भरतगड
भरतगड | |
नाव | भरतगड |
उंची | ७५ मीटर |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी. |
ठिकाण | सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सिंधुदुर्ग,सावंतवाडी,मसूरे |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | चांगली |
स्थापना | {{{स्थापना}}} |
इतिहास
शिवाजी महाराजांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांना मिळाला. तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.
मसुरे गावात कालावल खाडीकाठी मोक्याच्या जागी उभ्या असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७० मध्ये शिवरायांनी पहाणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. १६८० साली वाडीकर फोंड सावंत व कोल्हापूरचे वावडेकर पंतप्रतिनिधी यांच्यात तंटा झाल्यावर फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले. त्यासाठी प्रथम त्यांनी विहीर खोदायला सुरुवात केली २२८ फूट खोल खोदल्यावर विहीरीला पाणी लागले. त्यानंतर १७०१ साली किल्ला बांधून झाला. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर फोंड सावंत पेशव्यांच्या बाजूने उभे राहिले, त्यामुळे चिडून तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर १७४८ साली हल्ला केला व गड जिंकून घेतला. पण लवकरच सावंतांनी गड परत ताब्यात घेतला. सन १७८७ मध्ये करवीरकरांनी भरतगड सावंतांकडून जिंकला पण नंतर त्याचा ताबा सावंतांकडेच दिला. १८१८ मध्ये कॅप्टन हर्चिसनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हा किल्ला जिंकला, त्यावेळी त्याला गडावरील विहीर कोरडी आढळली. गडावर झालेल्या तोफांच्या माऱ्यामुळे विहिरीच्या तळाला तडे जाऊन विहिरीतील पाणी नाहीसे झाले. त्यामुळे गडावर पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात होत्या.
माहिती
गडमाथ्यावर मध्यभागी बालेकिल्ला अथवा परकोट आहे. या परकोटात जाण्यासाठी दोन बाजूंना दोन दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा बुरुजाला लागूनच आहे. दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांची देवडी आहे. डावीकडील तटबंदीजवळच एक लहानसे मंदिर आहे. चौथऱ्यावर हे मंदिर देवसिद्ध महापुरुषाचे आहे. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन केलेले आहे.
भरतगडाचे मुख्य आकर्षण म्हणजे 228 फूट खोल विहीर आहे. इथूनच पुढे भगवंतगड आहे. भगवंतगड पाहण्यासाठी होडीने खाडी ओलांडून जाता येते.
डावीकडील तटबंदीमधे एक लहान दरवाजा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजाच्या बाहेरील तटबंदीचा मोठा भाग सुटा होऊन ढासळला आहे.या बालेकिल्ल्यातून बाहेर पडून दक्षिण टोकावरील बुरजावर जाता येते. उत्तम बांधणीचा बुरूज पाहून पश्चिम टोकावर आल्यावर बालावल खाडीचे दृश्य दिसते. खाडीच्या पलीकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला भंगवतगड दिसतो.
पहाण्याची ठिकाणे
चिरेबंदी पायऱ्यांच्या वाटेने गडावर पोहोचायला ५ मिनीटे लागतात. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण बाजुचे बुरुज, तटबंदी शाबूत आहेत. गडाच्या भोवताली २० फूट खोल व १० फूट रुंद खंदक आहे; दाट झाडीमुळे तो झाकला गेला आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या हाताला तटबंदी ठेवून दक्षिणेकडे चालत गेल्यास तटबंदी व बुरुज लागतात. दक्षिणेकडे तटबंदी जवळ एक खोल खड्डा आहे, ते पावसाचे पांणी साठवण्यासाठी खोदलेले "साचपाण्याचे तळे" असावे. तटबंदीच्या कडेकडेने गडाला प्रदक्षिणा घालून उत्तर टोकाला यावे. गडाच्यामध्ये उंचावर बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज व १० फूट ऊंच तटबंदी आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर देवड्या आहेत. प्रवेशद्वाराजवळील बुरुजावर चढण्यासाठी जिना आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला महापुरुषाचे छोटे देऊळ आहे. देवळामागे कातळात खोदलेली खोल विहीर आहे. त्याच्या उजव्या हाताला दारूचे कोठार, धान्याचे कोठार यांचे अवशेष आहेत. दक्षिणेकडील बुरुजात चोर दरवाजा आहे. या दरवाज्याने बाहेर आल्यास आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो.
कसे जाल?
मालवणपासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरेपर्यंत गाडी मार्गाने येता येते. मसुरे गावापर्यंत मालवणकडून एस.टी. बसेसची सोय आहे.
संदर्भ
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले