भोवळ
चक्कर येणे’ हे खरे तर केवळ एक लक्षण आहे. वरवर पाहता चक्कर साधी वाटली, तरी उपेक्षा न करण्याजोगी चक्कर कशा कशामुळे येते व तिच्यावर काय उपचार करणे आवश्यक असते याची माहिती असायला हवी. एखाद्या वेळी चक्कर आली तर लगेच घाबरून जाऊन ‘मला कुठला मेंदूचा विकार तर झालेला नाही ना’ अशी शंका घेण्याची गरज नसते. मात्र वारंवार चक्कर येत असली, तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्याशिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही. विशेषतः ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींना किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अर्धांगवात अशा प्रदीर्घ विकारांचा इतिहास असणाऱ्यांना चक्कर आली तर लागलीच विशेष तपासण्यांचा आधार घेणे आवश्यक असते.
‘चक्कर येणे’ हे खरे तर केवळ एक लक्षण आहे. साधी भूक दुर्लक्षित राहिली तरी चक्कर येऊ शकते आणि हृदय, मेंदू वगैरे महत्त्वाच्या अवयवांचे काम व्यवस्थित होत नसल्यासही चक्कर येऊ शकते. कैक वेळा भावनातिरेकामुळे सुद्धा चक्कर येताना दिसते. म्हणूनच वरवर पाहता चक्कर साधी वाटली तरी उपेक्षा न करण्याजोगी चक्कर कशाकशामुळे येते व तिच्यावर काय उपचार करणे आवश्यक असते याची माहिती असायला हवी.
गरगरणे, घेरी येणे, भोवळ येणे, तोल गेल्यासारखे वाटणे, डोके हलके झाल्यासारखे वाटणे या प्रकारे चकरेचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले जाते. सध्या ‘व्हर्टिगो’ या सर्वांच्या परिचयाच्या त्रासातही मुख्य लक्षण चक्कर येणे हेच असते. आयुर्वेदात चक्कर येणे या त्रासाला ‘शिरोभ्रम’ असे म्हणलेले आढळते. चक्रस्थितस्येव संवेदनम् । असे भ्रमाचे स्पष्टीकरण केलेले आहे. अर्थात चक्रावर बसून फिरल्याचा भास ज्या विकारात होतो त्याला शिरोभ्रम म्हणतात. ऐंशी वातविकारांपैकी हा एक विकार सांगितला आहे. तसेच मज्जाधातूत बिघाड झाल्यामुळेही भ्रम होऊ शकतो, असे म्हणले आहे.
भ्रम हा वातदोषाशी संबंधित असल्याने वातज शिरोरोगाची खालील कारणे शिरोभ्रमाला लागू पडू शकतात. - अतिशय उंच स्वरात किंवा मोठ्याने बोलणे. - खूप वेळ बोलणे. - रात्री फार वेळ जागरण करणे. - डोक्याला गार वारे लागणे. - अधिक प्रमाणात मैथुन करणे. - त्रादी नैसर्गिक वेग अडवून ठेवणे. - सतत तसेच कडक उपवास करणे. - डोक्याला इजा पोचणे. - खूप वेळ रडणे. - डोक्यावर जड ओझे उचलणे.
शोक, भय इत्यादी कारणांमुळे वाढलेला वात शिरोगत होऊन शिरोभागी राहणाऱ्या सिरा व धमनी मध्ये कुपित होऊन डोकेदुखी, शिरोकंप, शिरोभ्रम असे वातज शिरोरोग उत्पन्न करतो.
वाताप्रमाणे पित्तदोष शरीरात असंतुलित झाला तरी त्यामुळे चक्कर येऊ शकते. पित्त वाढल्यामुळे डोके दुखत असले तर बरोबरीने बऱ्याचदा चक्करही जाणवते. अशा वेळी उलटी होऊन पित्त पडून गेले की चक्कर येणे थांबते, तसेच डोके दुखणेही कमी होते. वातदोषाचे राहण्याचे मुख्य स्थान असते कान. वातदोष बिघडला की कानातही दोष उत्पन्न होणे स्वाभाविक असते. यातूनही व्हर्टिगो, चक्कर येणे वगैरे त्रास सुरू होतात. कानावर आघात झाला तर त्यामुळेही चक्कर येऊ शकते. बऱ्याच स्त्रियांना गर्भारपणात सुरुवातीच्या तीन महिन्यांत चक्कर येते, पण यामागे वाढलेले पित्त हेच मुख्य कारण असते. शरीरात रक्त कमी असले, मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नसला, रक्तदाब फार कमी किंवा फार जास्त असला, रक्तातील साखर एकाएकी कमी किंवा खूप वाढली तर त्यामुळेही चक्कर येऊ शकते. स्त्रियांमध्ये स्त्री-असंतुलनाचे एक लक्षण म्हणूनही चक्कर येऊ शकते. मानसिक अस्वास्थ्य, नैराश्य, अतिमानसिक ताण यांच्यामुळेही चक्कर येऊ शकते.
चेतासंस्थेची कार्यक्षमता कमी झाली, विशेषतः प्रदीर्घ मधुमेहाचा परिणाम चेतासंस्थेवर झालेला असला तर चक्कर येऊ शकते. मेंदूमध्ये गाठ असली तरी चक्कर येऊ शकते. मणक्यांमधील अंतर कमी-जास्त झाल्याने तेथील नसांवर दाब आल्याने चक्कर येऊ शकते. ताप एकाएकी खूप वाढला किंवा वात-पित्तज ताप असला तर चक्कर येऊ शकते. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने किंवा ड्रग्जच्या आहारी गेल्याने चक्कर येऊ शकते. तसेच काही तीव्र औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही चक्कर येऊ शकते.
झोप कमी झाली, जुलाब किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीरातील जलांश कमी झाला, पुरेशी शुद्ध हवा मिळाली नाही, कोणत्याही कारणाने श्वास अपुरा पडला, उष्माधात झाला तरी चक्कर येऊ शकते. अनेकांना रक्त पाहिले तरी चक्कर येते. नावडत्या, तीव्र गंधाच्या सहवासात बराच वेळ राहण्याने सुद्धा चक्कर येऊ शकते.
प्रवासात गाडी लागण्याचेही चक्कर हे एक लक्षण असू शकते. तसेच समुद्रसपाटीपासून फार उंच पर्वतावर गेल्यामुळे विरळ हवेचा परिणाम म्हणूनही चक्कर येऊ शकते. अशा प्रकारे चक्कर येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अर्थात एखाद्या वेळी चक्कर आली तर लगेच घाबरून जाऊन ‘मला कुठला मेंदूचा विकार तर झालेला नाही ना’ अशी शंका घेण्याची गरज नसते. मात्र वारंवार चक्कर येत असली तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. चक्कर कोणत्या कारणामुळे आली हे समजल्याशिवाय तिच्यावर उपचार करण्याचा फायदा होत नाही. विशेषतः ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींना किंवा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अर्धांगवात वगैरे प्रदीर्घ विकारांचा इतिहास असणाऱ्यांना चक्कर आली तर लागलीच विशेष तपासण्यांचा आधार घेणे आवश्यक असते.
घरगुती उपचार - साध्या कारणामुळे चक्कर आली असली तर त्यावर पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करता येतात. - पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. - रक्तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. - मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस चार चमचे व चमचाभर खडीसाखर असे मिश्रण घेता येते. - ऊन लागल्यामुळे चक्कर येत असली तर नाकात दुर्वांच्या रसाचे २-३ थेंब टाकण्याचे तसेच टाळूवर आवळकाठीच्या चूर्णात पाणी मिसळून तयार केलेला लेप लावून ठेवण्याने बरे वाटते. - फार अशक्तपणा जाणवत असला व चक्कर येत असली, बरोबरीने तोंडाला चव नसली तर मनुका खाण्याचा उपयोग होतो. मनुका थोडेसे सैंधव लावून थोड्याशा तुपावर परतून घेतल्या व काही दिवस रोज खाल्ल्या तर गुण येतो. - कोणत्याही कारणाने शुक्रक्षय झाला असला (हस्तमैथुन, अतिमैथुन, स्वप्नदोष वगैरेमुळे) व त्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर येत असली तर रोज अर्ध्या नारळाचे ओले खोबरे वाटून त्यातून निघालेले दूध चवीनुसार साखर टाकून पिण्याचा उपयोग होतो. - ताप चढल्यामुळे चक्कर येत असली तर कपाळावर रिठ्याच्या पाण्याच्या घड्या ठेवण्याने बरे वाटते. यामुळे ताप उतरण्यासही मदत मिळते. बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्यक होय. - डोक्यात सर्दी साठून म्हणजे डोके जड होऊन चक्कर येत असली तर सुंठीचे बारीक चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाद्वारा ओढल्याने बरे वाटते.
रक्तातील साखर कमी झाल्याने चक्कर आली असता पटकन साखर-पाणी देण्याचा उपयोग होतो.
- भूक लागली असूनही बराच वेळ काही खाणे झाले नाही तरी चक्कर येऊ शकते. असा वेळी साळीच्या लाह्या, दूध, साखर असे मिश्रण खाण्याने लगेच बरे वाटते. - गाडी लागल्यामुळे चक्कर येण्याची सवय असणाऱ्यांना प्रवासाच्या आधी व प्रवासात थोड्या थोड्या वेळाने साळीच्या लाह्या खाण्याचा उपयोग होताना दिसतो. - विरळ हवेच्या उंच ठिकाणी जाताना सुती कापडात कापूर, वेलची, ओवा, वेखंड यांच्या पुरचुंडीचा अधूनमधून वास घेण्याने चक्कर येण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
अशा प्रकारे चकरेवर साधे उपचार करता येतात, बहुतेक वेळा त्यांचा उत्तम गुण येतो, मात्र वारंवार चक्कर येत असली, त्याबरोबर इतर गंभीर लक्षणे दिसत असली, व्यक्तीचे वय मोठे असले किंवा घरात गंभीर विकारांचा इतिहास असला तर मात्र लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणेच श्रेयस्कर होय.
भोवळ म्हणजे चक्कर. चक्कर येणे हे एक लक्षण आहे त्याची अनेक कारणे असू शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. उन्हाळ्यात उन्ह लागणे,रक्तदाब पुष्कळ कमी होणे,शरीरातुन कोणत्याही कारणाने खूप रक्तस्त्राव होणे,रक्तातील साखरेचे प्रमाण खूप घटणे, मेंदुस अचानक रक्तपुरवठा कमी वा बंद होणे अशा व यासदृश्य कारणांनी होणारी मानवी शरीराची स्थिती यास भोवळ येणे म्हणतात.एकाच जागेवर स्वतःभोवती गोल-गोल फिरल्यावर जशी भावना निर्माण होते वा जशी शरीराची स्थिती होते त्यागत, भोवळ आल्यावर वाटते.भोवळ आल्यावर मनुष्याच्या शरीराचे संतुलन बिघडते व तो खाली पडतो.क्वचित बेशुद्धावस्थेतही जातो. वेळीच उपचार न मिळाल्यास तो कोमात जाऊ शकतो वा मृत्युमुखीही पडु शकतो. ही, मानवी शरीराची आपत्कालीन स्थिती दुर करण्यास व त्यास सामान्य स्थितीत आणण्यासाठी शरीराने केलेली प्रतिक्रिया आहे असे समजतात.