भाषा
भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.
मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय. कोणताना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो.
थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे.
मराठी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची भाषा आहे.
भाषेची व्याख्या
सर्वसाधारण व्यवहारात 'भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण कशाचा नेमका अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा त्यामुळे भाषेची अधिक नेमकेपणाने व्याख्या करू इच्छिते. भाषेचे स्वरूप नेमकेपणाने उलगडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहता, केवळ 'बोलणे' म्हणजे भाषा नव्हे, तर भाषा ही गोष्ट त्यापलिकडची, अधिक व्यापक अशी आहे, असे आज अभ्यासक मानतात. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्याने तिच्याकडे पाहण्याच्या विविध रीती आणि दृष्टिकोन संभवतात. साहजिकच तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकारे केल्या गेल्या आहेत. मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे 'भाषा'होय.
भाषेचे स्वरूप
वरील व्याख्येनुसार भाषा ही संकेतव्यवस्था असते, असे आपण पाहिले. याचा अर्थ आशय व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठरावीक खुणा वापरल्या जातात.जेव्हा भाषावैज्ञानिकांनी मानवी भाषांचा विचार केला, तेव्हा त्यांना या खुणा प्रामुख्याने ध्वनिरचनांच्या स्वरूपात आढळल्या. सुट्या ध्वनींच्या माध्यमातून नव्हे, तर त्यांच्या रचना करूनच अर्थ व्यक्त होत असतो. त्याचे कारण असे की माणूस व्यावहारिकदृष्ट्या वेगळे ओळखू येणारे किती ध्वनी उपयोगात आणू शकतो, याला मर्यादा आहेत. त्याला व्यक्त करायचे असणारे अर्थ मात्र अमर्याद आहेत. त्यामुळे मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचे तंत्र मानवी भाषेने विकसित केले असे म्हणता येईल. तसेच रेडिओ किंवा दुूरदर्शनचा संच बाहेरून बघितला तर खूपच सुबक आणि आकर्षक तारांच्या दिसतो. पण मागच्या बाजूने तो उघडला की त्याच्यात वेगवेगळ्या खूपच गुंतागुंतीच्या रचना केलेल्या आहेत असे दिसते. भाषेचे स्वरूप असेच गुंतागुंतीचे असते. प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळे ती खूप सोपी आहे असे वाटत असते. पण कोणत्याही भाषेचे स्वरूप आपण समजावून घ्यायला लागलो की तिच्यात दूरदर्शन संचाप्रमाणे खूपच गुंतागुंतीच्या रचना आहेत असे लक्षात येते.[१]
भाषेचे प्रकार
- ^ मालशे, डॉ. स गं (25 डिसेंबर 1987). भाषाविज्ञान परिचय. पुणे: संजय प्रकाशन. p. 10.
भाषा ही संज्ञा विविध अर्थांनी वापरली जात असल्याने तिचे असे प्रकार करताना कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यावे लागते. स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांकेतिक
भाषा आणि संवाद.
भाषा उत्क्रांती
अतिप्राचीन काळी मनुष्यप्राण्याच्या शरीरातल्या इतर संस्थांसमवेत मज्जासंस्था, श्रवणसंस्था, कंठ, ओठ, जीभ, दात, नाक ह्या अवयवांची अतिआश्चर्यजनक उत्क्रांती झाली, आणि त्यायोगे तोंडाने तऱ्हेतऱ्हेचे आवाज (ध्वनी) करणे आणि दुसऱ्या प्राण्यांनी/मनुष्यांनी केलेले आवाज (ध्वनी) ऐकणे ह्या गोष्टी मनुष्यप्राण्याला शक्य झाल्या. त्या उत्क्रांतीच्या आणखी पलीकडे माणसाच्या मेंदूची उत्क्रांती अशी की विशिष्ट आवाजांना विशिष्ट मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके करण्याची कल्पना माणसाला सुचली. त्यानंतरचा माणसाच्या बुद्धीचा टप्पा म्हणजे वेगवेगळ्या मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके ठरलेल्या शब्दांना विशिष्ट रित्या वाक्यांच्या साखळ्यांमधे बांधून सभोवतीच्या माणसांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची माणसाला सुचलेली कल्पना. मुख्य म्हणजे विशिष्ट आवाजांच्या साखळ्यांच्या प्रतीकांद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्याकरता माणसांच्या "टोळ्यां"मधे प्रतीकांसंबंधात सर्वसंमतता अनिवार्यतः असावी लागणार होती आणि असावी लागते.
वर म्हटलेली "टोळ्यां"मधली शब्द आणि भाषेचे व्याकरण ह्यांबाबतची सर्वसंमतता गरजेपायी हळूहळू कशी तयार झाली असावी ही कल्पना खूप मनोरंजक आहे. कारण कुठल्याही "टोळी"मधली ती सर्वसंमतता कुठल्याही काळी टोळीतल्या अग्रणींच्या सभा भरवून टोळ्यांनी ठरवल्या नव्हत्या! कालौघात वेगवेगळ्या भाषांमधले व्याकरण हळूहळू ठरत गेले, वेगवेगळे शब्द प्रचारात आले, काही शब्दांचे अर्थ बदलले, काही प्रचलित शब्द अप्रचलित झाले. भाषांमधले शब्द आणि व्याकरणसुद्धा, दोन्ही गोष्टी कालौघात अनिवार्यतः हळूहळू बदलत असतात.
मराठी भाषा उत्क्रांती
उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांना लिहून घेण्याकरता कथन केलेल्या एका पत्राच्या सुरुवातीतली भाषा अशी :
"मशरूल अनाम जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे दलवटणे ता॥ चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे. सु॥ अबी सबैन व अलफ. कसबे चिपळूणीं साहेबी लष्कराची विल्हे केली आणि याउपरी घाटावर कटक जावें ऐसा मान नाही..."
—शिवाजी महाराज
त्याउलट शिवाजी महाराजांच्या आधी तब्बल चारशे वर्षे आयुष्य कंठून गेलेल्या संत जनाबाईंच्या नावे जे सुमारे ३०० अभंग प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या अभंगांमधली भाषा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे हे मोठे कोडे आहे. उदाहरणार्थ संत जनाबाईंच्या नावे प्रसिद्ध असलेला एक अभंग असा:
"उदक भरलें नेत्रीं । पुशितसे आपुले पदरीं ॥
जीवीच्या जीवना । श्रमूं नको नारायणा ॥
प्रेमें दाटलीसे कंठीं । गळां घातलीसे मिठी ॥
नको कष्टी होऊं देवा । जनी दासी रे केशवा ॥"—संत जनाबाईं
चोखा मेळा,नामदेव, वगैरे इतर प्राचीन संतांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अभंगांमधली भाषासुद्धा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, आणि संत जनाबाई हे तिघेही समकालीन होते. असे असून फक्त ज्ञानेश्वरीतली भाषा जुन्या साच्यातली (प्राकृत) आहे.
लिपी उत्क्रांती
काही भाषा फक्त "बोलभाषा" आहेत, म्हणजे बोललेल्या विचारांच्या शब्दप्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिह्ने/प्रतीके त्या भाषांमधे नाहीत. शब्दप्रतीकांशी सुसंगत लेखी चिह्ने/प्रतीके--म्हणजे भाषांच्या लिप्या-- तयार करण्याची कल्पना पुरातन काळी कोणत्या तरी कल्पक माणसाला ज्या दिवशी प्रथम सुचली तो दिवस चाक तयार करण्याची कल्पना माणसाला सुचलेल्या दिवसाइतकाच महत्त्वाचा खास आहे. अर्थात आपले विचार शाश्वतरीत्या प्रकट करून ठेवण्याकरता माणसाला खूप मर्यादी अशी चित्रलिपी प्रथम सुचली होती.
आपल्या परिचयाच्या देवनागरी लिपीमध्ये सुट्या सुट्या ध्वनींचे लेखन करण्याची पद्धत आहे.
संदिग्ध भाषा, विनोद
भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" -प्रतीक-- असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणाऱ्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. दुसऱ्याशी बोलताना कुठल्या तरी शब्दासंबंधी त्या वस्तुस्थितीची पुसट कल्पना जर एकाद्याच्या मनात डोकावली तरच त्याबाबत स्पष्टीकरण होऊन त्या दोघा माणासांच्या विचारांच्या देवाणघेवाणीत लहानमोठा अनर्थ टळू शकतो. उलट काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी आपल्या वक्तव्यात काहीकाही सन्दिग्ध शब्द ते ऐकणाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून वापरत असतात!
काही शब्दांचे सूचितार्थ वेगवेगळ्या माणसांच्या मनात भिन्न असतात ही एक गोष्ट; त्याच्या जोडीला कितीतरी शब्दांना अगदी भिन्न असे तीन-पाच-दहा-पंधरा सर्वसंमत अर्थ असतात. ह्या गोष्टीचा उपयोग करून—शब्दश्लेष किंवा अर्थश्लेष योजून—विनोद निर्माण करण्याची कल्पना जगातल्या सगळ्या समाजांमधे शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. त्या विनोदांमधली अनपेक्षितता श्रोत्यांचे/वाचकांचे मनोरंजन करण्याला कारणीभूत होत असते. तशा तऱ्हेचे विनोद करून मूळ गंभीर विषयाला पार बगल देण्याचे कामही काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी करत असतात.
नावात काय आहे?
- This section looks like "Original Research" needs Wikification
तात्त्विक दृष्ट्या कोणत्याही भाषेतले शब्द ही केवळ कशीना कशी सर्वसंमत झालेली प्रतीके आहेत. तेव्हा "नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले --किंवा वाच्यार्थाने नाव 'ठेवले'-- तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार" अशा साधारण भाषांतराचे एक वाक्य शेक्सपिअर ह्या इंग्रजी श्रेष्ठ लेखकाने "रोमिओ ऍंड जूलिएट" ह्या आपल्या नाटकातल्या दुसऱ्या अंकात जूलिएटच्या तोंडी घातले आहे. पण ते विधान करणाऱ्या जूलिएटला माणसाच्या मनोरचनेचे संबंधित ज्ञान उघडपणे बरेच कमी होते. पूर्वी प्रचारात असलेल्या कुठल्याही अप्रिय गोष्टीच्या संज्ञेशी काही संबंध किंवा उच्चाराचे साम्य असलेली किंवा कानाला कर्कश भासणाऱ्या अक्षरक्रमाची एकादी संज्ञा जर कोणी कुठल्या गोष्टीला नव्याने दिली तर ती संज्ञा समाजात हळूहळू सर्वसंमत होण्याची शक्यता माणसाच्या मनोरचनेपायी सुतराम नाही. "'गु', 'ला', आणि 'ब' ह्या तीन क्रमवार अक्षरांनी मराठीभाषिकात सर्वसंमत झालेली संज्ञा असलेल्या गोष्टीला जर कोणी "ठुळाफ" किंवा "ठठठ" अशी वैकल्पिक संज्ञा सुचवली तर ती कोणी वापरेल का?" अशा आशयाचा जूलिएटला लगेच विचारलेला इंग्रजीतला प्रश्न शेक्सपियरने रोमिओच्या तोंडी घालायला हवा होता. पण नाटकातल्या त्या प्रसंगी जूलिएट आणि रोमिओ हे दोघेही मदनवशावस्थेत रममाण होते!
भाषा प्रभाव
आपली मातृभाषा ही एकच भाषा माणसाला अवगत असली तर विशेषतः त्या परिस्थितीत त्या कुठल्याही मातृभाषेचे व्याकरण आणि तिच्यातल्या शब्दभांडाराची जी काही असेल ती मर्यादा, ह्या दोन्ही बाबींचा माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर, आणि मग आयुष्याच्या एकूण अनुभवावर अगदी मोठा प्रभाव असतो. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणाऱ्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त. (अर्थात माणसाने आपल्या भाषेच्या संपन्नतेचा फायदा मुळात घेतला पाहिजे हे उघड आहे.) इंग्रजी भाषेतले शब्दभांडार जगातल्या सर्व भाषांमधे सर्वांत अधिक व्यापक असल्याचे तज्ञ मानतात. असे असूनही माणसांच्या आयुष्यात ज्या 'अनंत" सूक्ष्मरीत्या भिन्न घटना घडत असतात त्यांचे शब्दांनी नीट वर्णन करायला इंग्रजी भाषेतलीही नामे, क्रियापदे, विशेषणे, आणि क्रियाविशेषणे तोकडी ठरतात. मग माणसे नाइलाजाने "किंचित", "जराशी", "काही वेळा" अशा तऱ्हेची विशेषणे/क्रियाविशेषणे विशेषणांना/क्रियाविशेषणांना जोडून वेळ भागवून नेत असतात.
भाषांच्या वर लिहिलेल्या वेगवेगळ्या मर्यादा अस्तित्वात असूनही आपण माणसे इतके विचार आणि इतरांशी विचारांच्या इतक्या देवाणीघेवाणी करू शकतो हे एक खूप मोठे आश्चर्य आहे.
आजच्या जगात लोक ६,८००हून अधिक भाषांद्वारे आणि ४१,०००हून अधिक बोलीभाषांद्वारे विचारांची देवाणघेवाण होते.[ संदर्भ हवा ]
परिशिष्टे
- कोणत्याही समाजात जन्मलेली मुले, मातृभाषेतल्या चेंडूसारख्या शेकडो मूर्त गोष्टींच्या, "चेंडू" वगैरे संज्ञाच नव्हे तर पाहणे, विचार करणे ह्यांसारख्या शेकडो अमूर्त गोष्टीं निदर्शविणारे "पाहणे", "विचार करणे" वगैरे शब्द किंवा शब्दसमुच्चय; मातृभाषेचे गुंतागुंतीचे व्याकरण; मातृभाषेतले वाक्प्रचार/म्हणी; आणि शब्दांचे अचूक उच्चार ह्या सगळ्या गोष्टी, अवतीभोवतीच्या मोठ्या माणसांची बोली ऐकत राहून हळूहळू विनासायास आत्मसात करू शकतात. ह्या बाबीत प्रकट होणारी मनुष्यप्राण्याच्या मेंदूची उत्क्रांती हे निसर्गातले एक निःसंशय महदाश्चर्य आहे.
कुठलीही परकी भाषा मोठेपणी बोलायला शिकले असता ती मातृभाषा असलेल्या लोकांप्रमाणे "अचूक" उच्चार करून बोलणे मोठ्या माणसांना बहुतेक कधीच जमत नाही, उलट लहान मुलांना ती गोष्ट सहज जमत असते हे माणसाच्या मेंदूचे गंमतीचे वैशिष्ट्य आहे.
- मराठीची (देवनागरी) लिपी बरीचशी उच्च्चारानुसारी (phonetic) आहे; म्हणजे मराठी शब्दोच्चार आणि लिखाण ह्यांच्यात नाते पुष्कळच असंदिग्ध आहे.त्यामुळे मराठी (आणि संस्कृत, हिंदी, गुजराती) लिखाण शिकताना इंग्रजीप्रमाणे शब्दांमधला अक्षरक्रम (spelling) शिकावा लागत नाही.
मूल काही महिन्यांचे असते तेव्हापासून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनीला ठरावीक प्रकारचा प्रतिसाद देऊ लागते असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असावा. जेवढा सराव जास्त तेवढा विविध भाषा त्याला अवगत होतात. कानावर पडलेले शब्द तो बोलण्याचा सराव करतो.
भाषाविषयक मराठी पुस्तके
- आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन (मिलिंद मालशे)
- भाषा आणि भाषाविज्ञान (डॉ. रमेश धोंगडे)
- भाषा व भाषाशास्त्र (श्री. न. गजेंद्रगडकर)
- भाषा आपली सर्वांचीच (अविनाश बिनीवाले)
- भाषा: इतिहास आणि भूगोल (ना.गो. कालेलकर)
- भाषाचिंतन (डाॅ. केशव सखाराम देशमुख)
- भाषा - विचार आणि मराठी भाषा (गं. ब. ग्रामोपाध्ये)
- भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य (वा. के. लेले)
- वैखरी : भाषा आणि भाषा व्यवहार (डॉ. अशोक केळकर)
हे सुद्धा पहा
संदर्भ
- आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन; मिलिंद मालशे.
- https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10073-2012-07-19-04-41-56?showall=&limitstart=
- भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग १
- भाषाविकास - एक जीवशास्त्रीय आढावा- भाग २
- भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ३
- भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ४ (समाप्त)