Jump to content

भुवनेश कीर्तने

भुवनेश कीर्तने ऊर्फ भुवनेश्वर महाराज महाराजांचा जन्म दिनांक ३ एप्रिल १९१८ साली भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील महिकावती ऊर्फ के.माहीम गावी केशवनाथ स्वामींच्या कुळात झाला.[]

ऐतिहासिक पार्श्वभूमी

केमाहीम ऊर्फ माहीम हे त्यावेळी तालुक्याचे ठिकाण होते.प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या पुण्यभूमीत केशवनाथ स्वामी, सोनोपंत दांडेकर, प्रज्ञानंद सरस्वती ह्या थोर विभूतीं सुद्धा जन्माला आलेल्या होत्या.त्याकाळी देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. अनेक चळवळी चालू होत्या. देशप्रेमाने प्रेरित होऊन महात्मा गांधींच्या १९४२ च्या चलेजाव आंदोलनात महाराजांनी सहभाग घेतला.त्यांना अटक होऊन येरवडा कारागृहात शिक्षा झाली.गांधी विचारांचा प्रभाव होऊन त्यांनी आजन्म खादीवस्राचा वापर केला.

शैक्षणिक पार्श्वभूमी

महाराजांनी आपले प्राथमिक शिक्षण माहीममध्येच घेतले. माध्यमिक शिक्षणासाठी डहाणू येथे पोंदा माध्यमिक शाळेत जावे लागले. तेथे त्यांना त्यावेळचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब कीर्तने ह्यांची मदत झाली. नाशिक येथे एच.पी.टी.महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील चर्नीरोड स्थित विल्सन महाविद्यालयातून बी.ए.अॉनर्स पदवी संपादन केली.नंतर बी.टी.पदवीसुद्धा त्यांनी प्राप्त केली.

भुवनेश कीर्तने विद्यालय

त्याकाळी आसपासच्या परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती. समाजातील प्रतिष्ठित लोकांना एकत्र करून स्वतंत्र माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रथम इयत्तावार वर्ग चालू केले आणि नंतर केळवा-माहीम मधील पानव्यापारी,बागायतदार, सधन शेतकरी ह्यांची आर्थिक मदत घेऊन तसेच विद्यार्थी,स्वयंसेवक आणि कार्यकर्ते ह्यांच्या श्रमदानातून विद्यालयाची इमारत उभी केली.१५ जून १९४४ रोजी कै.पां.वा. गाडगीळ ह्यांच्या हस्ते शाळेचे उद् घाटन होऊन कै.काकासाहेब चित्रे ह्यांच्या मुख्याध्यापक पदाखाली महिकावती परिसरात माध्यमिक शिक्षणाची द्वारे खुली झाली. काकासाहेबानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाची धुरा भुवनेश्वर महाराजांनी स्वतः सांभाळत नाममात्र केवळ एक रुपया वेतन घेऊन संस्था उत्तरोत्तर वाढविली. या शाळेच्या उभारणीत महाराजांना अनेक प्रापंचिक अडचणी आल्या. फक्त शाळा हा ध्यास असल्यामुळे आणि उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांना आपली 5 एकर जमीन विकावी लागली. प्रसंगी पत्नीचे दागिने विकावे लागले. अनेक गरीब विध्यार्थी व शिक्षक महाराजांच्या घरी आश्रयास असत. अवघ्या 42 व्या वर्षी त्यांना प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू आला. इस्पितळात भेटायला जाणाऱ्या व्यक्तीला माझी मुले व पत्नी कसे आहेत हे त्यांनी कधी विचारले नाही. आपली शाळा कशी आहे हेच फक्त ते विचारायचे. पदवीनंतर त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवीत होते पण त्यांनी ते शाळेच्या ध्येयासाठी नाकारले. ते पालघर कोन्ग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी राजकारण संन्यास घेतला व फक्त शैक्षणिक कार्यास वाहून घेतले.

संदर्भ

  1. गुरुवर्य महाराज :माहीम शिक्षण संस्था, माहीम, ता.जि.पालघर,महाराष्ट्र.मुद्रक-आनंद प्रिंटींग प्रेस, पालघर.२७ डिसेंबर२००९.
  1. ^ प्रसाद प्रकाशन :केशवाश्रम, राममंदिर,के.माहीम. शके चैत्र शुद्ध दशमी १८९६. दिनांक २ एप्रिल १९७४.