Jump to content

भाऊराव भिमाजी पाटील मतसागर


भाऊराव भिमाजी पाटील मतसागर
जन्म१९२३
जरुळ,वैजापूर,औरंगाबाद
मृत्यू१९९५
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
धर्महिंदू


भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म १९२३ साली औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ या गावी झाला.

वैयक्तिक

अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. त्यांनी मराठीभाषेसोबतच इतर विविध (मोडी, तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्लिश भाषा इ.) भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या आणि काही पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय होय. आपल्या जरुळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही. औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारुकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटी चौकात सत्याग्रह केला. त्यात त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटीकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरूंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.

राजकारण व समाजकारण

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. व्ही.व्ही. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल ताम्रपत्र बहाल केले.

कृषिक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना त्या वेळचे राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतर श्रीलंकेच्या पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते.

१९९५ मध्ये वयाच्या ७२व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले.