भौगोलिक गुणक पद्धती
भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.
अक्षांश - रेखांश
अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), उत्तर ध्रुवाचा अक्षांश ९०° उत्तर , तर दक्षिण ध्रुवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर ० ही खूण, मिनिटाच्या आकड्यावर ' ही, तर सेकंद दाखवणाऱ्या आकड्यावर " असे चिन्ह असते.
रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणाऱ्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ०० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ०० ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८०० पूर्व आणि १८०० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.
अक्षांश व रेखांश वापरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.
उदाहरणे
- मुंबई: अक्षांश=१८° ५७′ ५३″ उ, रेखांश=७२° ४९′ ३३″ पू (18°57′53″N 72°49′33″E / 18.96472°N 72.82583°E)
- लंडन: अक्षांश=५१° ३०′ २८″ उ, रेखांश=००° ०७′ ४१″ प (51°30′28″N 00°07′41″W / 51.50778°N 0.12806°W)
- वेलिंग्टन: अक्षांश=४१° १७′ २०″ द, रेखांश=१७४° ४६′ ३८″ पू (41°17′20″S 174°46′38″E / 41.28889°S 174.77722°E)
- क्विटो: अक्षांश=००° १५′ ००″ उ, रेखांश=७८° ३५′ ००″ प (00°15′00″S 78°35′00″W / 0.25000°S 78.58333°W)