते. तासण्या, अणुकुचीदार टोक असलेली हत्यारे तसेच छोट्या छिन्नीसारखी हत्यारे वापरात आली होती.
नवाश्मयुगाने मानवी जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणला. तो आता शेती करु लागला, पशुपालन करु लागला. त्याच्या जीवनाला त्यामुळे स्थेर्य प्राप्त झाले. झोपड्या बांधणे आणि धान्य साठवण्यासाठी मातीची भांडी करणे त्याला आवश्यक ठरले. येथे खेदाने हे म्हणावे लागते की या काळचा म्हणजेच नवाश्मयुगाचा ठोस पुरावा अद्यापपावेतो मराठवाड्यातच केवळ नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रातही मिळालेला नाही. मात्र याच काळचे पण ताम्रपाषाणयुग असे संबोधण्यात येणाऱ्या काळातील अवशेष महाराष्ट्रात नेवासे, जोर्वे, नाशिक, दायमाबाद, इनामगाव इत्यादी ठिकाणी उपलब्ध झाले. या काळच्या संस्कृतीची कल्पना साहित्यातून आढळत नाही. ती उत्खननाद्वारेच दृग्गोचर झालेली आहे. या संस्कृतीला समांतर असणारी एक संस्कृती आंध्रात, विदर्भात, मराठवाड्यात नि थोड्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात नांदत होती. बृहदाश्मयुगीन संस्कृती या नावाने ती ओळखली जाते. तिचे वैशिष्ट्य म्हणजे मृतांना मांतीच्या ढिगाऱ्यात अथवा दगडाच्या फरशींनी बंदिस्त केलेल्या चौकटीत पुरून त्या भोवती मोठाले दगड वर्तुळाकारात लावून ठेवणे हे होय. या शिवाय मृतासवे विविध मौल्यवान दगडांचे मणी, तांब्याची आणि लोखंडाची हत्यारे, अवजारे, भांडी, मंजुषा इत्यादी वस्तू आणि काळी- तांबडी खापरी भांडी पुरण्याचीही रीत होती. या संस्कृतीचा काळ इसवीपूर्वी सातव्या-आठव्या शतकाइतका किंवा अधिकच मागे जातो. (लेख- मराठवाडा: इतिहास व संस्कृती. डॉ. गो.बं. देगलूरकर, मराठवाडा वारसा आणि सद्यस्थिती खंड १, संपादक, डॉ. मारुती आवरगंड, श्री विठ्ठल कदम)
प्राचीन मराठवाडा
भारताचा प्राचीन इतिहास उत्तरेत स्थापन झालेल्या मौर्य साम्राज्यापासून सुरू होतो. उत्तर भारतातील या साम्राज्याच्या संपर्कात महाराष्ट्र आणि दक्षिणेतील आंध्र, कर्नाटक आदींचे प्रदेशही आले होते. मौर्य सम्राट अशोकाचे कोरीव लेख या सर्व प्रदेशात सापडल्यामुळे या काळी म्हणजे इसवीपूर्व चौथ्या शतकात या प्रदेशांत बरेच दळणवळण असले पाहिजे. शिवाय महाराष्ट्रातील अनेक लेणी आणि पौनी (जि. भंडारा) सारख्या ठिकाणचे बौद्धस्तूप व्यापारी मार्गावर असल्यामुळे ते उत्तर-दक्षिण भारत जोडणारे होते असेही दिसते. वस्तूंची देवाण-घेवाण होताना विचारांचे आदान प्रदान होत असते आणि वस्तूंच्या वापरातून आचाराला आकार प्राप्त होत असतो. हे लक्षात घेता या व्यवहारात मराठवाडा अस्पर्श राहिला असणे संभवत नाही. संस्कृतीच्या प्रसाराचे प्रसरणवादी प्रमेय' मांडणाऱ्यांनी दिलेल्या काही कारणांपैकी भौगोलिक साहचर्य हे एक महत्वाचे कारण दिले आहे. त्यामुळे प्राचीन काळातील अनेक राजवटींचे आधिपत्य मराठवाडा महाराष्ट्र यावर जसे होते तसेच ते शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र नि कर्नाटक या सध्याच्या राज्यांच्या सीमेलगततच्या भागावरही होते. त्यामुळे यापैकी कोणत्याही राज्याचा विचार करताना शेजारच्या प्रदेशातील सांस्कृतिक बाबींच्या प्रभावांचा विचार अपरिहार्य ठरतो.
मराठवाड्याचा इतिहास आणि संस्कृती सातवाहन काळात अधिक स्पष्टपणे समोर येते. खरे तर मौर्यानंतर शुगांचे राज्य आले. यांचा फारसा प्रभाव दक्षिण भारतावर उमटला नाही. मात्र त्यांच्या कलेचा प्रभाव भाजे, पौनी, पितळखोरे आणि अजिंठे (पहिला टप्पा) येथे जाणवतो. सातवाहनांनी दक्षिण भारतात पहिले साम्राज्य स्थापिले आणि नंतर मराठवाडा म्हणून प्रसिद्ध पावलेला प्रदेश भारताच्या नकाशावर (मानचित्रावर) झळकू लागला. या आधी हा प्रदेश अश्मक, कुंतल, मूलक या जनपदात विखुरलेला होता. सातवाहनांनी या प्रदेशांना संघटित केले. यामुळे सातवाहनांना मराठवाडा-महाराष्ट्राचे खरेखुरे पहिले सम्राट म्हणणे यथोचित ठरते. दक्षिण भारतातील या पहिल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हे सातवाहन मराठवाड्याचे होते हे महत्वाचे. इसवीपूर्व २५० ते इ.स. २६० असे सुमारे ४५० वर्षे यांचे साम्राज्य होते. यांचा अंमल मध्यप्रदेशाचा दक्षिण भाग, गुजरातचा पूर्व भाग, महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक एवढ्या अवाढव्य प्रदेशावर होता. साहजिकच या प्रदेशातील धर्म, कला, स्थापत्य यात समानता निर्माण झाली ती या काळात. भौतिक प्रगती झाली तीही या काळात. विशेष म्हणजे या काळात प्राकृत भाषेला राजाश्रय तथा लोकाश्रय मिळाला आणि मराठवाडा-महाराष्ट्र येथील समाजाला स्वतंत्र भाषेमुळे पृथगात्मता प्राप्त झाली. आणि या भूमीचा अभिमान लोकांत निर्माण झाला. या समाजाच्या अस्मितेमुळे येथील संस्कृतीची व तदअंतर्गत साहित्य, कला, शास्त्र, तत्त्वज्ञान यांची जोपासना होणे शक्य झाले. महाराष्ट्राबाहरे भारतातील इतर प्रदेशात आणि भारताबाहेरही येथिलांची व्यापारी देवाणघेवाण सुरू झाली. पाटलीपुत्र (पाटणा), उज्जयिनी, भरुकच्छ (भडोच), शूर्पारिक (सोपारा), भोगवर्धन (भोकरदन), तगर (तेर), प्रतिष्ठान (पैठण) यासारख्या वेगळाल्या शहरांना जोडणारे व्यापारी मार्ग महाराष्ट्र-मराठवाडा प्रदेशातून जात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया या काळातच जोमाने झाली असे दिसते. एकूण काय तर सातवाहन राजवटीने येथील जीवनाला कलाटणी दिली होती.
इतिहासकाळात भारतात अनेक कालगणनापद्धती निर्माण झाल्यापैकी कालौघात आजतागायत टिकून राहिल्या त्या दोनच विक्रमसंवत् उत्तर भारतात नि शालिवाहन (सातवाहन) दक्षिण भारतात. यावरुनही मराठवाड्यात संस्कृतीचा उषःकाल घडवून आणणाऱ्या या राजकुलाची महती लक्षात यावी. आणि मराठवाड्याची मातब्बरीही! सिमुक गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुळुमावी, वसिष्ठीपुत्र सातकर्णी, स्कंद सातकर्णी, यज्ञश्री इत्यादींची नाणी इतर ठिकाणांबरोबरच मराठवाड्यात पैठण, तेर, भोकरदन इत्यादी ठिकाणी उत्खननामध्ये सापडली. तद्वतच आधिभौतिक संस्कृतीचे अवशेष आणि याच काळातील उत्खननात हाती आलेले रोमन अवशेष तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि राजकीय तथा आर्थिक परिस्थितीची कल्पना देतात. शिवाय प्लिनी, टॉलेमी आणि पेरिप्लस यांचेकडूनही बरीचशी माहिती मिळते ती वेगळीच. या सर्व माहितीवरून असे दिसून येते की मराठवाड्याच्या इतिहासात सातवाहनकाल सर्व दृष्टींनी भरभराटीचा होता.
टॉलेमीने सातवाहनांच्या साम्राज्यात तटबंदीयुक्त ३० शहरे होती अशी नोंद केली आहे. त्यातील पैठण, तेर, भोकरदन इत्यादी ठिकाणच्या उत्खननातून तेथील घरादारांचे अवशेष आणि सांडपाण्यासाठी बांधलेले विटांचे, मातीच्या कड्यांचे किंवा राजणांचे सांडपाण्यांचे कूप आढळून आलेले आहेत. ही सुबत्ता राजकीय स्थैर्य आणि अंतर्गत व सागरी व्यापारामुळे आलेली होती हे स्पष्टच आहे.
रोमन साम्राज्यातून महाराष्ट्र-मराठवाड्यात उत्कृष्ठ बनावटीची नक्षीदार भांडी, कांचसामान, एक मीटरपेक्षा अधिक उंचीचे मद्याने भरलेले कुंभ (अॕम्फोरा), रोमन देव-देवतांचे पुतळे, रोमन युवती व युवकांची शिल्पे तसेच रोमन सम्राटांची नाणी आल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. इकडे आलेल्या अनेक उत्खननांत रोमहून आलेली लोखंडी अवजारे, धातूची भांडी, पळ्या, चमचे, उलथणी, तांब्याच्या थाळ्या, उचलण्यासाठी मूठ असलेले रांजण आणि जाती उपलब्ध झाली. येथील भौतिक जीवनात यांच्यामुळे एक नवाच रंग भरला गेला असे दिसते. रोमच्या नाण्यांवर राजांच्या आकृती असत त्यामुळे इकडे त्या नाण्यांना पुतळयांची नाणी म्हणत. अगदी पेशवाईपर्यंत या प्रकारच्या नाण्यांचे गळ्यातील हार करीत व त्यांना पुतळ्याच्या माळा म्हणत. या काळच्या मराठवाड्यातील कला व साहित्य या संबंधीचा विचार या लेखाचे शेवटी केलेला आहे.
सातवाहनानंतर दखल घ्यावी असे मराठवाड्यातील दुसरे राजघराणे होते ते वाकाटकांचे. इसवीच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत होऊन गेलेल्या राजवंशापैकी हा सर्वश्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा प्रभाव पडला आहे, असे फ्रेंच इतिहासकार जुव्हो डुब्राइल म्हणतात. वाकाटक याच घराण्याकडे अजिंठे येथील इसवीच्या चौथ्या-पाचव्या शतकातील लेण्यातील भित्तीचित्रांचे श्रेय जाते. या चित्रांचे महत्व अशासाठी की तत्कालीन भौतिक जीवन ते आपल्यासमोर दृष्यरुपात उभे करतात. त्यावेळची वस्त्रप्रावरणे, त्यात सकच्छ व विकच्छ पद्धतीने नेसण्याची वस्त्रे, अर्धोरुक (मांड्यांपर्यंत पोचणारी-वस्त्रे) चंडातक, जांघिका, शिवाय उत्तरीय, कंचुकी, चोलिका, कूर्पासक, पयोधरपट्ट, स्तनोत्तरीय इत्यादींचा अंतर्भाव होतो. तर विविध प्रकारचे दागिने मुक्ताहार, हेमसूत्र, कंठी, वैकक्षक, चटुलातिलक (बिंदी), लोलक, टंक, कर्णफूल, स्कंधपत्र, नुपूरे, कटिबंधापैकी कटिसूत्र, कांची, मेखला, रसना इत्यादी प्रकार येथील स्त्रिया वापरीत असत.
सातवाहन काळात आणि विशेषतः वाकाटक काळात स्त्रिया मोजकी आणि ठसठशीत आभूषणे वापरीत असत. त्यामुळे पाहणाऱ्यांच्या मनांत ‘कवण कवणा अलंकारिले' असा संभ्रम निर्माण होई. वाकाटकांच्या एका लेखात नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा उल्लेख आढळतो. त्यावरून महसूल, तो गोळा करण्याची पद्धती, अधिकारी वर्ग, त्यांचे अधिकार व सवलती या बद्दलची कल्पना येते.यानंतरच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, शिलाहार यांच्या राजवटी मराठवाड्याशी संबंधित होत्या.
बदामीच्या चालुक्यांचे राज्य महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशावर होते हे ऐहोळी (जि. विजापूर) येथील द्वितीय पुलकेशीच्या शिलालेखावरून कळते. त्यात त्रिमहाराष्ट्रक असा जो उल्लेख आढळतो त्यावरून मराठवाड्याचा अंतर्भात त्यात होत असावा असा एक विचार आहे. पुढे उत्तर चालुक्यांच्या काळातही मराठवाड्याच्या काही भागांवर त्यांचा व त्यांच्या मांडलिकांचा अंमल होता. त्यांनी बांधलेली अनेक मंदिरे आणि अभिलेख याचे साक्षीदार आहेत. या मंदिरांच्याद्वारे लोकांची उपासना पद्धती, कारीगारी, कलासक्तता, आर्थिक व्यवस्थापन यासंबंधीचे अंदाज बांधता येतात तर अभिलेखातून राज्यकारभार, अधिकारपदे, समाजरचना, धार्मिक परंपरा सासंबंधीची माहिती मिळते. चालुक्यांच्या कारकीर्दीतच कलचुरींनी राज्यकारभार हाती घेतला होता. वीस-पंचवीस वर्षेच त्यांची राजवट होती. मराठवाड्याच्या धार्मिक जीवनावर परिणाम करणारी ही कारवाई ठरली. कारण याच वेळी कलचूरींच्या प्रधानाने वीरशैव पंथाची स्थापना केली.
बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्य या दोन राजवटींच्या दरम्यान राष्ट्रकुटांचे प्रबल घराणे मराठवाडयाचेच होते. लत्तलूरपुरवराधीश्वर हे त्यांचे बिरुद होते. म्हणजे हे लातूरचे घराणे होते. यांनी मध्यप्रदेश, गुजरात आणि गंगेपर्यंतचा प्रदेश यावर धडक मारली होती. प्रतिहार, परमार, पाल या घराण्यातील राजांना पराभूत केले होते. दक्षिणेतील पल्लवांचाही पराभव केला होता. मराठवाड्यातील कंधार (जि. नांदेड) येथे त्यांची उपराजधानी होती. साहजिकच तेथे राजवाडाही होता. काही मातब्बर इतिहासकारांचे मते (फ्लीट, आळतेकर ठोसर) वेरुळ हे यांचे राजधानीचे ठिकाण होते. मराठवाड्याच्या संस्कृतीवर आणि तेथील संस्कृतीचा प्रभाव या काळात सर्वत्र पसरला होता. जीवनाला सर्वस्पर्शी ठरणाऱ्या विषयांची या काळात प्रगती झाली होती. भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती या काळात लक्षणीय उंची गाठणारी ठरली. तशातच या राजांनी शैलगृहे घडविण्याचे कार्य मनावर घेतले आणि कैलास सारखे अभूतपूर्व मंदिर निर्माण केले. त्यांचा उदो उदो त्यामुळे सर्वतोमुखी झाला. राष्ट्रकूट राजांनी अरबी व्यापाऱ्यांशी फार सलोखा ठेवून मुसलमानांना धार्मिक स्वातंत्र्य दिले, तेव्हा तुर्कांचे अस्तित्व महाराष्ट्रात जाणवू लागले. त्याचे तेथील समाजावर दूरगामी परिणाम झाले. ह्याची दखल घ्यावी लागते. राष्ट्रकूटांनी निर्माण केलेल्या कलावैभवाला कालांतराने तडे जातील हे या सम्राटांच्या ध्यानीमनीही आले नव्हते असे दिसते. मराठवाड्याच्या या राजकुलाने सव्वादोनशे वर्षांची दीर्घ कारकीर्द गाजवली होती हे मात्र खरे.
प्राचीन कालखंडाच्या शेवटच्या टप्पात महाराष्ट्रावर देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. जवळपास त्याच सुमाराच्या आसपास कोंकण कोल्हापूर पट्ट्यात शिलाहार घराण्याचे राज्य होते. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी की हे राजे स्वतःला तगरपुरवराधिश्वर असे म्हणवून घेत. तगर म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील गोरोबाकाकांचे तेर असे आता सर्वजणच मानतात. शिलाहारांच्या अनेक घराण्यांपैकी उत्तर कोंकण, दक्षिण कोंकण आणि कोल्हापूर येथील घराणी अधिक महत्वाची होत. यातील काही राजे धोरणी, तर काही पराक्रमी होते म्हणून तर भोवतीच्या कधी राष्ट्रकूट तर कधी चालुक्य राजांच्या तावडीत फारसे न सापडता दीड-दोनशे वर्षे ही मंडळी राज्य करु शकली. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्यापैकी अपरार्क ह्या साहित्य आणि संगीतात गती असलेल्या राजाने याज्ञवल्क्य स्मृतीवरील अपरार्क टीका लिहून आपली विद्वत्ताही सिद्ध केली होती. (लेख- मराठवाडा: इतिहास व संस्कृती. डॉ. गो.बं. देगलूरकर, मराठवाडा वारसा आणि सद्यस्थिती खंड १, संपादक, डॉ. मारुती आवरगंड, श्री विठ्ठल कदम)
मध्ययुगीन मराठवाडा
यादव राजेही येथील परंपरेनुसार आधी मांडलिकच होते. पण या यदुकुलातील भिल्लम (सन १९८४ -९१), सिंघण (१२५० - ४७), कृष्ण (१२४७-६०), महादेव (१२६०- ७१) आणि रामदेव (१२७९-१३०९) यांनी स्वबळाने आणि पराक्रमाने आपली सत्ता स्थापन केली आणि सर्वदूर आपला दरारा निर्माण केला. या पैकी भिल्लमाने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली आणि दक्षिणेचा सम्राट म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. सिंघण यादव हा अत्यंत पराक्रमी आणि फार धडाडीचा राजा होता. याचा नातू राजा कृष्ण याने बल्बनच्या अधिपत्याखाली असलेल्या मुसलमानी सैन्याला पराभूत केले. कृष्णाचा धाकटा भाऊ महादेव याने सोमेश्वर शिलाहारावर हल्ला चढवला. सोमेश्वराच्या आरमाराचा समुद्रात पाठलाग करून त्याच्यासह जहाजांच्या सर्वच काफिल्याला जलसमाधी दिली. मराठवाड्याच्या सत्ताधीशाने आरमारी लढाई केल्याचे बहुधा हे पहिले उदाहरण असावे. रामदेव हा शेवटचा यादव नृपती. प्राचीन मराठवाड्याचा शेवटचा हिंदूराजा. याने वाराणसीमधून मुसलमानांना हाकलून दिले व तेथे शारंगधराचे एक सुवर्णमंदिर बांधले. ही घटना बहूधा दिल्लीचा सुलतान बल्बन याचा मृत्यू आणि जलालुद्दिनाचे राज्यारोहण यांच्या मधल्या काळात घडली असावी असे मु. ग. पानसे (यादव कालीन महाराष्ट्र, 19६३ पृ. 3४) यांचे अनुमान आहे.
रामदेवराय पराक्रमी खरा पण सावधचित नव्हता; अखंड सावधान नव्हता. त्यामुळे दिल्लीहून आलेल्या अल्लाउद्दिनचे चांगलेच फावले आणि घात झाला. घात झाला तो केवळ रामदेवाचा नव्हे, तो मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा घात होता. तो घात साऱ्या हिंदू राजांचा होता, सत्तेचा होता. पुढे काही काळ दिल्लीहून स्वाऱ्या होतच राहिल्या. रामदेव पुत्र शंकरदेव व जावई हरपालदेव यांचे प्राणपणाने स्वतंत्र होण्याचे निकराचे प्रयत्न निरुपयोगी ठरले आणि सुलतान महंमद तुघलकाने देवगिरीचे दौलताबाद केले. या नामकरणातून दोन प्रवृत्ती लक्षात येतात. देवांचे वास्तव्य मानणारे आधीचे राज्य आणि संपत्तीलोलूप दुसरे नंतरचे.
यानंतरच्या काळात मराठवाड्याभोवती मुसलमानी सत्तेचा विळखा पडला. कधी तो बहामनींचा, कधी नगरच्या निझामशाहीचा तर कधी आदिलशाहीचा. सरते शेवटी हैद्राबादच्या निझामाच्या संस्थानात हा प्रदेश खितपत पडला. १९४८ मध्ये हैद्राबाद संस्थान विलीन झाले आणि मराठवाड्याचा वनवास संपला. प्राचीन काळी राजकीय आणि सांस्कृतिक बाबतीत आघाडीवर असलेला मराठवाडा नंतरच्या मुसलमानी सत्तेच्या काळात मागासला. त्याच्या सुधारणेची गती अजूनही धीमीच आहे. भांडकुदळपणात कमी पडणाऱ्या, योग्य दूरदर्शी नेतृत्वाभावी त्याच्याकडे जावे तसे लक्ष अजूनही सत्ताधीशांचे जात नाही. त्याच्या सोशिकतेचे, संत- शिकवणीमुळे झालेल्या सात्विकपणाचे हे त्यांच्या वाट्याला आलेले फळ म्हणायचे! प्रागैतिहासिक काळातील मराठवाड्याचा हा झाला मागोवा. (लेख- मराठवाडा: इतिहास व संस्कृती. डॉ. गो.बं. देगलूरकर, मराठवाडा वारसा आणि सद्यस्थिती खंड १, संपादक, डॉ. मारुती आवरगंड, श्री विठ्ठल कदम)
मराठवाड्याची संस्कृती
भौतिक आणि मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. राजकीय स्थिती, घरे, नगररचना, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी मानवाच्या ऐहिक वा भौतिक प्रगतीच्या निदर्शक असतात. इंग्रजीत याला सिव्हिलायझेशन म्हणतात पण संस्कृतीची दुसरी बाजू म्हणजे मनोमय सृष्टी. यात अध्यात्म, तत्त्वज्ञान, धर्म, कला, साहित्य यांचा समावेश केला जातो. हे झाले इंग्रजीतील 'कल्चर'. आपण आत्तापर्यंत पाहिले की प्राचीन काळात राजकीयदृष्ट्या मराठवाड्याचे कार्य विशेष महत्त्वाचे होते.
मराठवाड्यावर राज्य करणाऱ्या घराण्यांची महाराष्ट्रावर तसेच भोवतीच्या प्रदेशावर सत्ता होती. कर्नाटक, आंध्र, गुजरात या राज्यांवर बहुधा प्रत्यक्ष नि क्वचित वेळा अप्रत्यक्ष (म्हणजे मांडलिकांमार्फत) या घराण्यांचेच राज्य असायचे. प्राचीन काळातील घटनांवर मराठवाड्याचा विशेष ठसा होता. असे म्हणण्याचे कारण असे की त्याकाळी एक तर या राज्यकर्त्यांची राजधानी मराठवाड्यातच असे किंवा ती मराठवाड्याच्या सीमेवर असे की ज्यामुळे मराठवाड्याच्या काही भागाचा समावेश राजधानीच्या भागातच (होम प्रॉव्हिन्स) असायचा. येथील राजकीय सत्तांपैकी प्रबळ होत्या त्या सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादव यांच्या. पैकी पहिल्या दोन्हींचे मूळ वस्तिस्थान मराठवाड्यातलेच. यादवांच्या संबंधात असे म्हणता येते की मराठवाड्याला मोठे केले ते त्यांनी आणि त्यांना साम्राज्य स्थापण्याची संधी दिली ती मराठवाड्याने सुमारे दोनशे वर्षे यादवांनी साऱ्या दक्षिण भारतावर अधिराज्य गाजवले ते मराठवाड्याला शक्तिकेंद्र करूनच. पैठण, कंधार, बहुधा वेरुळ आणि देवगिरी ही राजधानीची शहरे मराठवाड्यातील आणि मान्यखेट, कल्याण (बसवकल्याण) या राजधान्या मराठवाड्याच्या सीमेलगत होत्या. शिलाहारांनी कोकण-कोल्हापूर भागात पराक्रम गाजवला तरी ते मूळचे मराठवाड्यातीलच तर होते! या शिवाय कित्येक मांडलिकांच्या राजधान्याही येथेच होत्या. वहनीकुल, वाजीकुल हे कल्याणी चालुक्यांचे मांडलिक आणि अमर्दकपूर (औंढा, जि. हिंगोली) येथील रट्ट घराण्याच्या राजधान्या काय की कलचुरींच्या कुंभारी, मुरुम या उपराजधाऱ्या काय या सर्व येथल्याच होत.
हा सर्व आढावा घेण्याचे कारण असे की यावरून असे लक्षात यावे की राजांच्या व सम्राटांच्या येथील वास्तव्याचा, आचार-विचारांचा प्रभाव येथील समाजाची जडण-घडण होण्यास नक्कीच कारणीभूत झाला असणार. शुक्रनीतितील दोन सिद्धांताकडे लक्ष दिल्यास यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता राहणार नाही. 'राजा कालस्य कारणम्' आणि 'यथा राजा तथा प्रजा', 'हुकूमशाहीत वा सरंजामशाहीत त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक जडण-घडणीत राजांच्या विचारांचा मोठा वाटा असतो. प्रजाजनांवर त्यांच्या विचारांचा, आवडी-निवडींचा प्रभाव पडत असतो. आणि राजेलोक कल्याणकारी विचारसरणीचे असतील तर याची शक्यता अधिक असते. मराठवाड्यातल्या सांस्कृतिक जीवनाला घाट दिला गेला तो राजांनी व त्यांच्या सरदारांनी प्रारंभी केलेल्या वा पुरस्कृत केलेल्या प्रथांनी, आणि येथे रुजलेल्या या प्रथांचे लोण साऱ्या महाराष्ट्रभर यथाकाल पसरले असणार. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्राचीन काळात नवकल्पना निर्मितीचे व सांस्कृतिक प्रगतीचे स्त्रोत सातत्याने मराठवाड्यानेच पुरविले होते. तेथे असलेल्या सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या राजकुलांच्या राजधान्यांमुळे पंडित, शास्त्रज्ञ, विद्वान, कलावंत, उद्योगपती व व्यापारी (परदेशीय सुद्धा) यांचे सततचे वास्तव्य मराठवाड्यातच राहिले. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंचा, कलाकृतींचा, कल्पनांचा पहिल्यांदा लाभ व्हायचा तो स्थानिकांना संस्कृतीला लाभलेले अनेक आयाम आणि त्यांच्यात झालेली प्रगती मुळात येथली, मग त्यांचा प्रसार साऱ्या महाराष्ट्रात आणि शेजारच्या प्रदेशात झाला. पैठण, तेर, देवगिरी ही भरभराटीला आलेली व्यापारी केंद्रे होती याचा वर उल्लेख झालेला आहेच. येथूनच परदेशांत आणि परदेशातून व्यापारी मालाची ने आण होत असे. साहजिकच संस्कृतीच्या संबंधातील कल्पनांची देवाण घेवाण होत असणार. यांचा पहिल्याचा स्वीकार मराठवाड्यात होत असणार आणि तेथूनच सर्वदूर त्यांचे प्रसारण होत असणार.
शिल्प आणि स्थापत्याच्या क्षेत्रात तर मराठवाडा नेहमीच अग्रेसर होता. त्याचा वरचष्मा होता. या क्षेत्रातील त्याचे योगदान वाखाणण्याजोगे होते. भाजे, बेडसे, कोण्डाणे येथील शैलगृहे कालक्रमदृष्ट्या आधीची आहेत यात शंकाच नाही पण उत्कृष्ट शैलगृहे घडविण्याचे श्रेय जाते ते मराठवाड्याकडेच. वेरुळ येथील कैलास लेणे हे या क्षेत्रातील संपरिपूर्ण परिष्कृततेचे उत्तम उदाहरण ठरावे. ते कळसापासून पायापर्यंत 'आधी कळस मग पाया रे' या पद्धतीने कोरले गेले हे तर खरेच, पण ते 'देव देऊळ परिवारु । कोरुनि काढिला डोंगरु । ऐसा भक्तीचा व्यवहार । का न व्हावा ।। असे भक्ती व्यवहारातील अद्वैत कसे असावे याचे उदाहरणही ठरणारे लेणे आहे. तात्पर्य की मराठवाड्याने कलेसाठी कला असे न मानता जीवनासाठी तिचा उपयोग व्हावा ही दृष्टी बाळगली होती. (लेख मराठवाडा: इतिहास व संस्कृती. डॉ. गो.बं. देगलूरकर, मराठवाडा वारसा आणि सद्यस्थिती खंड १, संपादक, डॉ. मारुती आवरगंड, श्री विठ्ठल कदम)
- अंबाजोगाई मराठी भाषेचा उगम येथे झाला व पुरातन काळात असेलेली हत्तीखाना, बाराखंबी मंदिर येथेच आहे.येथे पहिला मराठी ग्रंथ या ठिकाणी श्री मुकुंदराज स्वामी यांनी लिहला.
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव, इक्ष्वाकू या सारख्या मराठी लोकांचे राज्य होते. तर ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते. नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत राज्य केले.[२] भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला. १७ सप्टेंबरला मराठवाड्याला हैदराबाद संस्थानातून स्वातंत्र्य मिळाले. १ नोव्हेंबर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.[३]
स्वातन्त्र्योत्तर काळात काँग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व नंतर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमंत्री, अर्थमंत्री ईत्यादी केन्द्रीय मंत्रिपदेही सांभाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता. विकास क्षेत्रातील.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
भौगोलिक स्थान
मुख्य शहरे
- छत्रपती संभाजीनगर : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजी नगर येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे. याच जिल्ह्यात बिबी का मकबरा, अजिंठा - वेरूळ लेण्या,दौलताबाद किल्ला आणि जायकवाडी धरण आहे. पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. येथेच छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेकडून गोदावरी ही नदी वाहते.
- अंबाजोगाई अंबाजोगाई हे शहर बीड जिल्ह्यातील मुख्य शहर म्हणून ओळखले जाते. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख आहे. या शहराला शिक्षणाची पंढरी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे. अंबाजोगाई शहराला प्राचीन काळापासून खूप वारसा आहे. या शहरातून मराठी भाषेचा उगम झाला होता. या तालुक्यात तुम्हाला माता योगेश्वरी देवी मंदिर, मराठी भाषेतील पहिला मराठी ग्रंथ लिहणारे मुकुंदराज स्वामी यांची समाधी येथे आहे.
- सिल्लोड : हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि प्रगतशील शहर आहे. तालुक्यात अंधारी आणि अजिंठा सारखी मोठी गावे आहेत की तालुक्याचा प्रगतीत मोठा हातभार लावतात.
- धाराशिव : या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत. या शहराजवळून भोगावती नदी वाहते. याच जिल्ह्यात तुळजापूर येथे तुळजभवानी माता मंदिर आहे. तसेच लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या काळभैरवनाथ श्री क्षेत्र सोनारी याच जिल्ह्यात आहे. अनेक धार्मिक पर्यटन स्थळे या जिल्ह्यात आहेत.
- जालना : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केंद्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. इथे स्टील उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. याच जिल्ह्यात भोकरदन हे प्राचीन शहर वसलेले आहे. जालना मधील श्रीक्षेत्र राजूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे राजुरेश्वर गणपतीचे खुप भव्यदिव्य असे मंदिर आहे.
- नांदेड : ह्या शहराला मराठवाड्याची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण इथलेच आहेत.
- परभणी : परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
- बीड : बीड ला पांडवकाळात दुर्गावतीनगर म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावती राणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चंपावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मंदिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम आहे.
- लातूर : लातूर हे मराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात लातूर आकृतिबंध (पॅटर्न) निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख इथलेच आहेत.
- हिंगोली : हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे. औंढा नागनाथ हे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर याच जिल्ह्यात आहे.
- परळी वैजनाथ परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. या शहरात बीड जिल्ह्यातील रेल्वे जंक्शन आहे. या शहरात औष्णिक विद्युत केंद्र आहे. या शहरात अनेक प्रकारची उद्योग चालतात.
महत्त्वाची ठिकाणे
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसी (नामदेव), संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आपेगाव, संत जनाबाईचे जन्मगाव गंगाखेड, शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथरी, संत एकनाथांचे पैठण, समर्थ रामदासांचे जन्मगाव जांब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर, शीख धर्मीयांचा नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
- परळी वैजनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
- अंबाजोगाई सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक व ऐतिहासिक वारसा
- माहूर धार्मिक पर्यटन केंद्र
- औंढा नागनाथ धार्मिक पर्यटन केंद्र
- केदारेश्वर देवालय - केदारेश्वर देवालय शिल्प स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना
- कल्हाली, ता. कंधार, जि. नांदेड - निजामकालीन जहागिरीचे गाव, ३५ हुतात्म्याचे ग्रामकेंंद्र, ब्रह्मदेवाचे देवस्थान.
- श्री क्षेत्र नारायणगड - मराठवाड्यातील धाकटी पंढरी
- श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान, बीड तालुका
- कपिलधार धबधबा, मांजरसुम्भा, बीड
- श्री क्षेत्र माऊली महाराज मंदिर,चाकरवाडी ता.केज जि.बीड
- श्री क्षेत्र मच्छिन्द्रनाथ, सावरगाव मायंम्बा, ता आष्टी जि बीड
- श्री क्षेत्र पिंपळनेर गणपतीचे
- श्री क्षेत्र भैरवनाथ, जरुड ता बीड
- श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर ता.तुळजापूर जि. धाराशिव
- श्री काळभैरवनाथ (सिद्धनाथ) सोनारी ता.परांडा जि.धाराशिव
- नळदुर्ग किल्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव
- नळदुर्ग व अणदूर खंडोबा देवस्थान ता.तुळजापूर जि. धाराशिव
- चालुक्यकालीन केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी
- धर्मापुरी किल्ला
- भुईकोट किल्ला, किल्ले धारूर, धारूर जि. बीड
- आसरादेवी मंदिर असरडोह, ता.धारूर, जि.बीड
नद्या
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
गोदावरी : मराठवाड्यातून गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अंतरापर्यंत तिने छत्रपती संभाजीनगर बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिन्धफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
'मांजरा : पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समांतर असा होतो. बऱ्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, धाराशिव-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नांदेड जिल्ह्यात कुण्डलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिन्धफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नंतर पूर्वेकडे व तदनंतर पुन्हा उत्तरेकडे, किंबहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिन्दुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिन्धफणा नदीस मिळते. कुंडलिका ही सिन्धफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिन्धफणा नदीस मिळते.
सिना : जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अंतरापर्यंत तिने अहिल्यादेवीनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे.[ संदर्भ हवा ]
कयाधू : नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनते.
मनकर्णिका - बीड व माजलगाव तालुक्यातील नदी. पुढे सिंदफनाला मिळते. आंबेसावळी ता बीड येथे मनकर्णिका १ प्रकल्प व लिंबारूई देवी येथे मनकर्णिका २ सिंचन प्रकल्प या नदीवर आहेत वाण वाण ही नदी बीड जिल्ह्यातील प्रमुख नद्यापैकी एक आहे. या नदीचा उगम धारुरच्या घाटातून होतो आणि ही नदी पुन्हा गोदावरीला जाऊन मिळते. या नदीवर नागापूर चे धरण आहे.
प्रशासन
महसूल
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग तयार झाला आहे. विभागाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. विभागीय आयुक्त हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा
- धाराशिव जिल्हा
- जालना जिल्हा
- नांदेड जिल्हा
- परभणी जिल्हा
- बीड जिल्हा
- लातूर जिल्हा
- हिंगोली जिल्हा
न्यायदान
सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते.
अर्थव्यवस्था
मराठवाडा हा प्राचीन काळापासून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने अत्यंत समृद्ध राहिलेला आहे. मराठवाड्याची आर्थिक स्थिती अभ्यासताना सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव आणि मुस्लिम राजवट कालीन आर्थिक जीवन समजून घ्यावे लागेल. आर्थिक दृष्टिकोनातून मराठवाड्याची चिकित्सा करताना त्या काळातील आर्थिक जीवन स्पष्ट करावे लागेल. गोदाखोरे हे मराठवाड्यातील सर्वात विस्तृत व समृद्ध खोरे आहे. मराठवाड्याचा बराचसा भाग या खोऱ्याने व्यापला आहे. या भूमीने प्राचीन काळपासून ते आजपर्यंत अनेक आर्थिक चढउतार पाहिलेले आहेत. मराठवाड्याने प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडात देशाच्या आर्थिक विकासात ऐतिहासिक योगदान दिले आहे. विशेषतः भारताच्या आर्थिक विकासाच्या जडणघडणीतही मराठवाड्याने महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार क्षेत्रात आपली ओळख प्राचीन व मध्ययुगीन काळात निर्माण केली आहे. प्राचीन काळात अनेक व्यापारी केंद्रे किंवा नगरे भरभराटीस आली होती. तेर, भोकरदन (भोगवर्धन) व पैठण (प्रतिष्ठान) या सातवाहन काळातील प्रसिद्ध व्यापारी बाजारपेठा होत्या. या व्यापारी केंद्रातून परदेशात माल पाठविला जात असे. मराठवाड्यातील आर्थिक समृद्ध वारसा कशा होता यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
प्राचीन काळापासूनच भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील सामाजिक आणि आर्थिक जीवन कृषीवरच अवलंबून आहे. लोक वर्षातून दोन वेळा आणि क्वचित प्रसंगी तीन वेळा पीक घेत असत. शेती ही मान्सुनवर अवलंबून असे. शेतीमधून अन्न-धान्य निर्मिती आणि रोजगार मिळत असे. सातवाहन काळापासून कापूस हे या परिसरातील मुख्य पीक होते. आजही विशेषतः गोदावरीच्या खोऱ्यात कापूस उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. कृषी उत्पादनावरच येथील उद्योगधंदे आधारित होते. साधारणत: शेतीच्या जमिनीची मालकी राजाची असे. परंतु शेतीकरिता ती निरनिराळ्या लोकांत वाटली जात असे. तत्कालीन लोकांचे जीवन हे कृषीवर आधारित असल्याने त्या काळात कृषी संबंधित सर्व उद्योग विकसित झाले होते. प्राचीन भारतातील लोकांचा पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय होता. प्राचीन काळात हल (लहान लाकडी नांगर) व नांगल (मोठा लोखंडी नागर) असे नांगराचे दोन प्रकार होते. त्या काळात शेतकऱ्यांना हलिक असे म्हटले जात. नांगराचा उपयोग शेती कार्यात वैदिक काळापासून केला जात. दूध, दही, लोणी, तूप आणि दुधापासून बनविलेले अनेक पदार्थ हे लोकांचे प्रमुख अन्नपदार्थात मोडत असल्यामुळे दूध देणारे प्राणी पाळण्यावर लोकांचा सर्वाधिक भर होता. गाय, बैल, घोडा, गाढव, बकरी, मेंढी, कुत्रा, हत्ती, डुक्कर, व खेचर हे प्राणी पाळले जात होते.
भारतीय व्यापारी परंपरा चार हजार वर्षे जूनी आहे. प्राचीन काळात भारताचा विदेशी व्यापार सुद्धा भरभराटीस आला होता. व्यापारी लोकांना समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा व महत्त्व होते. विदेशी व्यापार जलमार्गाने होत असे. बौद्ध जातक कथात समुद्र प्रवासाची वर्णने व अनेक बंदराची माहिती उल्लेखनीय मिळते. व्यापारी लोक राजस्थान मार्गे नरकच्छ व शूर्पारक या बंदरातून बेबीलोनला जात. भारताचा चीन, मांचुरीया, जपान, इराण, ग्रीक, सिलोन, इजिप्त, मेक्सिको, बेबीलोन, रोम, अमेरीका, जावा, मलाया, सवर्णद्वीप व अरब देशांशी व्यापार चालू होता. तसेच विदेशी व्यापारी सुद्धा भारतीय बंदरात येऊन मालाची खरेदी-विक्री करीत. भारतातून विविध प्रकारच्या वस्तू विदेशात पाठविल्या जात आणि त्याचे मूल्य म्हणून परदेशातून विपूल सोने मिळत असे. चीन व ब्रह्मदेशातील माल भारतातील व्यापारी केंद्रातून पाश्चात्य देशाकडे पाठवला जात असे. भारतीय व्यापारी चीनी रेशमी वस्त्रे विकत घेत व ते पाश्चात देशांना निर्यात करीत. रोमच्या लोकांना भारतीय वस्त्र व आभूषणे आवडत असत. बंगाल आणि तामिळनाडू येथील मलमल जगप्रसिद्ध होती. विदेशी लोकांना भारतातील विविध प्रकारचे पदार्थ व मसाले आणि विविध सुंदर वस्तूंची आवड होती. त्यामुळे भारतातील वस्तूंना परदेशात चांगलीच मागणी होती. मसाल्याचे पदार्थ, सुगंधी द्रव्ये, औषधे, जडीबूटी, हिरे, मोती, लोखंड, तांबे, चंदन, कातडी, सूती व रेशीम कापड, सागाचे लाकूड, वनस्पतीचे बी-बियाणे व रोपे, मलमल, हस्तीदंत व त्यापासून बनविलेल्या वस्तू आणि विविध प्रकारचे पशुपक्षी भारतातून निर्यात केली जात असत.
मराठवाडा हा प्राचीन आणि मध्ययुगीन विदेशी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. मराठवाडयातील व्यापारी विदेशात जाऊन आपल्या मालाची विक्री करीत असत. मराठवाडयातील तेर व पैठण या शहरातील व्यापाऱ्यांचे रोमशी प्रत्यक्ष व्यापारी संबंध होते. पैठणच्या उत्खननात अनेक रोमन अवशेष मिळाले आहेत. मराठवाड्याचा व्यापार हा भूमार्ग, नदीमार्ग व समुद्र मार्गाने केला जाई. घोडे, गाढव, उंट, नौका व बैलगाड़ी ही एकदरीत मालवाहतुकीची साधने होती. व्यापारी हा माल बैलगाडी, गाढवावर, उटावर व घोडयाच्या पाठीवर टाकून वाहून नेत असत. नाव व जहाज ही सुद्धा वाहतुकीची महत्त्वाची साधने होती. देशांतर्गत व्यापारी वाहतूक ही नदीमार्गाने व भूमार्गाने होत असे तर समुद्रमार्गाने परदेशी माल पाठविला जात. प्रवासात चोर व लुटारूंची भिती असल्याने सर्व व्यापारी मिळून एक संरक्षकदल बाळगीत असत. राजासुद्धा व्यापारांच्या संरक्षणाची व्यवस्था करीत.संपूर्ण व्यापारावर राजा नियंत्रण ठेवत. मालवाहतूकीसाठी राजा मार्फतच मार्ग सुकर केले जात. प्रवासात व्यापारी व त्याच्या मालाच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था राजा करीत असे. व्यापारी वर्गावर राजाचे नियंत्रण असावे यासाठी व्यापार किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी राजाची परवानगी घेणे आवश्यक होते.अकराव्या शतकात हिंदू धर्मशास्त्राने परदेशगमन निषिद्ध ठरविल्याने भारतीय व्यापारी परदेशी जाणे बंद झाले. इ.स. १२०० नंतर भारतात मुस्लीम सत्ता पसरु लागल्या. मुस्लिम राज्यकर्त्यांनी समाजावर वर्चस्व निर्माण व्यापारावर ताबा घेतला. व्यापारी क्षेत्रात त्यांचे वर्चस्व निर्माण झाले. अ) प्राचीन कालीन मराठवाड्यातील आर्थिक जीवन १. सातवाहन कालीन:- सातवाहन काळात मराठवाड्यामध्ये संपन्नता आणि वैभवाचे युग सुरू झाले होते. सातवाहनाच्या राजकीय उदयामुळे या परिसराच्या आर्थिक इतिहासात एका नव्या पर्वाचा आरंभ झाला. सातवाहन राज्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणली. सातवाहनांची अर्थव्यवस्था ही कृषी आणि व्यापार क्षेत्रावर आधारित होती. जलसिंचनाच्या सुविधा वाढवल्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने महसुलाच्या उत्पादनातही भर पडली. व्यापाराने सातवाहनांच्या आर्थिक समृद्धीत महत्त्वाची भूमिका पार पडली. सातवाहन राज्यकर्त्यांनी वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अंतर्गत व्यापारात वाढ झाली. सातवाहन काळात अनेक नगराची व व्यापारी बंदराची निर्मीती झाली. त्यांच्या समृद्धीचे चित्र त्यांनी कोरलेल्या लेण्यातून समजू शकते. तसेच परकीय प्रवाशी प्लिनी, टॉलेनी, एरीमन आणि पेरीप्लसने त्यांच्या लिखाणातून सातवाहन काळातील समृद्धीचे स्वरूप समजते. सातवाहन काळात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत व्यापारात मोठया प्रमाणात वाढ झाली. सातवाहनांची गलबते रोममधील अथेन्सला पोहचू लागली. भारतीय उत्पादनाला पाश्चिमात्य बाजारपेठा उपलब्ध झाल्या. सातवाहन काळात लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच होता. सातवाहन कालीन प्रतिष्ठान, तेर, भोकरदन आदि परिसरात जे उत्खनन झाले त्यात अन्नधान्याचे अवशेष फार मोठ्या प्रमाणात हाती लागले. या काळात तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकविला जात होता. हरबरा, एरंडी, भूईमूग आदि द्विदल धान्याचे व कडधान्याचे पीक घेतले जात होते. मराठवाड्यातील जमीन गहू, कापूस, ज्वारी या कडधान्याच्या उत्पादनासाठी उत्तम होती. गाथा सप्तसतीमध्ये शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या औजारांचा तपशील दिला आहे. शेतीसाठी बैलांचा वापर केला जात होता. या काळात सामान्यत: दोन पिके काढण्याची पद्धत होती. पैठणसारख्या नदीकाठच्या शहरात पुराचे, महापुराचे संकट सातत्याने जाणवत असे.
या काळात अनेक नगरांची निर्मिती करून व्यापाराला राजाश्रय दिल्याने आर्थिक प्रगती सुरू झाली. या काळात तेर, भोगवर्धन, कोल्हापूर, जुन्नर आणि पैठण ही प्रसिद्ध व्यापारी केंद्रे होती. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन दिल्यामुळे सातवाहनांची अर्थव्यवस्था भक्कम बनली. सातवाहनांनी पश्चिम किनाऱ्यावरील बाजारपेठा काबीज केल्या. व्यापारी बंदरांची निर्मिती केल्याने भारतीय उत्पादनाला पाश्चिमात्य बाजारपेठा उपलब्ध झाल्या. या काळात युरोपीयांशीही व्यापार सुरू झालेला होता. त्याठिकाणी तयार होणारे रेश्मी वस्त्रे तलम कपडे, हस्तिदंती वस्तू आणि पैठण येथे तयार होणारी पैठणी साडी या वस्तू व मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जाऊ लागले. युरोपियन बाजारपेठेत हस्तिदंती वस्तू व रेश्मीवस्त्राला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्या मोबदल्यात युरोपीयांकडून सोने व चांदीचा ओघ भारताकडे सुरू झाला. त्यामुळे ‘स्ट्रेबी' या विचारवंताने सातवाहन राजाकडून येणाऱ्या महागडया वस्तूच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी रोमन सम्राटाकडे केली होती. इ.स. दुसऱ्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापार शिगेस पोहचल्याचे सातवाहनांच्या चलनातील चांदीच्या नाण्यावरून अनुमान निघते.
सातवाहन आणि रोम याचे प्रत्यक्ष संबंध असल्याचे आता उत्खननातून स्पष्ट झाले आहे. पैठण, नेवासा, भोकरदन आणि तेर आदि ठिकाणी सातवाहन घरासोबत रोमन पद्धतीचे घरे आढळले आहेत. रोमन घरात प्रामुख्याने रोमन नाणी, खापरे, मुर्ती, नाणी इत्यादी वस्तू सापडल्या आहेत. रोमच्या ऐतिहासिक कागदपत्रातूनही या संबंधाचा उल्लेख येतो. रोमन सम्राट ट्रॉमबेरस (इ.स. १४ ते ३७) चे एक चांदीचे नाणे पैठण येथे सापडले आहे. यावरून ख्रिस्त शताब्दी पुर्वीपासून पैठण व रोमचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. तसेच रोमन सम्राटांच्या प्रतिकृती असणारे अनेक मातीची पुतळे भोकरदन, पैठण व तेर येथे सापडले आहेत. व्यापाऱ्यांनी सातवाहन साम्राज्यातील मालाला युरोपीयन बाजारपेठ उपलब्ध करून दिली. जलमार्गाने होणाऱ्या व्यापारास संरक्षण दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास झाला. पैठण हे सातवाहनाच्या राजधानीचे ठिकाण असून ते अनेक शतके व्यापारी केंद्र बनले. ते भारतातील सर्व प्रमुख व्यापारी पेठांशी जोडले होते. एकंदरीत सातवाहन काळात लाभलेल्या राजकीय स्थैर्यामुळे आर्थिक विकासाला मोठा वाव मिळाला.
2) वाकाटक कालीन आर्थिक स्थिती:-मराठवाड्यात सातवाहनांच्या अस्तानंतर वाकाटक सत्ता राज्य करत होती. वाकाटक गुप्तांचे समकालीन होते. गुप्तांचे सुवर्णयुग दक्षिणेत आणण्याची जबाबदारी वाकाटक सत्तेने पार पाडली. वाकाटक काळात आर्थिक सुबत्ता होती. पण वाकाटक सत्तेचे प्रभाव क्षेत्र मराठवाड्यात कमी आणि विदर्भात अधिक होते. राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे भूमीकर होय. राज्यातील प्रजा सुखी आणि समृद्ध होती. राजकीय स्थैर्य प्राप्त झाले होते.वाकाटक काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच होता. शेतीमध्ये रब्बी आणि खरीप पिके घेतली जात असत. तांदुळ, चरु, जब, ज्वारी, कापूस, हरभरा, एरंडी, भुईमुग, तीळ, मसुर, मूग, मिरची, अद्रक, हळद, अलसी व सरस या पिकांचे उत्पादन घेतले जाई. तसेच अनेक प्रकारच्या वृक्षांचीही लागवड केली जात असे. औषधीयुक्त वृक्ष मोठ्या प्रमाणात लावले जात. विविध फळांची झाडेही लावली जात. अंगूर, शाक व ईख ही महत्त्वाची फळ झाडे होती.
कालवे, पाटबंधारे, विहिरीच्या पाण्यावर शेती केली जात असे. कालवे व पाटबंधाऱ्यातून राज्यामार्फत शेतीला पाणीपुरवठा केला जात असे. त्या मोबदल्यात काही कर शेतकऱ्यांकडून घेतला जात असे. पशुपालन हा शेतकऱ्यांचा पुरक व्यवसाय होता. शेती बैलाच्या मदतीने केली जाई. गाय, म्हैस, बैल, शेळया मेंढ्या यांचे पालन शेतकरी करीत असे. पशुपालन हे शेतोपयोगी होते. वाकाटक काळात उद्योगधंदे व व्यवसायाचा फार विकास झाला. वाकाटकांच्या काळात अनेक शहरे उदयास आली होती. पैठण, तेर, भोकरदन येथील व्यापार उदीम वाढला होता. त्यामुळे अनेक उद्योग व व्यवसाय भरभराटीस आले होते. कापड उद्योग हा सर्वात मोठा होता. पैठण हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध होते. या काळात कलाकुसरीचे काम प्रसिद्ध होते. सुवर्ण, चांदी, ब्रांझ धातूच्या कौशल्यपूर्ण नक्षीदार कलाकृती तयार करणारे व्यवसाय उदयास आले होते. प्रवासात व्यापाऱ्यांचे व त्यांच्या मालाचे चोर, दरोडेखोर, लुटारू व जंगली प्राण्यापासून रक्षण करण्याचे काम थल नियामक नावाची व्यक्ती करीत असे.वाकाटक कालखंडात शेती, पशुपालन, विविध व्यवसाय, उदयोगधंदे व व्यापार यांची भरभराट झाल्याने मराठवाडा आर्थिक दृष्टया समृद्ध बनला होता.
3) बदामीचे चालुक्यकालीन आर्थिक स्थिती:- बदामीचे चालुक्य घराणे प्राचीन भारतीय इतिहासात सुप्रसिद्ध आहे. बदामी चालुक्यांची सत्ता दख्खनच्या बहुतेक भागावर पसरली होती. त्यांनी बांधलेल्या अनेक देवालयांत एका विशिष्ट स्थापत्य पद्धतीचा उपयोग केलामुळे ती चालुक्य स्थापत्य पद्धती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या काळी संस्कृत व कन्नड भाषांत अनेक उत्तम प्रकरणे, काव्ये रचली आहेत. या राजसत्तेविषयी थोडी माहिती यूआन च्वांग या चिनी यात्रेकरुच्या प्रवास वर्णनावरून आणि चरित्रावरून मिळते.६४१-४२ मध्ये चिनी यात्रेकरून यूआन च्वांग त्याच्या दरबारी आला होता. यूआन च्वांग त्याला महाराष्ट्राचा अधिपती म्हणतो. इराणचा राजा द्वितीय खुसरौ याचा या वंशातील दुसरा पुलकेशी राजाशी पत्रव्यवहार व राजदूतांची देवघेव झाली होती, त्याविषयीचा एक उल्लेख एका फार्सी बखरीत आढळतो. पुलकेशीने इराणचा राजा द्वितीय खुसरौ (खुस्रव) यास नजराणा व हत्ती पाठवून त्याच्याशी ६२५ च्या सुमारास राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. उत्तरेस नर्मदेपर्यंत त्याचे राज्य पसरल्यामुळे त्याने नासिक येथे आपली दुसरी राजधानी केली असावी. सामान्यतः यांची नाणी अद्यापि सापडली नाहीत. गुजरातेत स्थापलेल्या घराण्यातील जयाश्रय राजाचे नाणे सापडले आहे. त्यावरून बदामीच्या मुख्य घराण्याची नाणी पुढेमागे सापडतील.
४) राष्ट्रकुट कालीन आर्थिक स्थिती:- राष्ट्रकूटांच्या कालखंडात मराठवाड्याची आर्थिक स्थिती अत्यंत संपन्न आणि समृद्ध होती. याची पुढील महत्त्वाची कारणे आहेत. १) राष्ट्रकूट साम्राज्यातील प्राकृतिक रचना ही आर्थिक स्थिती संपन्न बनवण्यास महत्त्वाची ठरली. या प्रदेशातील सुपीक जमीन, खनिज संपत्ती आणि हवामान यांचा मोलाचा वाटा आहे. २) कृषी हा येथील मुलभूत व्यवसाय असून याच व्यवसायातून अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आणि यातूनच सामान्य जनतेचे आर्थिक जीवन समृद्ध बनले होते. ३) राष्ट्रकूट काळात अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला होता. व्यापाराने आर्थिक समृद्धी वाढली. ४) राष्ट्रकूटांनी आपल्या साम्राज्याच्या सीमा नेहमी विस्तारीत करण्याचा प्रयत्न केला आणि नव्याने जिंकलेल्या प्रदेशातून बरीच संपत्ती मराठवाड्यात आणली.
राष्ट्रकूट कालखंडात काळी कसदार कापसाची जमीन मोठ्या प्रमाणात असल्याने या जमिनीतून मिळणारे उत्पादनही उत्कृष्ट दर्जाचे असे. अरब प्रवाशांनी ही पश्चिम भारतातील सुपीक जमिनीचे वर्णन केले आहे आणि यातील धान्याचा दर्जा उच्च असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रकूटांच्या काळात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन काढले जाई. मराठवाड्यात पहिल्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत सुती वस्त्राची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत होती. गाथा सप्तशती मध्ये कपासीचे उल्लेख आहेत. कपासीची लागवड, वेचणी, राखण याचे वर्णन यात आले आहे. मराठवाडयात तेर, भोकरदन या ठिकाणच्या उत्खननात धान्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत." हालच्या गाथासप्तशतीमध्ये तत्कालीन कृषी उत्पादनाच्या भिन्न प्रकाराची नाहिती मिळते. सामान्यतः तांदूळ मोठया प्रमाणावर पिकवला जात होता. त्या कालखंडात पर्जन्यमान तुलनात्मकरित्या अधिक असावे. तांदूळाशिवाय एरंडी, भुईमूग, द्विदल धान्य व कडधान्याची पिके घेतली जात होती. राष्ट्रकूट काळात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे गावचा हिशेबनीस, सुतार, मजूर इत्यादीचे पगार किंवा मजुरी तांदळामध्येच दिली जाई. दुसरे महत्त्वाचे पीक म्हणजे ऊस होय. याच बरोबर राष्ट्रकूटकाळात मधाचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात होत असे. इ.स. ९५६ मध्ये आलेल्या इब्न- हौकल या अरबी प्रवाशाने याचे वर्णन केले आहे.
राष्ट्रकुटांची पहिली राजधानी आजचे वेरुळ म्हणजे प्राचीन काळातील एलापूर होती. कंधार व लातूर या राष्ट्रकूटांच्या दोन राजधान्या होत्या. वेरुळ, कंधार, लातूर ही राष्ट्रकुट काळातील भरभराटीस आलेली महत्वाची व्यापारी व बाजारपेठांची केंद्रे होती. या शहरात अनेक बाजारपेठा होत्या, गुर्जरपण (गुजराथी लोकांचे पेठ) व क्षुण्णहटिका (चुना भट्टीचा बाजार) या दोन पेठांचा उल्लेख एका शिलालेखात आलेला आहे. विविध प्रकारची व विविध धातूंची नाणी विकसित झाल्याचे दिसते. कनिष्क, निष्क, कार्षापण, माषक व काकणी याशिवाय दिनार व सुवर्ण यासारखी नाणी यांचा उल्लेख सापडतो. या काळात व्यापाऱ्यांच्या संघटना - श्रेणी असत तर गावात किंवा नगरात दुकाने घालून व्यापार करणाऱ्यांना श्रेष्ठी म्हणत असत. तर दुसऱ्या माल नेऊन विक्री करणाऱ्यांना सार्थवाह म्हणत असे. या काळातील व्यापाऱ्यांनी अनेक प्रकारचे दानधर्म केल्याचे उल्लेख आलेले आहेत. यातूनच येथील लेण्या व भव्य मंदिरांचे निर्माण होण्यास सुकर झाल्याचे दिसते.राष्ट्रकूट कालखंडातही मराठवाड्याची आर्थिक स्थिती अत्यंत संपन्न होती. राष्ट्रकूटांनी आपल्या राजवटीत लोककल्याणकारी कार्यावर जास्त खर्च केला. राष्ट्रकूटांची दुय्यम राजधानी असलेल्या शहरात त्यांनी तेथील जनतेकरिता व बाहेरून येणाऱ्या अतिथीसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती.
5) कल्याणी चालुक्यकालीन आर्थिक स्थिती:- राष्ट्रकुट सत्तेच्या अस्तानंतर कल्याणीचे चालुक्यांची दक्षिण भारतात सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या नंतर एक पराक्रमी वंश म्हणून दक्षिण भारतात कल्याणीच्या चालुक्याकडे पहिले जाते. कल्याणी चालुक्यांचा कालखंड हा सामान्यपणे इ.स. ९६३ ते इ. स. ११८१ पर्यंतचा समजला जातो. कल्याणी चालुक्यांच्या कालखंडातच अंबाजोगाई, लातूर, धाराशिव आणि धर्मापूरी येथे व्यापारी केंद्रे उदयास आली. दक्षिण भारतात नैसर्गिक जलसिंचनाच्या अभावामुळे कृत्रिम पद्दतीने जलसिंचनाची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. कल्याणी चालुक्यांनी प्राकृतिक रचनेचा अभ्यास करून तलावांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला. शासनकर्त्यांकडून शेतीच्या विकासासाठी जलसिंचनाच्या व्यवस्था निर्माण करत. जलसिंचनाच्या तलाव व नदीवरील बांध या साधनांच्या निर्मितीमध्ये शासक वर्गासोबतच मंदिर संस्थेचेही फार मोठे योगदान आहे. अनेक तलाव दिसतात. यापैकी बरेच तलाव दगडांनी बांधून काढले असावेत असे तडकल्ल या नावावरून वाटते. तलावाच्या देखरेखीचे काम प्रामुख्याने ग्रामसभाकडे सोपविण्यात आले होते. तलावाच्या निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या दानाप्रमाणेच तलावाच्या दुरुस्तीसाठीच दान दिले जाई. ग्रामीण शेतकरी जलसिंचनाच्या मोबदल्यात विशिष्ट असा कर शासनकर्त्याकडे जमा करीत सामूहिक व व्यक्तिगत प्रयत्नामुळे जलसिंचनाची व्यवस्था केले जाई. कृषी जलसिंचनासाठी विहिरीच्या पाण्याचाही वापर केला जाई. पाणी वर काढण्यासाठी विविध प्राण्यांचा वापर केला जाई. पाणी काढण्यासाठी राहटा सारख्या यंत्राचा वापर केला जाई. विहीर खोदण्यापूर्वी शेतीजमिनीच्या मालकाची परवानगी घेणे आवश्यक होते असे. या कालखंडात दक्षिणेत पाणी पुरवठयाचे साधन म्हणून तलाव, विहिरी सोबतच कालव्यांचाही वापर करण्यात आलेला होता. विविध शेतीमालाचे उत्पादन घेतले जाई. तांदूळ, जवस, ज्वारी, बाजरी आणि गव्हाचे उत्पादन संपूर्ण दक्षिण भारतात घेतली जाई. वरील उत्पादनांव्यतिरिक्त विविध कडधान्य, तीळ, ऊस इत्यादी ठिकाणचे उत्पादन घेतले जाई.
ब) मध्ययुगीन मराठवाड्याची आर्थिक स्थिती:- १. यादवकालीन आर्थिक स्थिती:- मराठवाड्यातील यादव हे शेवटची समृद्ध राजवट आहे. यादवांची देवगिरी ही राजधानी होती. यादव काळात जागतिक बाजारपेठेत क्रांतीकारक बदल झाले होते. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेमध्ये नवीन बाजारपेठा निर्माण झाल्या. भारतीय वस्त्रे व मसाल्याच्या पदार्थाना मागणी वाढली होती. उत्पादन प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यांचा परिणाम म्हणून यादव काळात पैठण, तेर अंबाजोगाई, लातूर ही शहरे नवीन बाजारपेठा नावारूपाला आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पैठणच्या रेशमी वस्त्राचे परत एकदा वर्चस्व प्रस्थापित झाले. यादव काळात वस्त्रोद्योग आणि मसाल्याचे पदार्थ या उद्योगांचा विकास झाल्यामुळे मराठवाडयाची आर्थिक भरभराट झाली. मध्ययुगीन काळात मराठवाड्यातील देवगिरी, पैठण, अंबाजोगाई ही शहरे व्यापारासाठी आघाडीवर होती. देवगिरी जवाहिऱ्यांच्या व्यापार यासाठी प्रसिद्ध होते. हिरे माणिकाना पैलू पाडण्याच्या कामाप्रमाणे सोन्या-चांदीची व इतर बरीच कलाकुसरीची कामे सुबक होत असत. राजधानी व महाराष्ट्राचे केंद्रस्थान म्हणून देवगिरीस सर्वप्रकारच्या व्यापाराला चांगलाच वाव मिळत होता. त्यावेळी मराठवाडयाचा व्यापार गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, इत्यादी प्रांताशी चालत असे मराठवाडयातील पैठण येथे तयार होणारे मलमली, मखमली व रेशमी कापड भारतात सर्वत्र मोठया प्रमाणत विकत असे. पैठणमधील पैठण्यांना सर्वत्र मागणी होती. इतकेच नव्हे तर बाहेरच्या देशातही पैठणी प्रसिद्धी मिळाली होती.मराठवाड्यात चामडे कमाविण्याचा उद्योग भरभराटीला आला होता. विविध उद्योग मराठवाड्यात विकसित झाल्याने व्यापार वाढला होता.
यादवांच्या काळात व्यापाऱ्यांच्या संघटना किंवा श्रेणी अस्तित्वात होत्या. श्रेणीमध्ये निरनिराळ्या जातीतील लोकांचा सहभाग राहत असे. श्रेणीने घालून दिलेले नियम सर्व सभासदांना सारखेच बंधनकारक राहत असे. श्रेणीपेक्षा पूग ही एक दुसरी व्यापारी संघटना होती. न्यायदानाच्या बाबतीत श्रेणीहून भूगाचा मोठा अधिकार होता. श्रेणी व युग या दोन्ही संस्थाना राज्यमान्यता होती. आपल्या क्षेत्रापुरते न्यायदान करण्याचा अधिकार त्यांना दिलेला असे. त्याकाळात व्यापारी वर्ग राजा व प्रजा याच्यातील एक महत्वपूर्ण दुवा होता. या काळात विविध वजने मापे प्रचलित होती. यादव काळात व्यापार व्यवहारात व निरनिराळ्या व्यवसायात वजने व मापे यांचा उपयोग करण्याची प्रथा होती. धान्य मोजण्यासाठी कुडव पावशेर शेर, दुशेरी, अशेरी, पासरी, मण खंडी ही मापे होती तर तेला सारख्या द्रव पदार्थाचे मोजमाप करण्यासाठी पळी, किंवा डो अशी साधने होती सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू तोलण्यासाठी गुज, बाल, जन, पळ, मासा, तोळा, दुतोळा, अशी वजने वापरत होती. जमीनीच्या मोजमापासाठी अगुलहस्त, निवर्तन, मत्तर अशा प्रकारची मापे होती. व्यापारी देवानघेवाणसाठी नाण्याबरोबरच धान्याचा वापर केला जात असे. स्वतंत्र चलन व्यवस्था करण्यात आली होती. यादवांनी पाडलेल्या सोन्याच्या नाण्यावर गरुडाचा छाप असे. निष्क, होन, गद्याण, वराह, फनम इत्यादी नाणी प्रचलित होती. यासाठी सोने, चांदी व तांबे यांचा वापर केला जात होता. बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ग्रामीण व्यवस्था सर्वस्वी स्वायत्त व स्वतंत्र होती. ग्रामीण समाजाचे जीवन आर्थिक दृष्ट्या समृद्ध व आनंदी होते व आर्थिक सुबत्ता होती. थोडक्यात यादव काळात आर्थिक परिस्थिती अत्यंत वैभवशाली होती. २. मोगलकालीन मराठवाड्याची आर्थिक स्थिती:- मोगलकालीन कालखंडात शेती हाच अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार होता. खेडे हा आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू होता.गावात बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. ग्रामीण भागात परंपरेने चालणारे छोटे, मोठे उद्योग व्यवसाय चालू होते. बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार याशिवाय काही व्यवसाय ग्रामीण भागात प्रचलित होते. त्यावरच लोकांची उपजिविका चालत असे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव माफक होते. कृषी व्यवसायात हिंदू व मुसलमान होते, बहूतांश शेती नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. या काळात अधूनमधून दुष्काळ पडत असत. लोकांची आर्थिक स्थिती दयनीय होती. अकबराच्या काळात बटाटे, द्राक्षे, टरबूज यांची शेती करण्याची पद्धत सुरू झाली. तंबाखूचे पीक घेण्याची प्रथा याच काळात सुरू झाली. या काळात सुती व रेशमी कपडयांना चांगली मागणी होती. मोगलकाळात औरंगाबाद हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. येथे अनेक बाजारपेठा होत्या. त्यापैकी बेगमपुरा, औरंगपुरा, सुलतानगंज, शहागज ही महत्त्वपूर्ण बाजार भरण्याची मुख्य ठिकाणे होती. बाजारपेठेत बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना येथे माल ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था केली होती. त्यामुळे माल सुरक्षित राहत असे. बाजाराचा प्रमुख अधिकारी हा दर आठवड्यास धान्यांचे दर लिहून सरकारला कळवित असे. मालांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हा अधिकारी करत असे. आयात निर्यात पद्धतीने व्यापार होत असे. प्राचीन काळातील शहरांचे महत्व कमी होऊन औरंगाबाद, दौलताबाद, शहागड, खुलताबाद, जालना, नांदेड, बीड यांचे महत्व वाढले होते. दैनंदिन जीवन जगण्यात सामान्य मानसाला फारशा समस्या नव्हत्या. आयात निर्यात व्यापारासाठी स्थलमार्ग व जलमार्गाचा अवलंब होत असे. या काळात काही प्रमुख दळणवळणाचे मार्ग रुढ झाले होते.
इ.स. १६६० पासून औरंगजेबाने औरंगाबाद येथे शाही टाकसाळ सुरू केली होती. या टाकसाळीत सोने व चांदीची नाणे तयार होत असत. नाणी तयार करण्याचे कार्य औरंगाबाद येथे सरकारी व खाजगी अशा दोन्ही स्तरावर होत असे. औरंगाबाद येथे रंगरेज गल्लीजवळ अजूनही टाकसाळ गल्ली आहे. इ.स. १७२० मध्ये निजाम असफजाह याने दक्षिण सुभा स्वतंत्र केला, तरी देखील औरंगाबादच्या टाकसाळीत मोगलांची नाणी पाडली जात असत. इ.स. १७२० ते १८४४ पर्यंत निजाम सरकार मोगलांची नाणी तयार करून स्वतःच्या राज्यात वापरत असे. औरंगाबाद हे नाणी बदलण्याचे दक्षिण भारतातील फार मोठे केंद्र होते.
विल्यम नॉरीसची मराठवाड्यास भेट दिली. न्यू इंग्लीश कंपनीला मोगल बादशाहाकडून पूर्वीच्या इस्ट इंडिया कंपनीच्या सवलती मिळाव्यात म्हणून इंग्लंडचा राजा तिसरा विल्यम याने सर विल्यम नॉरीस यास आपला वकील म्हणून औरंगजेबाकडे पाठविले. त्यावेळी औरंगजेब मराठयांच्या विरुद्ध मोहिमेत गुंतला होता. विल्यम नॉरीसने आपल्या प्रवासाची दैनदिनी ठेवली होती तिचे संशोधन करून श्री हरीहरदास यांनी 'दि नॉरीस एबसी टू औरंगजेब' हा ग्रंथ लिहिला आहे. औरंगाबादचे वर्णन करताना तो लिहितो, "पर्वताची एक रांग उत्तरेकडे गेली आहे. या पर्वताच्या पायथ्याशी एक सुंदर खोरे आहे. औरंगाबाद या खोऱ्यात वसले आहे. या भागातील जमीन सुपीक आणि समृद्ध आहे. या शहरात अनेक धनिक व्यापारी आहेत औरंगाबाद त्या काळी फळफळावळीसाठी प्रसिद्ध होते. विशेषतः तेथील दाने व सत्री नॉरीसला फार आवडली. औरंगाबादचे गुलाब पाहून त्याला आपल्या देशातील गुलाबांची आठवण झाली. तो म्हणतो, "धान्य काय फळफळावळ काय -अगर फुले काय, औरंगाबादेत या सर्व वस्तू उत्तम आणि विपूल मिळतात". या कालखंडातील पावसाची अनिश्चितता, सततच्या युद्धांचा प्रसंग यामुळे पिकांची नासाडी, आर्थिक मदतीचा अभाव, भ्रष्ट राज्यकारभार यामुळे शेती व्यवसाय व शेतकरी हे दोन्ही मागासलेलेच होते. संपूर्ण शेती पावसावरच अवलंबून होती. या काळात शेतीची प्रतवारी लक्षात घेऊन त्या प्रमाणात शेतसारा वसूल केला जात असत. सारा रोख व धान्याच्या रुपाने भरण्याची सोय होती. या कालखंडात उद्योगधंद्यांची फारशी वाढ झालेली नव्हती. रस्त्यांचाही फारसा विकास झालेला नव्हता. प्रवासासाठी घोडागाडी, बैलगाडी, पालखी, मेना इत्यादींचा वापर होत असे. या काळात बाहेरच्या देशांशी व्यापार चालत असल्याचे उल्लेख सापडत नाही. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुस्लिम राजवटीत बेबंदशाही माजली होती. मुस्लिम राज्यकर्ते प्रजेला लुबाडीत होते. मुस्लिम राज्यकर्ते मराठी कर्तबदार सैन्य बाळगून ते मुलाखाचे राजे बनून विलासात आणि ख्यालीखुशालीत राज्य करत होते. 3) मराठाकालीन मराठवाडयाची आर्थिक:- मराठा सत्तेचा व मराठवाडा परिसराचा जास्त संबंध आला नाही. मराठी सत्तेचा उदय होण्यापूर्वी अनेक मराठी सरदार मुस्लिम राजवटीत नावारूपाला आले होते. मुसलमानी सत्तांना अनोळखी प्रदेशात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कठीण जात होते. वर्चस्वासाठी पाचही मुस्लीम सत्ता आपापसात सतत लढाई करत होत्या. ह्या प्रदेशातील जनता ही हिंदू धर्माचीच होती. जनतेच्या समर्थनाशिवाय राज्याला स्थैर्य प्राप्त होवू शकत नाही म्हणून या स्थानिक हिंदू लोकांशी जुळवून घेणे मुसलमानी सत्ताधीशांना आवश्यक होते. मुस्लिम राज्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठा वतनदारांवर होती. निजामशाही उदयास येण्यापूर्वी अनेक मराठी सरदार घराणी उदयास आली. त्यांना मुसलमानी राज्यात मोठी संधी प्राप्त झाली व सत्ता विस्ताराच्या व अधिकाराच्या संघर्षात वरच्या दर्जाची स्थाने मिळू लागली. यातुनच मराठे, धनगर, ब्राह्मण व इतर जमाती पुढे आल्याचे दिसते. या परिस्थितीत मराठ्यांना आपल्या बाजुने ठेवण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी काही धार्मिक सवलती, पदव्या व जहागीर देऊन मुसलमानी सत्तांनी मराठ्यांचा गौरव करणे सुरू केले. लढाईत मोठमोठे पराक्रम गाजवण्यात ते नेहमी पुढाकार घेत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की, सुलतान त्याला आपल्या चाकरीला ठेवी. जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. निजामशाही व आदिलशाही यांनी दिल्लीचे मोगल व दक्षिणेतील पोर्तुगीज या सैन्याला टक्कर देण्यासाठी मराठा घराण्याची मदत घेतल्याची उदाहरणे आहेत. जहागीर व वतनदार आपल्या प्रदेशाचा कारभार पाहू लागले. या प्रदेशातील आर्थिक व्यवस्थेवर नियंत्रण करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आले. मराठाकालीन आर्थिक जीवन शेती व्यवसायाशी संपूर्णपणे निगडीत होते. मराठा काळात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. पावसाची अनिश्चितता, नेहमीचा युद्धांचा प्रसंग त्यामुळे पिकांची होणारी नासधूस, मुस्लिम शासनकर्त्याकडून आर्थिक मदतीचा अभाव व जुलमी राज्यकारभार इत्यादीमुळे शेती करणे कठीण बनले होते. मुस्लिम राज्यकर्त्यांमध्ये वारंवार होणारी युद्धे यामुळे त्यांच्या शेतीचे सुद्धा अतोनात नुकसान होऊ लागले. शेती हा व्यवसाय अस्मानी व सुलतानी संकटाने धोक्यात आल्याने मराठे सैनिकी पेशाकडे वळले. मराठा कालखंडात आर्थिक व्यवहाराचे केंद्र बिंदू खेडे हाच होता. बाजारपेठेचे केंद्र असलेल्या खेडयाला कसबा या नावाने संबोधित असत. सामान्यतः गावात चार प्रकारच्या सत्ता रूढ होत्या त्यापैकी चौथी सत्ता म्हणजे व्यापारी सत्ता. ही सत्ता स्वतंत्र व श्रेष्ठ असल्याने त्यांना गावकीचे अधिकार होते. या कामासाठी सरकारकडून जमिनी मिळत त्यांना देशक' असे म्हणत. जमीनीच्या मोबदल्यात ते गावकीची विविध प्रकारची कामे करीत. त्यांना गावात प्रतिष्ठीत नागरिक समजले जात असे.(लेख:-मराठवाड्याच्या आर्थिक समृद्धीचा वारसा, प्रा. छाया दत्तराव भरोसे, मराठवाडा वारसा व सद्यस्थिति खंड १, संपादक:- डॉ. मारुती आवरगंड, श्री. विठ्ठल कदम)
शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तांदुळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना आणि नांदेड शहरांच्या परिसरात उद्योगीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ.स. १९८० नंतर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाणे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
समाजरचना आणि लोकजीवन
या भागात अधिक लोक हे ग्रामीण भागांत राहतात. तसेच ३०-४० टक्के लोक शहरी भागात राहतात. जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबून आहे.
शिक्षण
सातवाहन या राजवटीचा काळ मराठवाड्याच्या दृष्टीने भरभराटीचा होता असे म्हणणे योग्य ठरेल. या काळामध्ये मराठवाड्याने केलेले नेतृत्व अनेक क्षेत्रात प्रभावशाली होते. यात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचा समावेश होता. या काळात कला आणि साहित्य निर्मितीला चालना मिळाली. याच काळात गाथा सप्तशती या महत्वाच्या ग्रंथाची निर्मिती झाली. सातवाहन कुळातील राजे विद्वान ,सुसंस्कृत आणि विद्येचे पुरस्कर्ते होते. या काळात पैठण, जुन्नर आणि तेर येथे शैक्षणिक केंद्र विकसित झाली. संस्कृत बरोबर प्राकृत भाषेला त्यांनी प्रोत्साहन दिले. साहित्य निर्मिती बरोबरच साक्षरतेला चालना दिली हे त्यांचे महत्वाचे योगदान ठरते. या काळात निर्माण झालेल्या शिलालेखांची संख्या मोठी आहे. समाजात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग असल्याचे असल्याचे हे लक्षण आहे. त्या नंतर आलेल्या वाकाटक या राज वंशानेही कलेला आश्रय दिला. या काळात अजिंठा येथील प्रसिद्ध लेण्यांची निर्मिती झाली. हरिवीजय या ग्रंथाची निर्मिती याच काळात झाली. चालुक्य वंशीय राजवटीत मराठवाडा केंद्र स्थानी राहिला नाही.
राष्ट्रकूट हे घराणे महाराष्ट्रीय होते. या काळात तलगुंड या ठिकाणी शाळा असण्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी मातृभाषेत शिक्षण दिले जात असावे. हे दोन्ही मुद्दे मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. शाळेचे संगोपन गावकरी करीत असाही पुरावा सापडतो. कल्याणीच्या चालुक्य काळात शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले एवढेच आपण म्हणू शकतो.
शैक्षणिक दृष्ट्या यादवांचा कालखंड अतिशय महत्वाचा ठरतो. मराठवाड्याची शैक्षणिक आणि साहित्यिक परंपरा या काळात अधोरेखित होते. या काळात संस्कृत प्रमाणेच मराठी भाषा समृद्ध झाली. मुकुंदराज यांच्या विवेक सिंधु आणि ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथांची निर्मिती याच काळात झाली. मराठी वाङमयातील हा महान ग्रंथ मानला जातो . मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली जाण्यापूर्वी मराठवड्यातील शिक्षण पद्धती विकसित झाली होती.
मुस्लिम राजवट : चौदावे शतक ते अठराव्या शतकापर्यंत मुस्लिम राजवटीत शिक्षण हे पूर्वीप्रमाणेच दिले जात होते. मोगल सत्ते नंतर त्यात मदरशांची भर पडली. ही व्यवस्था मिश्र प्रमाणात ब्रिटिश कालखंड सुरू होई पर्यन्त सुरू होती. इष्ट इंडिया कंपनी सत्तेवर आल्यानंतरही अनेक वर्षे सरकारने शिक्षणाकडे लक्ष दिले नव्हते. काही इंग्रज समाज आणि धर्म प्रसारकांनी सरकारकडे ही मागणी केली. त्यानुसार भारतात इंग्रजी मध्यमाची शाळा सुरू झाली. याच काळात मराठवडा हा निजामाच्या अधिपत्या खाली होता. या दोन्हींचा एकत्रित परिणाम हा मराठवड्यातील शिक्षणावर झालेला दिसून येतो. याचा तौलनिक आढावा घेतल्यास सध्या असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेता येईल.
निजामकालिन शिक्षण ;- निजाम राजवटीत हैदराबाद संस्थान चार भागात विभागले गेले होते. मेडक -गुलशनाबाद, वारंगल, औरंगाबाद आणि गुलबर्गा हे ते चार विभाग होत. या विभागांची पुढे जिल्हा आणि तालुका अशी विभागणी होती. सर्व मिळून १७ जिल्हे होते. मराठवाडा हा औरंगाबाद आणि गुलबर्गा यात विभागला होता. निजाम राज्यात गावोगावी चालणाऱ्या शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचा पगार गावकरी देत असत. गावच्या ऐपतीवर तो अवलंबून होता.
निजमाचे ब्रिटिश राजवटी बरोबर चांगले संबंध होते. त्यामुळे सेंट जॉर्ज ग्रामर् ही इंग्रजी माध्यमाची शाळा १८३४ मध्ये स्थापन झाली. ती मुख्यतः युरोपियन मुलांसाठी होती. त्या नंतर बोलारम येथे वैद्यक शाळा आणि १८५५ मध्ये हैदराबाद येथे रोमन कॅथॉलीक मिशन तर्फे शाळा सुरू करण्यात आली. प्रथम निजामाच्या कर्मचाऱ्यासाठी असणारी ही शाळा सर्व जातीच्या मुलांसाठी खुली करण्यात आली. त्या नंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा हैदराबाद शहर, औरंगाबाद, वारंगल आणि गुलबर्गा येथे सुरू करण्यात आल्या. यात दोन सर्व साधारण आणि तंत्र विषयक आणि व्यावसायिक शाळांचा समावेश होता. या ठिकाणी अलिगढ, चेन्नई, मुंबई आणि बंगाल येथील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.
हैदराबाद मध्ये मदरसा १८३० मध्ये स्थापन करण्यात आला. त्या नंतर १८५९ मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीन आणि तालुक्याच्या ठिकाणी दोन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेची फी तालुका शाळेत एक आणा आणि जिल्हा शाळेत दोन आणे एव्ह्डी होती. पहिली अभियांत्रिकी संस्था १८७० साली स्थापन करण्यात आली. सन १८७२ मध्ये एकूण स्थानिक भाषेतील शाळांची संख्या १२५ होती. याशिवाय हैदराबाद शहरात १६ शाळा होत्या . सन १८७५ मध्ये औरंगाबाद येथे मराठी -इंग्रजी अशी द्वि भाषिक शाळा उघडण्यात आली. दारूल ऊलुम उर्फ ओरीएन्टल महाविद्यालय १८५४ मध्ये सुरू झाले. यात पर्शियन आणि अरेबिक मध्यमातून भौतिक शास्त्र, रसायन, गणित आणि खगोल शास्त्र शिकवले जाई. इंग्लिश माध्यमच्या शाळेत १८५७ पासून अरेबिक, पर्शियन, हिंदुस्तानी, मराठी, तेलगू, आणि कन्नड भाषा शिकवल्या जात. काही समाज सुधारकांनी केलेले प्रयत्नही उल्लेखनीय आहेत.
बिलगर्मी यांनी वारंगल, हैदराबाद आणि औरंगाबाद येथे तीन औद्योगिक शाळा काढल्या. वेंकट राम रेड्डी यांनी मुलींचे माध्यमिक विद्यालय आणि मूला-मुलींसाठी वसतिगृहे काढली. भाग्य राम रेड्डी यांनी वंचित घटक आणि दलित वर्गातील मुलांसाठी शाळा काढल्या. अशा प्रकारे शिक्षणाची सुरुवात होऊनही सामाजिक परिस्थिति आशादायक नव्हती. सर्व साधारण साक्षरता ३ टक्के तर इंग्लिश साक्षरता ०.३ टक्के इतकीच होती. इतर संस्थानच्या तुलनेत ती सर्वात कमी होती. साक्षरता दर हिंदु २.६, मुस्लिमस ८.९, ख्रिच्चन २५.२ असा होता. तेलंगणाचा साक्षरता दर ४.२ तर मराठवाड्याचा २.४ एव्हडा होता. मराठवाड्याच्या शैक्षणिक मागासले पणाची बीजे इथे रोवलेली आहेत.
स्वातंत्र्य मिळाल्या नंतरही मराठवाड्यात उच्च शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी दशक उलटावे लागले. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणाची सोयही अपुरी होती. सन १९५७ मध्ये प्राथमिक शाळांची संख्या ३६८६, माध्यमिक २३१ आणि उच्च माध्यमिक फक्त ९५ एव्हडी होती. त्यात एक तंत्र विषयक आणि एका इंटर मिजियट महाविद्यालयाचा समावेश होता. सुदैवाने १९५० मध्ये औरंगबादला एक आणि नांदेडला एक अशा दोन महाविद्यालयाची स्थपणा झाली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. तसेच १९५४ ते ५६ या दरम्यान एक शिक्षणशास्त्र, एक वैद्यक आणि एक शेती महाविद्यालय यांची त्यात भर पडली. सन २०२३ मध्ये मराठवाड्यात शाळांची संख्या २०००० एव्हडी आहे.
उच्च शिक्षणाचा विचार केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ अशी तीन विद्यापीठे आहेत. या विद्यापीठात अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या सुमारे ६५० एव्हडी आहे.
मराठवाड्यात आय आय टी ही उच्च शिक्षणाशी संबंधित अभियांत्रिकी संस्था नाही, तसेच व्यवस्थापन विषयक शिक्षण देणारी आय आय आय एम देखील नाही. यू डी सी टी या रसायन शस्त्राशी संबंधित मुंबईतील संस्थेची शाखा जालना येथे आहे. ही उपशाखा आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा येथे येऊ घातलेला लायगो हा गुरुत्वाकर्षण तरंग मोजणारा प्रकल्प हीच एक जमेची बाब आहे. सन २०२० पासून नवे शिक्षणिक धोरण आले आहे. सद्यस्थितीत शिक्षणाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे असे म्हणता येईल. असे असले तरी गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.
मराठवाड्यात क्षमता असूनही उच्च शिक्षणाची ज्ञान केंद्र हव्या त्या प्रमाणात विकसित होत नाहीत हा खरा कळीचा मुद्दा आहे. नव्या धोरणामुळे आता नवी संधी आणि आव्हाने तयार होत आहेत. भविष्यात गुणवत्ता वाढवायची असल्यास हे धोरण यशस्वीपणे कसे राबविता येईल याचा विचार आवश्यक आहे . [लेख:- मराठवाडा:शिक्षण परंपरा व सद्यस्थिति, डॉ पंडित विद्यासागर, मराठवाडा वारसा व सद्यस्थिति खंड १,संपादक:- डॉ. मारुती आवरगंड, श्री. विठ्ठल कदम]
छत्रपती संभाजीनगरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियंत्रित आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेडचे श्री गुरूगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय प्रसिद्ध आहे. याशिवाय इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ ऑगस्ट १९५८ रोजी झाले.[४] सुरुवातीला 'मराठवाडा विद्यापीठ' एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला. या प्रदेशातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. धाराशिव येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
नांदेड येथे मुख्यालय असलेल्या या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यन्त चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.[५] प्रदेशातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. लातूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असा करण्यात आला.
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्न कृषितंत्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्नतंत्रज्ञान यात दोन वर्षाचा पदव्युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषी शाखेच्या नऊ विषयांत, अन्नतंत्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषी अभियांत्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्यात येतो.
संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कार्यरत असून आजपर्यंत सव्वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्त कृषी औजारे व यन्त्रे विकसित करून शेतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्त तंत्रज्ञान शिफारसी प्रस्तुत केल्या आहेत.
विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१), कृषी तन्त्रज्ञान माहिती केंद्र (१), विभागीय कृषी विस्तार केंद्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषी विज्ञान केंद्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्टेंबर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्या बियाणाचे वाटप केले जाते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी बांधव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनंदिनी, कृषी दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.
नामांकित शिक्षण संस्था
- नवविकास मंडळ शिक्षण संस्था
- नूतन शिक्षण संस्था
- केंद्रीय महाविद्यालय, परभणी
- भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ
- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
- योगेश्वरी शिक्षण संस्था, अम्बाजोगाई
- सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर.
साहित्य आणि साहित्यिक
- मराठवाड्यातील डॉक्टर यू. म.पठाण यांनी मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर तुळशीराम गुट्टे यांनीही मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून संत मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. तर तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. नरहर कुरुंदकर हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. नाथराव नेरळकर यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. लक्ष्मीकांत तांबोळी, फ.मुं. शिंदे यांनी काव्यलेखन तर नरेंद्र नाईक यांनी काव्य व कादंबरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कादंबरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .दैनिक मराठवाडाचे संपादक अनंत भालेराव व दैनिक प्रजावाणी, नांदेडचे संपादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या ’वऱ्हाड निघालंय लण्डनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा. ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
पुस्तके
- ’मराठवाडा वारसा व सद्यस्थिति खंड १’, संपादक: डॉ. मारुती आवरगंड, श्री. विठ्ठल कदम
- ’असाही मराठवाडा’ (मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रन्थ), लेखक : डॉ. किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
- ’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे) : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी-लेखक : नरेंद्र नाईक
- ’नाटयधर्मी मराठवाडा’ - लेखक : त्र्यम्बक महाजन.
- मराठवाडा : एक सांस्कृतिक मागोवा (अरुणचन्द्र पाठक)
- ’मराठवाडी माणसं’ - लेखक : यू. म. पठाण
- ’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : यू.म. पठाण
- मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)
- ’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : यू.म. पठाण
- ’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकांत महामुनी
मराठवाड्यात छापली जाणारी काही उल्लेखनीय वृत्तपत्रे
- दै. मराठवाडा
- दै. लोकमत
- दै. लोकसत्ता
- दै. सकाळ
- दै. दिव्य मराठी
- दै. एकमत
- दै. चंपावतीपत्र
- दै. कार्यारंभ
- दै. मराठवाडा साथी
- दै. झुंजारनेता
- दै. पुढारी
- दै. कार्यारंभ
मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति
राजकारण
- अशोक चव्हाण
- केशरबाई क्षीरसागर
- केशवराव धोंडगे
- गोपीनाथ मुंढे
- गोविंदभाई श्रॉफ
- जयसिंहराव गायकवाड पाटील
- नानाजी देशमुख
- प्रमोद महाजन
- बाबासाहेब सवनेकर
- बाबूरावज काळे
- मुकुंदराव पेडगावकर
- रफीक झकेरिया
- स्वामी रामानंदतीर्थ
- वसंतराव काळे
- विलासराव देशमुख
- शंकरराव चव्हाण
- शिवराज पाटील चाकुरकर
- शिवाजीराव निलंगेकर
- शिवाजीराव पंडित
- सुंदरराव सोळंके
- डॉ. मारुती आवरगंड
मराठवाडा शिक्षक मतदार संघ
१९७४ साली मराठवाड्याला स्वतंत्र शिक्षक मतदार संघ मिळाला. आजपर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
- डी.के. देशमुख
- राजाभाऊ उदगीरकर
- पी.जी. दस्तुरकर
- प.म. पाटील
- वसंतराव काळे
- विक्रम काळे
==मराठवाडा पदवीधर मतदार संघ== आ सतिश चव्हाण
समाजकारण आणि ग्रामीण विकास
- लक्ष्मण गायकवाड
- चंदुलाल बियाणी
- मच्छिंद्र गोजमे
- ना.य. डोळे
- विठ्ठलराव देशपाण्डे
- प्रा. मधुकर मुंडे
- विजयआण्णा बोराडे
- व्यंकटेश चौधरी
व्यावसायिक
- नंदकुमार धूत
- जवाहरलाल दर्डा
- मच्छिंद्र चाटे
- रणजित देशमुख
- बद्रीनारायण बारवाले
- चंदुलाल बियाणी
मराठवाड्यातील साहित्यिक
- अनुराधा पाटील
- ऋषिकेश कांबळे
- छाया महाजन
- प्रा. बाळासाहेब बोरसे
- डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे
- जयदेव डोळे
- प्रा. दत्ता भगत
- दादा गोरे
- दासू वैद्य
- नरहर कुरुंदकर
- नरेंद्र नाईक
- डॉ. गंगाधर पानतावणे
- पी. विठ्ठल
- प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
- फ.मुं. शिंदे
- बी. रघुनाथ
- मुक्तविहारी
- यू.म. पठाण
- रमेश दीक्षित
- रविंद्र किंबहुने
- रावजी राठोड
- लक्ष्मीकांत तांबोळी
- वा.रा. कांत
- श्रीकांत देशमुख
- डॉ. सरदारसिंग बैनाडे[६]
- सुधीर रसाळ
- डॉ. सूर्यनारायण रणसुभे
मराठवाड्यातील कलावंत
- मकरंद अनासपुरे
- डॉ. नीरज बाळासाहेब बोरसे
- चंद्रकांत कुलकर्णी
- मयूरी कांगो
- योगेश शिरसाट
- डॉ. लक्ष्मण देशपांडे
- संदिप पाठक
- सोन्या एस. सोळंके
संत आणि महंत
- पाचलेगावकर महाराज
- संत एकनाथ (पैठण)
- संत नामदेव (नरसी)
- संत मन्मथ स्वामी (श्री क्षेत्र कपिलधार,बीड)
- संत व कवी मुकुंदराज (अंबाजोगाई, बीड)
- संत दासोपंत (अंबाजोगाई,बीड)
- संत ज्ञानेश्वर (आपेगाव)
- संत जनाबाई (गंगाखेड)
- संत ज्ञानेश्वर महाराज- चाकरवाडी,बीड
- संत गोरा कुंभार - तेर, धाराशिव
- न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री - श्री क्षेत्र भगवानगड, बीड
- स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज - श्री क्षेत्र दत्ताधाम
- महंत आईसाहेब राधाताई सानप - श्री संत मीराबाई संस्थान महासांगवी
- संत वामनभाऊ
- महंत विठ्ठल महाराज शास्त्री (गहिनीनाथ गड)
- महंत अजिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड)
- महंत काशिनाथ महाराज शास्त्री (नागतळा)
- ह.भ.प. महादेव भाऊ शेकडे (मसोबाची वाडी)
- महंत विष्णू महाराज केंद्रे - ज्ञानेश्वरी मंदिर संस्थान आळंदी
- महंत शिवाजी महाराज (नारायणगड)
- संदिपान महाराज शिंदे हासेगावकर
- केशव महाराज उखळीकर परळी
- ज्ञानेश्वर दादा महाराज आपेगाव (माउलीचे)
- चैतन्य महाराज देगलूरकर
- माधवबुवा शास्त्री (अम्बाजोगाई)
- योगीराज महाराज पैठणकर
- प्रकाश महाराज बोधले डिकसळ
खेळाडू
- अंकित बावणे
- इक्बाल सिद्दिकी
- विजय झोल
- संजय बांगर
- अविनाश साबळे
पर्यटन
सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे छ्त्रपती संभाजीनगर येथील उद्यान आहे, जे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे.
- भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांसाठी प्रसिद्ध असलेले नायगाव अभयारण्य बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात आहे.
- येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे धाराशिव जिल्ह्यात आहे.या अभयारण्यात लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात.
- सौताडा हे स्थळ बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असून येथील विंचरणा नदीवरील धबधबा प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे विंचरणेचा प्रवाह सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळतो. येथील धबधबा प्रसिद्ध आहे
हे सुद्धा पाहा
- हैदराबाद मुक्तीसंग्राम
- दालन:मराठवाडा
- स्वामी रामानंद तीर्थ
संदर्भ
- ^ [१], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.
- ^ "मराठवाडा". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.
- ^ "विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक आणि तीन मुख्यमंत्री".
- ^ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा Archived 2011-08-23 at the Wayback Machine. इतिहास.
- ^ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संकेतस्थळ.
- ^ बैनाडे, सरदारसिंग. ज्येष्ठ कवी, लेखक व उत्तम सभा संचालक.
महाराष्ट्राचे उपप्रांत |
---|
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ |