मनीषा जोशी
मनीषा जोशी (जन्म: ६ एप्रिल १९७१) या गुजराती भाषेतील कवयित्री आणि पत्रकार आहेत. कंडारा (१९९६), कंसारा बजार (२००१), कंदमूल (२०१३), आणि थाक (२०२०) या चार कविता संग्रहांच्या त्या कवयित्री आहेत.[१][२]
जीवन
मनीषा जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९७१ रोजी तारा जोशी आणि लक्ष्मीकांत जोशी यांच्या पोटी कच्छ जिल्ह्यातील मांडवीजवळील गोध्रा गावात झाला. १९८९ मध्ये अंजार येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्या वडोदरा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गेल्या, कारण गावात ९ वीच्या पुढे शिक्षण नव्हते. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा येथे अनुक्रमे १९९२ आणि १९९५ मध्ये इंग्रजी साहित्यात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. १९९३ मध्ये सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथून मास कम्युनिकेशनचा डिप्लोमा देखील त्यांनी मिळवला.
विद्यापीठात शिकत असताना त्यांच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला, ज्यात सीतांशु यशश्चंद्र, गणेश देवी आणि बाबु सुथार यांचा समावेश होता. गुलाम मोहम्मद शेख, प्रबोध पारीख, लाभशंकर ठाकर, नितीन मेहता, जयदेव शुक्ल आणि भोलाभाई पटेल या इतर गुजराती लेखकांशी त्यांची ओळख झाली.
त्यांनी मुंबई आणि लंडनमध्ये प्रिंट आणि दूरचित्रवाणी पत्रकार म्हणून काम केले. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. सध्या त्या बर्कले, कॅलिफोर्निया येथे राहतात.
पुरस्कार आणि सन्मान
त्यांच्या कंदमूल या काव्यसंग्रहाला गुजरात साहित्य अकादमीचे २०१३ चे प्रथम पारितोषिक मिळाले. आधुनिक गुजराती कवितेतील योगदानाबद्दल १९९८ मध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या संस्कृती पुरस्कारासाठी त्यांना नामांकन मिळाले होते.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Tripathi, Salil (2018-02-16). "A new generation of poets from Gujarat is keeping a rich poetic legacy alive". mint (इंग्रजी भाषेत). 2022-03-08 रोजी पाहिले.
- ^ Joseph, Ammu (2004). Just Between Us: Women Speak about Their Writing (इंग्रजी भाषेत). Women's World, India. ISBN 978-81-88965-15-1.
- ^ Jadeja, Gopika (November–December 2016). "The Sadness of a Stoic: A Conversation with Manisha Joshi". Indian Literature. New Delhi: Sahitya Akademi. 60 (6): 126–133, 204. ISSN 0019-5804. JSTOR 44754717