भालचंद्र गोपाळ देशमुख
भारतात स्वातंत्र्यानंतर नेक, बुद्धिमान आणि लोकहित सर्वोच्च मानणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची जी पिढी उदयाला आली, त्यात बी. जी. म्हणजे भालचंद्र गोपाळ देशमुख अग्रगण्य होते. निवृत्त झाल्यावरही दोन दशके ते सामाजिक कामांमध्ये सहभागी होते.
बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असो की 'कास्प', आपल्या अनुभवाचा, विचक्षण दृष्टीचा फायदा ते संस्थांना करून देत. अवघ्या बाविसाव्या वर्षी आयएएस झालेला पुण्याचा हा तरुण पुढच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत नोकरशाहीतील सर्वोच्च स्थानी गेला.
राजीव गांंधी पंतप्रधान असताना ते त्यांचे प्रधान सचिव झाले. त्यानंतर राजीव गांधींचा पराभव झाल्यावर विश्वनाथप्रताप सिंग पंतप्रधान झाले. देशमुखांवर त्यांचा इतका विश्वास की त्यांनी देशमुखांनाच काम करण्याचा आग्रह केला. वेगळ्या पक्षांच्या दोन पंतप्रधानांनी एकाच सचिवाची सेवा घेण्याचा स्वातंत्र्यानंतरचा हा एकमेव प्रसंग होता.
सिंग यांच्यानंतर चंदशेखर पंतप्रधान झाले तेव्हा देशमुखांनी राजीनामा देऊ केला. तो चंदशेखरांनी स्वीकारता नाही. १५ दिवसांनी मात्र त्यांना हलवले. ही गोष्ट देशमुख यांच्या मनाला लागली. मग जेआरडी टाटा यांनी त्यांना बोलावले. पण निवृत्तीनंतर दोन वर्षे खासगी सेवेत जायचे नाही, असे बंधन सनदी अधिकाऱ्यांवर असते. आश्वासन देऊनही चंदशेखर यांनी ते शिथील केले नाही. या सगळ्याचा देशमुखांनी पुस्तकात कोणावरही दोषारोप न करता तटस्थ उल्लेख केला आहे.
राजीवनी पंजाब, आसाम करार केले. त्यातल्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही, याकडे देशमुख यांनी जातीने लक्ष दिले. ते स्वतः अनेकदा पंजाबात गेले. आज पंजाब विकास व शांततेच्या मार्गावर आहे, यात देशमुखांचेही मोठे योगदान आहे.
निवृत्तीनंतर तर त्यांची जणू दुसरी इनिंग्ज सुरू झाली. ती होती, लोकहिताच्या संस्थांच्या पाठीशी उभे राहण्याची. मुंबईत 'बंद'ला बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेपासून एशियाटिक सोसायटीचे अध्यक्षपद सांभाळण्यापर्यंत सर्वत्र ते क्रियाशील होते.
'फ्रॉम पुणे टू प्राइम मिनिस्टर' हे पुस्तक त्यांनी लिहिले. ज्या पुण्यातून त्यांचा प्रवास सुरू झाला, त्याच पुण्यात ते परतले होते. तरी त्यांची आठवड्याला मुंबईची फेरी कधी चुकली नाही. देशमुखांना मोठे कौटुंबिक आघात सोसावे लागले. त्यांची पहिली पत्नी अचानक लवकर निधन पावली. त्यांची एकुलती एक मुलगीही अवघ्या विसाव्या वषीर् मरण पावली. नंतर दुसरी पत्नी विजया याही काही वर्षांपूर्वी मरण पावल्या. देशमुख एकाकी झाले. पण सार्वजनिक कामांमध्ये त्यांनी हे एकाकीपण बुडवून टाकले. सनदी सेवेतून, गाजावाजा न करताही किती देशसेवा कशी करता येते, याचा भालचंद देशमुख हा जागता वस्तुपाठच होता.