ब्राह्मण (वर्ण)
ब्राह्मण हा वैदिक हिंदू धर्मातील चातुर्वर्णांपैकी एक वर्ण व जात आहे.
यास्क ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे,
जन्मना जायते शूद्रः
संस्कारात् भवेत् द्विजः।
वेद पाठात् भवेत् विप्रः
ब्रह्म जानातीति ब्राह्मणः।।
आणखी,
तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयं । ऋणदाताच वैद्यश्च श्रोत्रियः सजला नदी ॥
मराठी भाषांतर - अरे मित्रा - ऋणदाता म्हणजे (अडचणीच्या वेळी) कर्ज देणारा, (आजारी पडल्यावर औषध देणारा) वैद्य, वेद पारंगत ब्राह्मण (म्हणजे श्रोत्रिय) आणि भरपूर पाणी असलेली नदी जिथे हे चार उपलब्ध नसतील तिथे वस्ती करू नकोस. (किंवा करू नये)
याशिवाय, जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः | संस्कारै: द्विज उच्चते ||
विद्यया याति विप्रत्वम् | त्रिभि: श्रोत्रिय उच्चते ||१||......बहुतेक रघुवंशातील.
आणखी,
क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा: | स्वयं जुह्वत एकर्षि श्रद्धयन्तः | तेषामेवैता ब्रह्मविद्यां वदेत | शिरोव्रतं विधिवद्यैस्तु चीर्णम् ||२|| .....मुण्डकोपनिषद
इतिहास
ब्राह्मणांचा इतिहास प्राचीन काळतील वैदिक धर्मापासून सुरू होतो. मनुस्मृतीमध्ये आर्यावर्त हे वैदिक लोकांचे स्थान होते अशी नोंद आहे. ब्राह्मणांच्या दिनचर्येचे वेद हे प्राथमिक स्रोत आहेत. ब्राह्मणांतील सर्व संप्रदाय वेदांपासून प्रेरणा घेतात. असे मानण्यात येते की वेद हे अपौरुषेय आणि अनादि असून ते अंतिम सत्यांवर प्रकाश टाकतात. वेदांना श्रुती असे संबोधले जाते कारण परंपरेनुसार पाठांतराने वेद जतन केले गेले. श्रुतींमध्ये चार वेदांशिवाय ब्राह्मणनामक ग्रंथही आहेत.
गोत्रे आणि प्रवरे
गोत्र हे एका पुरुष-पूर्वजापासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचे नाव असते. पाणिनीने संस्कृतमध्ये गोत्राचे वर्णन "अपत्यम् पौत्रप्रभृती गोत्रम्" असे केले आहे. म्हणजे "मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम". गोत्रे ही बहुधा ऋषींची नावे असतात. उदा. कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून सुरू झालेल्या वंशातील लोक होत. बौधायनसूत्रानुसार अगस्त्य, कश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ आणि विश्वामित्र, या ८ ऋषींपासून ८ प्राथमिक गोत्रे तयार होतात.[ संदर्भ हवा ]
गोत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्वलायन-श्रौतसूत्रानुसार वसिष्ठ गणामध्ये चार उपविभाग आहेत: उपमन्यू, कुंदिन, पराशर आणि वसिष्ठ. या चारांमध्ये पुन्हा उप-उपविभाग आहेत. ज्यांना गोत्र असे म्हणातात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणांत, नंतर पक्षांत व नंतर गोत्रांत होते. आजही भृगू आणि अंगिरस गण अस्तित्वात आहेत. बौधायनानुसार मुख्य ८ गोत्रांचे पक्षांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. उपमन्यूंची प्रवरे इंद्रप्रमाद भारद्वसू व वसिष्ठ; पराशर गोत्रातील प्रवरे पाराशर्य, वसिष्ठ व शाक्त्य; कुंदिन गोत्राची कौंडिण्य, मैत्रात्रवरुण व वसिष्ठ ही होत.[ संदर्भ हवा ]
प्रवरे दोन प्रकारची असतात: १> शिष्य-प्रशिष्य-ऋषी-परंपरा आणि २> पुत्रपरंपरा.
ऋषी आणि पंथ
धर्म, सांस्कृतिक परंपरा, आचार व वैदिक विचार यांच्यातील विविधतेमुळे ब्राह्मणांच्यात पुन्हा पोटजाती निर्माण झाल्या. वेदकाळातील ब्राह्मण वेगवेगळ्या वेदाच्या शिकवणीनुसार वेगळे झाले. एकाच शाखेतील विद्वान ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली विविध पंथ निर्माण झाले. या विद्वान ऋषींनी दिलेल्या शिकवणीला सूत्रे असे म्हणतात. प्रत्येक वेदाची स्वतःची सूत्रे आहेत. सामाजिक, नैतिक व कायदे यांच्या सूत्रांना धर्मसूत्रे, विविध धार्मिक विधींच्या सूत्रांना श्रौतसूत्रे तर घरगुती विधींशी संबंधित सूत्रांना गृह्यसूत्रे असे म्हणतात.
अनेक ब्राह्मणांनी विविध नियम तयार केले. उदा: अंगिरस, अत्रि, आपस्तंब, उषानस्, कात्यायन, गौतम, दक्ष, पराशर, बृहस्पती, बौधायन, मनू, यम, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, विष्णू, व्यास, लिखित, शंख, शतताप, संवर्त आणि हरित. या २१ ऋषींनी स्मृतिलेखनाची सुरुवात केली. यातील आपस्तंब, गौतम, बौधायन आणि वसिष्ठ यांच्या स्मृती सर्वांत जुन्या आहेत.
ब्राह्मणाची कर्तव्ये
यास्काच्या निरुक्तात म्हणले आहे की "ब्रह्मम् जानति इति ब्राह्मणम्". म्हणजेच ज्याला अंतिम सत्य माहिती आहे तो म्हणजे ब्राह्मण. परंपरेनुसार ब्राह्मण हिंदू समाजातील पुजारी आणि पंडित म्हणून काम करत आले आहेत. आज मात्र ब्राह्मण विविध क्षेत्रात गुंतलेले दिसतात.
खालील श्लोकात ब्राह्मणांची सहा कर्तव्ये दिली आहेत.
अध्यापनं अध्यययनम् यज्ञम् याज्ञम् तथा दानम् प्रतिग्रहम् चैव ब्राह्मणानामकल्पयात्
शिकणे, शिकवणे, यज्ञयाग करणे, करवून घेणे, दान घेणे व दान देणे ही ब्राह्मणांची सहा कामे आहेत.
संदर्भ
हे सुद्धा पहा
- ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था
- चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण
- दैवज्ञ ब्राह्मण
- ब्राह्मणेतर चळवळ
कामचालू