भुरा खाटीक
शास्त्रीय नाव | (Lanius excubitor) |
---|---|
कुळ | सौनिकाद्य (Laniidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | ग्रेट ग्रे श्राइक (Great Grey Shrike) |
संस्कृत | लटूषक |
हिंदी | कसाई चिडिया, बडा लटोरा (लहटोरा) |
माहिती
भुरा खाटिक हा साधारण २५ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. याचा मुख्य रंग राखाडी पांढरा असून याच्या कपाळ, डोळे आणि चोचीजवळ काळी पट्टी असते तर काळ्या पंखावर पांढरा पट्टा लक्ष वेधून घेतो. चोच मोठी व बाकदार असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. सहसा एकांतप्रिय असा पक्षी. त्याच्या डोळ्याजवळच्या काळ्या पट्टीमुळे या पक्ष्याला गांधारी असेही म्हणतात.
आढळस्थान
भारतात हिमालय ते कर्नाटक या संपूर्ण भागात याची वस्ती आहे. तसेच पश्चिमेला पाकिस्तानपासून ते पूर्वेला बंगालपर्यंत भुरा खाटिक आढळतो. याच्या रंग आणि आकारावरून अनेक उपजाती जगभर आहेत. हा वाळवंटी भागात, पानगळीच्या प्रदेशात, शेतीच्याजवळ, काटेरी झुडपांवर राहणे पसंत करतो.
खाद्य
पाली, उंदीर, सरडे, लहान साप हे याचे अन्न असून हा आपले खाद्य झाडाच्या काट्याला अडकवून मारतो. अशा प्रकारे गरजेपेक्षाही जास्त शिकार करून ती झाडाला (काट्याला) अडकवून ठेवलेली दिसते.
विणीचा हंगाम
जानेवारी ते ऑक्टोबर हा याचा विणीचा काळ असला तरी मुख्य काळ मार्च ते जून आहे. याचे घरटे खोलगट, काटक्या-गवताचे, पिसे, ताग यांनी बनलेले असते. जमिनीपासून ३-४ मीटर उंच काटेरी झाडात खाटिक आपले घरटे बनवतो. मादी एकावेळी ४ ते ६, फिकट हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते.
चित्रदालन
- Lanius excubitor
- Cuculus canorus canorus + Lanius excubitor - Museum specimen
- भुरा खाटिक
- खाटिक कुटुंब, (वरून खाली) नर, मादी आणि पिल्लू
बाह्य दुवे
- पक्ष्यांची मराठी नावे (१) Archived 2015-05-12 at the Wayback Machine.
- Bird Names (English-Marathi)
- पक्ष्यांची मराठी नावे (२) Archived 2015-09-16 at the Wayback Machine.