भास्करराव दुर्वे
स्वातंत्र्य सैनिक, साथी भास्करराव दुर्वे नाना (जन्म: [[२९ एप्रिल|२९ एप्रिल १९२०]] संगमनेर, मृत्यू: १३ डिसेंबर १९७९ पुणे ), हे संगमनेर-अकोले परिसरातील श्रमिक, कष्टकरी, आदिवासी, विडी कामगारांचे नेते होते. ते प्रजा समाजवादी पक्षाचे नेते होते, त्यांनी परिसरातील मजूर, कामगार, कष्टकरी, महिला यांच्यासाठी कार्य केले. त्यांना कामगार आदिवासी साथी म्हनत. ते अहमदनगर जिल्ह्यात दुर्वे नाना या नावाने ओळखले जात होते. त्यांना अहमदनगर ज़िल्ह्याचे साने गुरुजी म्हणत. ते व्यवसायाने वकील होते. वकिली करतानाच राजकीय आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या जीवनावर साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी ताम्रपट (१९९४) ही कादंबरी लिहिली आहे. याच कादंबरीस नंतर साहित्य अकादमी पुरस्काराणे गौरविन्यात आले,
गोवा मुक्ति आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाववाढ विरोधी आंदोलन, आदिवासी जमिनी अतिक्रमण मुक्ति लढा अशा अनेक लढ्यात ते अग्रभागी होते. साने गुरुजींचे शिष्य आणि बाबा आमटे यांच्या 'रचनात्मक संघर्ष' या कल्पनेचे ते क्रियाशील पुरस्कर्ते होते.[१]
त्यांच्या नावाने साथी भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले असून राष्ट्र सेवा दलाचे माज़ी महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक या ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त आहेत,
शिक्षण
- १९३५ : मॅट्रिक, संगमनेर[१]
कौटुंबिक
- १९४९ : विवाह
प्रमुख घटना
- १९३७ : विलेपार्ले खटल्यातील एक आरोपी. शस्त्रास्त्रे जमविल्याबद्दल सहा महिने कारावासाची शिक्षा, पण हाती न लागल्याने शिक्षा भोगली नाही.
- १९४० : संगमनेर-अकोले भागात राष्ट्र सेवा दलाचे काम सुरू.
- १९४२ : 'चले जाव' आंदोलनात भाग. भूमिगत.
- १९४५ : संगमनेर येथे राष्ट्र सेवा दलाचा युवक मेळावा, साने गुरुजी उपस्थित.
- १९४७ : खिरविरे ता. संगमनेर येथे सावकारशाही विरुद्ध शेतकरी लढ्याचे नेतृत्व, चळवळ यशस्वी केली.
- १९४९ : कामगार, विडी मजदूर सभेची स्थापना
- १९६५ : महागाई विरोधात आंदोलन १९६७-७०: भूमिहीनांना जमीन वाटपाचा प्रश्न, आदिवासी जमिनींच्या अतिक्रमणाचा प्रश्न, धरणग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला मिळविण्याचे आंदोलन, त्यात यश.
- १९७५ : सानेगुरुजी वाचनालयाची स्थापना, आणीबाणीत आजारी असतानाही लोकजागृती.
निवडणुका
- १९५२ : संगमनेर येथून विधानसभेची निवडणूक लढविली. प्रचारासाठी जयप्रकाश यांची उपस्थिती.
- १९६२ : विधानसभेची निवडणूक पराभूत
- १९६७ : विधानसभेची निवडणूक पराभूत
१९५२ साली संगमनेर विधानसभा निवडणुकीत बी.जे. खताळ पाटील (काँग्रेस), कॉ. दत्ता देशमुख (कामगार किसान पक्ष) व भास्करराव दुर्वे (प्रजा समाजवादी) अशी निवडणूक झाली. त्यात कॉ. दत्ता देशमुख यांच्याकडून भास्करराव दुर्वे आणि बी.जे. खताळ (काँग्रेस) पराभूत झाले. १९६२ची निवडणूक पुन्हा बी.जे. खताळ पाटील (काँग्रेस), कॉ. दत्ता देशमुख(लाल निशाण पक्ष) व भास्करराव दुर्वे (प्रजा समाजवादी) यांच्यात झाली. त्यात खताळ (काँग्रेस) यांच्याकडून भास्करराव दुर्वे (आणि कॉ. दत्ता देशमुख : लाल निशाण पक्ष) पराभूत झाले. १९६७ सालची निवडणूक बी.जे. खताळ पाटील (काँग्रेस) आणि भास्करराव दुर्वे अशी लढत होऊन पुन्हा भास्करराव दुर्वे पराभूत झाले. विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये ते केवळ ५०० मतांच्या फरकाने पराभूत झाले.
श्रद्धांजली लेख
प्रा. मा. रा. लामखडे यांनी भास्करराव दुर्वे यांच्यावर "श्रमण्यातच विश्रांती, झिजणे उल्हास जया....."[१] हा लेख लिहिला आहे.
संदर्भ
- ^ a b c प्रा. मा. रा. लामखडे, "श्रमण्यातच विश्रांती, झिजणे उल्हास जया.....", पान १०५ ते १०९; "दर्शन" ग्रंथ, पान २१; संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा. ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय् ज ॲडव्हरटायझिंग, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-