मनोहर रणपिसे
मनोहर रणपिसे (इ.स. १९४७ - २ सप्टेंबर, इ.स. २०१५:मुंबई) हे एक मराठी गझलकार होते. सुरेश भटांनंतर त्यां मराठी गझल खऱ्या अर्थाने सशक्तपणे लिहिल्या त्यात मनोहर रणपिसे यांचे नाव आहे. सुमारे ४० वर्षे त्यांनी कविता आणि गझल लिहिली. उर्दू गझलचा त्यांच्यावर प्रभाव होता. रवायती शैली त्यांच्या गझलमधून प्रकर्षाने दिसते. २००४ मध्ये त्यांचा पहिला गझलसंग्रह प्रकाशित झाला. मनोहर रणपिसे यांचे १४ गझलसंग्रह प्रकाशित झाले. त्यातील ‘मृगजळाचे गाव माझे’ हा संग्रह अतिशय गाजला.
रणपिसे यांनी केवळ गझलाच नव्हे तर निसर्ग व प्रेमकविताही लिहिल्या. त्यांचे प्रश्नचिन्हांचा प्रवास हे प्रवासवर्णनही गाजले. महाराष्ट्रासह देशभरात त्यांनी कविसंमेलन तसेच मुशायऱ्यांमधून आपला ठसा उमटविला. ते केवळ कवी किंवा गझलकार म्हणून प्रसिद्ध नव्हते तर चांगला माणूस होते. मनोहर रणपिसे यांनी गद्यलेखनही केले. ‘बुद्ध गीतांजली’ या काव्यप्रकल्पासाठी १९८५ साली त्यांना केंद्र सरकारची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाली, तर 'गझल गीता' या संशोधन प्रकल्पासाठीदेखील २००९ मध्ये फेलोशिप मिळाली. आकाशवाणी मुंबई केंद्राचे ते मान्यताप्राप्त कवी व गीतकार होते. आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरून त्यांची अनेक गाणी प्रसारित झाली. रणपिसे यांची ‘श्रावण आला’ ही कविता तिसरीच्या पाठ्यपुस्तकासाठी, तर ‘सागर संध्या’ ही कविता नववीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडली गेली होती.
प्रकाशित पुस्तके
- अंतर्यामी (गझलसंग्रह)
- अद्वैत (गझलसंग्रह)
- कोरा कागद (गझलसंग्रह)
- निर्वाण (गझलसंग्रह)
- निसर्ग आणि मी (काव्यसंग्रह)
- प्रश्नचिन्हांचा प्रवास (प्रवासवर्णन)
- प्रेषित (गझलसंग्रह)
- बहरलेले झाड (गझलसंग्रह)
- मृगजळाचे गाव माझे (गझलसंग्रह)
- वाळूची घरे (गझलसंग्रह)
- शुभ्र कमळांचे तळे (गझलसंग्रह)
- सूफ़ी (गझलसंग्रह)
पुरस्कार
रणपिसे यांना २०१३ साली यू.आर.एल. फाउंडेशनचा गज़लगौरव हा पुरस्कार मिळाला होता.