ब्राह्मण समाज
ब्राह्मण समाज हा लेख हिंदू ब्राह्मण (जात) असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारित आहे.
ब्राह्मण शब्दाची उत्पत्ति आणि ब्राह्मण (वर्ण)
निरनिराळया वेदांच्या निरनिराळ्या ब्राह्मण जातींत पर्यवसान
इतिहास
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडामध्यें तिस-या विभागांत ब्राम्हण्याचा इतिहास दिला आहे. त्या ठिकाणीं असें दाखविलें आहे कीं, पुरोहित किंवा उपासकाचा धंदा करणा-या वर्गाचें अत्यंत जुनें नांव अथर्वन् किंवा अथ्रवन असें असावें. पर्शुभारतीय काळामध्येंच त्याचें सामाजिक अग्रेसरत्व स्थापन झालें होतें. व याच वर्गास ब्रह्मन् असेंहि नांव मिळालें असावें. ब्रह्मनचा मुलगा तो ब्रह्मपुत्र अगर ब्राह्मण. हीं दोन्ही नांवें सारख्याच वेळीं ॠग्वेदांत येत असल्याकारणानें पौरोहित्य वंशपरंपरा झालेंच होतें. ब्रह्मन् हा शब्द देखील बृह् (स्तुति करणें अगर वाढविणें) +मत् यावरून झाला असावा. ब्रह्मन् या शब्दाचा अर्थ याज्ञिक वाङमयांत निराळ्या अर्थानें आला आहे, त्या अर्थीं सोमसंस्था तयार होण्यापूर्वीं ब्रह्मन् व ब्राह्मण हे शब्द प्रचारांत आले असावे व हा स्तुति करणारा अगर वृद्धि करविणारा वर्ग सोमसंस्थांच्या पूर्वीं म्हणजे यज्ञसंस्था मोठी होण्यापूर्वीं तयार झाला होता. जोपर्यंत यज्ञसंस्था रूढ असून पुरोहितांचा धंदा चालू होता तोंपर्यंत या वर्गांत इतर वर्गांतील व्यक्तींहि प्रवेश करूं शकत असत. या वर्गाला वर्ण हा शब्द ॠग्मंत्रोत्तरकालांत मिळाला असावा व याला जातिस्वरूप कुरूयुद्धोत्तर कालांत येऊं लागलें असावें असें दिसतें. म्हणजे यज्ञसंस्था मागें पडल्यामुळें नवीन ॠत्विज होणें बंद झालें. व पूर्वींच्या पुरोहितवर्गास जातिस्वरूप प्राप्त झालें. तथापि इतर जातींशीं लग्नव्यवहार बराच कालपर्यंत बंद पडला नव्हता.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते प्राचीन काळीं ब्राह्मणांमध्यें गोत्रसंस्था म्हणजे विशिष्ट कुलसमुच्चयाबाहेर विवाहसंबंध करावयास लावणारे नियम नसावेत पण मात्र गोत्रें होतीं, म्हणजे ब्राह्मण आजेपणजांच्या नांवावरून ओळखले जात असत. म्हणजे त्यावेळीं गोत्रें हीं कुलदर्शक नामें म्हणून प्रचारांत होतीं. प्रवर मात्र वाटेल त्या व्यक्तीचीं नांवें निवडीत. प्रवर म्हणजे आव्हान करण्यास योग्य अशा समजलेल्या व निवडलेल्या व्यक्ती. परंतु यज्ञसंस्था मृत होऊं लागल्याबरोबर इतर कर्मप्रसंगीं, बापानें यज्ञप्रसंगीं पतकरलेले प्रवर मुलानें सांगावयाचे अशी पद्धति सुरू झाली, आणि नवीन प्रवर निवडण्याची क्रिया बंद झाली. प्रवर निवडतांना ॠग्वेदांतील मोठालीं मंडलें करणारे ॠषी किंवा आकाशांतील सत्पर्षी म्हणून प्रसिद्ध झालेंले ॠषी यांच्याशीं आपली परंपरा भिडवावी अशी इच्छा जागृत होती व तसे करण्यास थोडेंसें याज्ञिक कारणहि होतें आणि तें म्हणलें म्हणजे पतकरलेल्या म्हणजे प्रवर केलेल्या ॠषीप्रमाणें भिन्न देवता अगर आप्री (पशुयाग विषयक याज्यामंत्र) घ्याव्या असा नियम असे. तर ज्या ॠषींच्यामुळें भिन्न देवता उत्पन्न होणार त्या ॠषींशीं संबंध जुळविण्याची इच्छा होणें स्वाभाविक होतें व यामुळें विश्वामित्र, अग्नि, भरद्वाज, वसिष्ठ, कश्यप, आगस्त्य, गौतम, जमदग्नि या ॠषींशीं संबंध जुळविण्यांत येई व यांपैकीं कोणाशीं संबंध जुळवितां आला नाहीं तर अत्यंत प्राचीन ॠषी किंवा ॠषिकुल जे आंगिरस त्यांच्याशीं जोडण्यांत येई.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते विशिष्ट गोत्राचे व प्रवरांचे लोक आघ्वर्यवाकडे किंवा हौत्राकडे जात असत असा नेम नसे; वाटेल त्या कुळांतील लोक स्वेच्छेप्रमाणें हौत्र किंवा आघ्वर्यव पतकरीत असत. त्यामुळें अघ्वर्यू किंवा होते यांमध्यें सामान्य अनेक गोत्रें सांपडतात. म्हणजे गोत्रांचा व वेदाध्ययनाचा संबंध कांहीं एक नव्हता. अनेक कुलांतील ब्राम्हण वाटेल तो वेद पतकरीत व त्यांत सुद्धां जेव्हां शाखाभेद किंवा सूत्रभेद झाले तेव्हां ते कोणत्या तरी पक्षास मिळाले. फरक एवढाच कीं, शुक्लयजुर्वेदी मंडळीमध्यें मात्र जुनीं गोत्रें कमी सांपडतात. त्यांची गोत्रमालिका कृष्णाहून किंवा आश्वलायनीय होत्यांच्या गोत्रांहून भिन्न आहे. म्हणजे जेव्हां शुक्लयजुर्वेदी वर्ग निर्माण झाला तेव्हां बराचसा भिन्न वर्ग यज्ञजीविवर्गांत शिरला.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राम्हणांचें काम देवतांचे स्तुतिपाठ करूंन त्यांचे यज्ञ करण्याचें होतें, व क्षत्रियांचें काम लढण्याचें होतें. कामाचें विशिष्टीकरण पूर्णपणें कधींच झालें नव्हतें. यज्ञावर एकसारखें पोट भ्रत असेल काय ही शंकाच आहे. ॠषी लढाईंत पडत असत व पुढें ब्राह्मणहि पडत. वसिष्ठ लढाईच्या प्रसंगीं इन्द्रादि देवतांची भरतांकरितां स्तुति करतो व सुदास राजा लढतो असें वर्णन ॠग्वेदांत आहे. याच प्रकारचें काम विश्वामित्र, भरद्वाज, कण्व, आंगिरस वगैरे करतात व भरतांकरितां स्तुति करूंन देवतांस संतुष्ट करतात. परंतु अद्याप या जाती इतर निर्बंधानें जखडल्या गेल्या नव्हत्या, म्हणजे त्यांचे आचारविचार भिन्न नव्हते, व त्यांच्यांत लग्नाचेहि निर्बंध नव्हते; म्हणजे क्षत्रियांच्या मुली ब्राह्मण करीत असत व ब्राह्मणांच्या मुली क्षत्रिय करीत असत. सोमवंशीय क्षत्रियांपैकीं कित्येक क्षत्रिय आपला क्षत्रियाचा धंदा सोडून ब्राह्मण होत असत, हें महाभारतांतील सोमवंशाच्या हकीकतीवरून स्पष्ट दिसतें. प्रतीपाचा ज्येष्ठ पुत्र देवापि हा क्षत्रियाचा धंदा सोडून वनांत जाऊन तपश्चर्या करूं लागला व त्यानें एक सूक्तहि केलें आहे. कण्व हा मतिनार याच्या वंशांत उत्पन्न होऊन ब्राह्मण झाला व पुढें त्याचे सर्व वंशज ब्राह्मणच झाले.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मण हा त्यावेळीं स्वतंत्र धंदा असावा अशी सामाजिक भावना होती असेंहि दिसतें; म्हणजे ब्राह्मणांनींच यज्ञ यागादिकांच्या क्रिया कराव्या असा ब्राह्मणांचा आग्रह होता. वेदविद्या पठण करण्याचें कठिण काम ब्राह्मणांनीं सुरू केलें होतें. यज्ञयागादिकांस लागणारी निरनिराळी माहिती व मंत्रतंत्र त्यांनीं जतन करूंन ठेवले होते, अर्थात ब्राह्मणांचें काम कठिण झालें असून त्यांनां आपली बौद्धिक शक्ति वाढवावी लागली होती. कोणत्याहि धंद्यास आनुवंशिक संस्कार फार उपयोगी पडतो हें प्रसिद्ध आहे. अर्थात ब्राह्मणांचीं मुलें हींच स्मरणशक्तीनें वेदग्रहण करण्यास योग्य असत. यामुळें साहजिकच ब्राह्मणाचा मुलगा हाच ब्राह्मण व्हावा असा आग्रह उत्पन्न होणें अपरिहार्य आहे. क्षत्रियांनीं ब्राह्मणांचा हा आग्रह प्रथम चालू दिला नाहीं व त्याजविषयीं मोठा तंटा केला ही गोष्ट आपल्यास वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या पौराणिक वादावरून स्पष्ट होतें. कथा खोटी खरी पण ती लिहिण्याचें प्रयोजन वादाचें अस्तित्व दाखविते. या वादाचीं निरनिराळीं स्वरूपें रामायणामध्यें व महाभारतामध्यें दिसतात, पण सर्वांचें तात्पर्य एकच आहे व तें हें कीं, ब्राह्मणाचा मुलगा, ब्राह्मण व्हावा आणि क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय व्हावा हा ब्राह्मणांचा आग्रह आणि विश्वामित्राचा आग्रह असा कीं, क्षत्रियाच्या मुलानें जर आपली बौद्धिक शक्ति वाढविली तर त्याला ब्राह्मण कां होतां येऊं नये? अखेरीस विश्वामित्राचा जय झाला व तो ब्राह्मण झाला इतकेंच नव्हे तर ब्राह्मण कुलाचा तो प्रवर्तक झाला.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते वसिष्ट- विश्वामित्राच्या तंटयांत जातीच्या लग्नविषयक निर्बंधाचें जसें परीक्षण झालें तसें नहुष-अगस्ति या कथेमध्यें जातीच्या दुस-या एका गोष्टीचें परीक्षण झालें. ब्राह्मणाचा धंदा इतरांनीं कां करूं नये या वादाप्रमाणें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, ब्राह्मणांनां इतर जातींचा धंदा करावयास कां लावूं नये? नहुषानें सर्व ॠषींस आपली पालखी उचलावयास सांगितलें व त्यांस जेव्हां त्याची पालखी खांद्यावर घेऊन जलदीं चालतां येईना तेव्हां त्यास तो मोठमोठ्यानें 'सर्प सर्प' म्हणजे चाला चाला असें म्हणूं लागला. तेव्हां अगस्ति ॠषीनें त्यास 'तूं सर्प हो' असा शाप दिला आणि तो सर्प होऊन खालीं पडला (भारत वनपर्व अध्याय १८१,). या कथेंतील तात्पर्य हें कीं जे बौद्धिक धंदा करतील त्यांच्यावर शारिरिक मेहनत करण्याची सक्ति होऊं शकणार नाहीं![१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मणप्रामुख्याचा इतिहास वैदिक कालापासून अत्यंत अर्वाचीन कालापर्यंत सातत्यानें देतां येईल. ब्राह्मणांचें प्रामुख्य रहाण्याचें एक कारण म्हणलें म्हणजे त्यांनीं आपल्या वेदमूलक विद्येचा विकास करूंन प्रथम धर्मशास्त्र आणि नंतर कायदा आपल्या अभ्यासाचा विषय करूंन तो वेदमूलक वाङयाशीं निगडित केला आणि आपली धर्मशास्त्रज्ञता वेदांच्या पायावर उभारली हें होय. ज्या अर्थीं वेदग्रंथ कोणी वाचीत नव्हते आणि वेदार्थयत्न तर करणें दूरच होतें त्याअर्थीं ब्राह्मणांच्या वेदवाङमयमूलक म्हणविणा-या धर्मशास्त्राची तपासणी करून ब्राह्मणांचे अधिकार प्रश्नविषय करणारा वर्ग निघालाच नाहीं. गौतमबुद्धकडून तें काम झालेंच नाहीं व जैनांकडूनहि झालें नाहीं. दोघांचाहि वेदविरोध भीतभीतच होता. आणि वेद तपासण्याची ताकद कोणासहि नव्हती. व या त-हेच्या क्रिया व्हावयाच्या राहिल्यामुळें सर्व ब्राह्मणविरोध अत्यंत दुर्बल होता. ब्राह्मणांची उपयुक्तता शासनसंस्थांस अनेक त-हांनीं होती. राजसत्तेंतहि नियामक असें कांहीं तरी निर्बंध असले पाहिजेत ही भावना लोकांत असल्यामुळें त्या भावनेचा कोणी तरी फायदा घ्यावयास पाहिजे होता तो ब्राह्मणांनीं आपलें नातें धर्मशास्त्राशीं व वेदांशीं कायम ठेवून घेतला. आणि या परिस्थितीचा जो परिणाम उत्पन्न झाला तोच शेवटपर्यंत कायम राहिला. मुसुलमानी राज्यामध्यें ब्राह्मणमहत्त्व कमी न होतां वाढतच गेलें व याची कारणें दोन होतीं: एक तर ब्राह्मणांनीं आचार व प्रायश्चित्त हीं वाढवून आणि म्लेच्छांचें स्थान त्या सोवळ्याओंवळ्याचा नियमावरून शेवटचें ठेवून मुसुलमानी हिंदू समाजाचें पृथकत्व राखलें आणि सर्व समाजांत अशी भावना उत्पन्न झालीं कीं, हिंदू समाजाच्या अभिमानाचें आणि अभिमानमूलक भक्तीचें आश्रयस्थान होणारा राजन्यवर्ग नष्ट झाल्यामुळें ब्राह्मण हेच भक्तीचें आश्रयस्थान झालें व आम्ही हिंदू असून परचक्राच्या त्रासामुळें मुसुलमानांचा हुकूम जरी आम्हांस मानावा लागला तरी आमच्या निष्ठेचे खरे अधिकारी निराळे आहेत अशी भावना हिंदूमध्यें जागृत ठेवावी लागली त्यामुळें ब्राह्मणसन्मान ही एक सामाजिक आवश्यकता उत्पन्न झालीं.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते राजन्यवर्गाच्या नाशास दोन कारणें झालीं. एक कारण हें कीं राज्यक्रांति होई तेव्हां पूर्वीं राजत्व भोगीत नसलेलें दुसरें कूल पदाधिष्ठित होई. तें पूर्वीं क्षत्रिय समजलेल्यांपैकींच नेमकें कसें असणार? तेव्हां राजाला आपलें क्षत्रियत्व ब्राह्मणांकडूनच मान्य करून घ्यावें लागे, तेव्हां तो क्षत्रिय व लोकांच्या निष्ठेला पात्र अशी व्यक्ति होई. तथापि त्याविषयीं शंका घेणारे लोक त्यावेळेस असावयाचेच. विशेषेंकरून जुन्या राजघराण्याचे अभिमानी असावयाचेच. तरी त्यामुळें सर्वच क्षत्रियांचें क्षत्रियत्व येणेंप्रमाणें संशयांतच होतें. ब्राह्मणांचें ब्राह्मण्य मात्र संशयित नव्हतें.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते याशिवाय ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांमध्यें अंतर उत्पन्न करणा-या चळवळी झाल्या, त्या देखील ब्राह्मणांचें महत्त्व इतरांहून अधिक करण्यास कारण झाल्या. असल्या चळवळी म्हणजे बौद्ध व जैन हे संप्रदाय होत. येथील चातुर्वर्ण्य केवळ कर्मानुसारी नव्हतें तर तें संस्कारांकितहि होतें. असें असल्यामुळें जर कोणी बौद्ध-जैनादि मतांस चिकटून संस्कारांकडे दुर्लक्ष केलें तर तो सामान्य लोकांच्या दृष्टीनें संस्कारहीन व्रात्य अगर शूद्र होई. या सर्व गोष्टींचा पगडा अजूनपर्यंत कायम आहे.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते याशिवाय ब्राह्मणांचें राजकीय महत्त्वहि होतेंच. बरेचसे मंत्री ब्राह्मणच असत. व राजांचे शिक्षकहि ब्राह्मणच असत. एवढेंच नव्हे तर कित्येक ठिकाणीं ब्राह्मणांचीं राज्येंहि होतीं. आपण राजतरंगिणीमधील काश्मीरचा इतिहास जर पाहिला तर त्यांत अनेकदां ब्राह्मण राजे झालेले आढळतात. शुंगांचा पाडाव करून राज्य घेणारे काण्वायन ब्राह्मण होते. व सबक्तगीनच्या कारकिर्दींत काबूलवर घाला घालून तेथें हिंदू राज्य स्थापन करणारें शाही घराणें देखील ब्राह्मणच होतें. कुडाळचे सामंत देखील ब्राह्मण असावेत अशी मांडणी करण्यांत आली आहे (कुडाळदेशकर ब्राह्मण पहा- विभाग ११). यानंतरचें उदाहरण म्हणजे पेशव्यांचें होय.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते मुसुलमानी अमदानींत देखील दक्षिणेमध्यें बरींच महत्त्वाचीं स्थानें ब्राह्मणांच्या हातीं होतीं व त्यामुळें त्यांस मोठमोठ्या जहागिरी मिळाल्या आहेत.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते इंग्रजी अंमलामध्यें बंगाल व दक्षिण हिंदुस्थान या दोन भागांत सुशिक्षित वर्ग या नात्यानें ब्राह्मणांचें समाजप्रामुख्य राहिलें आहे.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मणांविरूद्ध चळवळी ज्या झाल्या त्यापैकीं कांहीं धार्मिक प्रामुख्यास आक्षेप घेणा-या व कांहीं राजकीय प्रामुख्यांत स्पर्धा करणा-या होत्या. चळवळींमध्यें बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज अशी परंपरा देतां येईल. पांचालांची चळवळ आपलें ब्राह्मणसदृश महत्त्व मागणारी चळवळ होती व तीमुळें ब्राह्मणमहत्त्वास पोषकच झाली.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते सिलोनमध्यें गोइगणांची जात इतरांपेक्षां आपलें उच्चत्व जेव्हां सांगूं लागली तेव्हां ती आपणांमध्यें ब्राह्मणी रक्त आहे असें विधान करूंन तो हक्क सांगूं लागलीं.[१]
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्रह्मदेश व सयाम हे दोन्ही देश जरी बौद्ध होते तरी त्यांनीं आपल्या संस्कारांसाठीं अनेक ब्राह्मण नेले होते. ब्राह्मणब्राह्मणेतर विवाह हे केव्हां बंद झाले हें निश्चयानें सांगतां येत नाहीं तथापि त्यांचें अस्तित्व ब-याच उत्तर काळापर्यंत दिसून येतें. देशांतरी भटकणारा ब्राह्मण राजकन्येशीं विवाह लावतो अशी कथानकें आपल्या कथासरित्सागरांत बरींच आहेत. ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतर स्त्रियांशीं लग्न लावावें व मुलांनीं ब्राह्मणच म्हणवून घ्यावें अशी परिस्थिति बलिद्वीपांत अजूनहि आहे. विक्रमांकदेवचत्रिचा कर्ता बिल्हण राजकन्येचा शिक्षक म्हणून जातो व तिच्याशीं पुढें लग्न लावतो. प्रसिद्ध राजशेखर कवि आपली आई चौहान आहे म्हणून सांगतो. तथापि ब्राह्मणब्राह्मणेतर यांच्या विवाहास मुख्य अडचणी असत त्या ह्या कीं, बराच क्षत्रिय वर्ग संस्कारदृष्ट्या क्षत्रियत्वापासून च्युत झाल्यामुळें म्हणजे शुद्रत्वाप्रत गेल्यामुळें हे विवाह कमी झाले. मलवारमध्यें तंबिरान (राजघराण्यांतील) स्त्रियांचे ब्राह्मणांबरोबर संबंध उर्फ दुय्यम प्रकारचे विवाह अजून चालू आहेत.[१]
गट आणि पोटजाती
यज्ञजीवी ॠत्विजांचा वर्ग स्थापिला गेल्यानंतर त्या वर्गामध्ये अनेक भेद कसकसे उत्पन्न झाले व पुढें त्यांच्या जाती कशा बनल्या. भारतीय ब्राह्मण समाजाची मुख्यतः दोन गटांत विभागणी केली जाते. सर्वसाधारणपणे त्यांस उत्तरेकडचे ब्राह्मण (पंच गौड ब्राह्मण) आणि दक्षिणेकडचे ब्राह्मण-दक्षिणी ब्राह्मण (पंच द्रविड ब्राह्मण) असे संबोधतात. १२ व्या शतकातील कल्हण कवीच्या राजतरंगिणी ह्या काव्यातील एका श्लोकात ब्राह्मणांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. ते असे:
- कर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः ।
- गुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥
- सारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः ।
- पन्चगौडा इति ख्याता विन्धस्योत्तरवासिनः ॥
- अर्थ : विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण (आंध्र प्रदेश) व (तमिळनाडू+केरळ) या द्राविड प्रदेशांतील-पंचद्रविड राज्यातील ब्राह्मणांना द्रविड ब्राह्मण म्हणावे, तर विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज, गौड, उत्कल आणि मिथिला ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना (पंच गौड) गौड ब्राह्मण म्हणावे. हे ब्राह्मण आजच्या उत्तरप्रदेश, उत्तरांचल, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि उत्तरेकडील दिल्ली, हरियाणा) या राज्यांत विखुरले आहेत.
ब्राह्मणांमधल्या पोटजाती
डॉ. श्री.व्यं केतकरांनी ब्राह्मणांच्या उपजाती ८०० असल्याचे म्हणले आहे. डॉ. गो.स. धुर्ये यांनी १९११या जनगणनेत गुजराथमध्ये ब्राह्मणांच्या ९३ उपजाती असल्याचे नोंदवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांच्या १८८६ उपजाती असल्याचे म्हणले आहे, त्यांपैकी १२१० जातींची नावेही दिली आहेत.
सामाजिक संस्कृती
भारतातील प्रसार
भारतीय संस्कृतीवरील प्रभाव
टीका, प्रतिसाद, प्रबोधन आणि परिवर्तन
हे सुद्धा पहा
- ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था
- भारतीय ब्राह्मणांचे भवितव्य (पुस्तक, लेखक - संजय सोनवणी)
संदर्भ
- ^ a b c d e f g h i j k l m n o दुवा:ब्राह्मण [[महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] Check
|दुवा=
value (सहाय्य) (मराठी भाषा भाषेत). ६ रोजी पाहिले.(पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे)
Unknown parameter|अन्य=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसमहिना=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य);|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
कामचालू