Jump to content

ब्युसाफलस

ब्युसाफलस अलेक्झांडर द ग्रेटचा घोडा होता.

आख्यायिकेनुसार हा घोडा संपूर्ण काळ्या रंगाचा असून त्याच्या कपाळावर पांढरा ठिपका असल्याने तो सुलक्षणी गणला जात असे. तो फिलिपकडे विकावयास आणला असता अचानक उधळला आणि कोणाच्याही ताब्यात येईना. त्यामुळे फिलिपने त्याला विकत घ्यायचा विचार रहित करण्याचे ठरवले.

त्या घोड्याचे वागणे बारकाईने निरखणाऱ्या अवघ्या दहा वर्षांच्या अलेक्झांडरने तो घोडा आपण काबूत करू असा विश्वास आपल्या वडिलांना दिला आणि थोड्यावेळातच त्या घोड्याला काबूत आणले. उन्हात उभा असलेला हा घोडा आपली सावली पाहून बिथरत असल्याचे अलेक्झांडरच्या लक्षात आल्याने त्याने ब्युसाफलसला सावलीत नेऊन शांत केल्याचे सांगितले जाते. त्याच्या या धाडसावर खूश होऊन फिलिपने त्याला हा घोडा भेट दिला. "पुत्रा, तुझ्या पराक्रमाला साजेसे राज्य तुला शोधावे लागेल, कारण माझे मॅसेडोनिया तुझ्यासाठी फार लहान आहे." हे ग्रीक इतिहासातील प्रसिद्ध वाक्य फिलिपने या ठिकाणी उद्धृत केल्याचे प्लूटार्कच्या इतिहासाप्रमाणे सांगितले जाते.


पुढे अनेक लढायांत अलेक्झांडरने या घोड्यावरूनच स्वारी केली.

पुरू राजाशी झालेल्या भारतातील लढाईत हा घोडा जबर जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ झेलम नदीच्या काठावर अलेक्झांडरने ब्युसाफलस नावाचे शहर उभारल्याचे सांगितले जाते.