मनोरमा श्रीधर रानडे
मनोरमा श्रीधर रानडे | |
---|---|
जन्म नाव | मनोरमा श्रीधर रानडे |
टोपणनाव | जीजी / गोपिकातनया / (विवाहपूर्व नाव द्वारकाबाई हिवरगांवकर) |
जन्म | १३ जानेवारी, १८९६ |
मृत्यू | १९२६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
आई | गोपिका |
पती | श्रीधर बाळकृष्ण रानडे |
मनोरमा श्रीधर रानडे (१३ जानेवारी, १८९६ - १९२६) या मराठी कवयित्री होत्या. त्या रविकिरण मंडळाच्या सदस्य होत्या. दैनंदिन आयुष्यातील अनुभव हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होते.त्यांनी गोपिकातनया या टोपणनावाने लेखन केले. त्यांचे पती श्रीधर बाळकृष्ण रानडे हे सुद्धा रविकिरण मंडळाचे सदस्य होते.
रविकिरण मंडळाची सुरुवात झाल्यानंतर २ वर्षांनीच वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मनोरमाबाई निवर्तल्या.[१]
जीवन
श्रीधर रानडे आणि मनोरमा श्रीधर रानडे (विवाहापूर्वीचे नाव द्वारकाबाई हिवरगांवकर हे दोघेही फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. ते महाविद्यालयातील काही तासिकांत एकाच वर्गात असत. महाविद्यालयाच्या मासिकातून दोघांनीही लिहिलेल्या कवितांच्या निमित्ताने दोघांचा घनिष्ठ परिचय झाला. परिचयानंतर दोघांचेही साहित्य अधिकच बहरास आले. त्यामुळे त्या दोघांची प्रसिद्धी आणि उल्लेख नेहमी बरोबरीनेच होत असे. पुढच्या काळात दोघे विवाहबद्ध झाले.[२] उच्चशिक्षित व पेशाने शास्त्रज्ञ असलेले रानडे प्रसिद्ध कवी नसले, तरीही रविकिरण मंडळाचे कार्य तळमळीने करणारे सभासद होते. आपल्या पत्नीच्या- वयाच्या अवघ्या २९व्या वर्षी -अकाली निधनानंतर श्रीधर रानडेंनी काव्यलेखन सोडले.[१]
श्रीधर रानडेंनी पुढे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी 'मृत्यूच्या दाढेतून' ही गाजलेली कविता लिहिली होती.[३]
रानडे दांपत्य व रविकिरण मंडळ
श्री.बा. (श्रीधरपंत) आणि मनोरमा (जिजी) रानडे हे रविकिरणमंडळाचे पहिले सूत्रधार आणि आधारस्तंभ होते. हे जोडपे त्या काळात इतर समाजापासून अगदी उठून दिसण्याइतके वेगळे होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि दोघेही कविता करत असत आणि मित्रांच्या सभेत त्यांचे वाचनही करीत. सुशिक्षित स्त्रीने कविता करून त्या बैठकीत वाचून दाखवायचा हा त्या काळात निराळा असा प्रघात होता. लवकरच यशवंत, माडखोलकर, माधवराव पटवर्धन, गिरीश असे इंग्रजी वाङ्मयावर वाढलेले आणि इंग्लिश रोमॅंटिक काव्यातून स्फूर्ति घेणारे कवी त्यांच्या काव्यबैठकींमध्ये सामील होऊ लागले. ह्या बैठकी रविवारी कोणा एकाच्या घरी होत असत आणि त्यातून रविकिरण मंडळाच्या कल्पनेने जन्म घेतला. ९ सप्टेंबर १९२३ ह्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या मंडळाच्या कवितांच्या प्रथम प्रकाशनाला ’किरण’ असे नाव देऊन ’एका ध्येयध्रुवाभोवती परिभ्रमण’ हा विचार व्यक्त करणारे सप्तर्षींचे प्रतीक त्यासाठी सुचविण्यात आले. मंडळाच्या पहिल्या प्रकाशनात माधवराव पटवर्धन, ग.त्र्यं. माडखोलकर, कवी यशवंत, कवी गिरीश (शं.के.कानिटकर), द.ल. गोखले, श्रीधरपंत व मनोरमाबाई रानडे ह्यांच्या कविता आणि दिवाकरांच्या नाटयछटा असे साहित्य प्रकाशित झाले.
संदर्भ
- ^ a b हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर १९११ - १९५६. पृ. २०८, लेखक - शिशिर कुमार दास
- ^ f http://yabaluri.org/TRIVENI/CDWEB/NewWaysinMarathiLiteraturemar31.htm. It is a snapshot of the page as it appeared on 23 Jan 2011 00:18:36 GMT.
- ^ मॉडर्न मराठी पोएट्री - अ रिमार्केबल डीकेड. लेखकः माधव ज्युलियन
बाह्य दुवे
- ऐसी अक्षरे: मनोरमाबाई रानडे