मंगळगड
मंगळगड | |
नाव | मंगळगड |
उंची | ६६४ मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | गोगवलेवाडी गावानजिक |
जवळचे गाव | पिंपळवाडी, महाड तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | साधारण |
स्थापना | {{{स्थापना}}} |
(दुसरी कडून जायचा मार्ग) गाव सडे, तालुका पोलदपूर,रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मंगळगड ऊर्फ कांगोरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
कांगोरीगड हा महाड आणि पोलादपूर तालुक्यांच्या सीमेवरील गड आहे.
कसे जाल ?
मंगळगडाला जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुऱ्ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. या पायी मार्गावर दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो.
भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदऱ्या, ओढे नाले ओलांडीत सहा - सात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर मंगळगड गाठता येतो. महाडकडून भोरकडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडीकडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही पिंपळवाडीला तासाभरात पोहोचता येते. शकतो. महाडहूनही ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी एस.टी. बसेस आहेत.
पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उद्ध्वस्त झालेल्या दरवाजाच्या अवशेषामधून गडात प्रवेश होतो. गडाचा विस्तार बऱ्यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर एका वाड्याचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळ-कोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आहे. कातळमाथ्याच्या खाली दोन लहान सुळके आहेत. त्यांना स्थानिक लोक नवरानवरीचे सुळके म्हणतात. पिंपळवाडीतून जाणारी गडावर जाणारी वाट ही प्रसिद्ध मळवाट आहे आणि आता तिकडून गडावर जाण्यासाठी अर्धा रस्तासुद्धा बांधला आहे
चौथा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे २४ किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे वडघर गावातूनसुद्धा मंगळगडावर जाण्यास दोन रस्ते आहेत. पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी ६ तास लागतात
गोठवली इथून येणारी वाट आणि सडे इथून येणारी वाट ह्या दोन्ही वाटा एका खिंडीत मिळतात.आणि दीड तासाने पिंपळवाडीतून येणारी वाटही तिला मिळते.
असे असले तरी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी शेवटी एकच वाट आहे आणि ती ओळखणे सोपे आहे. मान उंच करून पहिले तर माणसाच्या आकाराचे नवरा-नवरीचे दोन सुळके दिसतात. गडावर जाण्याची एकमेव वाट ह्या सुळक्यांच्या खालूनच जाते. हे सुळके नजरेच्या टप्प्यात ठेवले तर साहसवीरांसाठी कुठूनही गडावर चढाई करता येईल.
इतिहास
शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण चंद्रराव मोरे दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोऱ्यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलूख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले. हा गड बराच काळ सरदार गोळे यांच्याकडे होता, गायकवाड अन् गोळे यांनी या गड साठी सदैव रक्षण केले आहे 1678 ते 1703 पर्यंत
या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी होत असे. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला तेव्हां तेथील धन प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा येथे नेले.यात सरनौबत पिलाजी गोळे यांची भूमिका महत्त्वाची होती
सुमारे १८१७ या सालात सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजिमेन्टच्या कर्नल हंटर व मॉरिसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कर्नल पॉथर या इंग्रज सैन्याधिकाऱ्याने हा किल्ला जिंकला.
छायाचित्रे
कांगोरी गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
मंगळगडाच्या माचीवर कांगोरी देवीचे मंदिर आहे. या उंचीवर येऊन देवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मूर्तीचे एक प्रतिरूप स्थापन करून आपली सोय करून घेतली आहे. वर्षातून एकदा गडावर देवीचा उत्सवही साजरा होतो..
गडाच्या फेरीमधे तटबंदी, उद्ध्वस्त दरवाजा, माची, शंकराची पिंडी, दीपमाळ, घरांची जोती इत्यादी पहायला मिळतात. या कांगोरी गडावरून मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारेही दिसू शकतात. गडावर स्वयंपाकाची जुनी भांडी आहेत.
गडावरील राहायची सोय
या मंदिरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. त्यामुळे त्यासाठी लागणारी भांडीकुंडी गावकऱ्यांनी येथे ठेवलेली आहे. या गडावर मुक्काम करायचा झाल्यास येथेच आपल्याला मुक्काम करता येऊ शकतो. या मंदिराच्या मागे एक छोटी माची गेलेली आहे.
गडावरील खाण्याची सोय
गडावर खाण्याची सोय नाही. अथवा कोणत्याही प्रकारचे कसलेही दुकान नाही.
गडावरील पाण्याची सोय
गडावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत, एक कोरडी, पण दुसरीत पिण्याचे पाणी असते.
गडावर जाण्याच्या वाटा
१. चंदगड-महादेव मुऱ्ह्यामार्गे.
२. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावरल्या माझेरी गावातून.
३. महाड-भोर रस्त्यावर भिरवाडीच्या पायथ्याच्या असलेल्या पिंपळवाडी फाट्याने जाऊन, मग पिंपळवाडी गावामार्गे. महाडहून पिंपळवाडीला यायला गाडीने दीड तास लागतो.
- पोलादपूर-सडे मार्गाने.
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ
दीड तास ते सात तास.
संदर्भ
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले