बॉलरूम नृत्य
पाश्चिमात्य सामाजिक नृत्यांना, विशेषतः दालनातील स्त्रीपुरुषांच्या युग्मनृत्यांना अनुलक्षून बॉलरूम नृत्य ही संज्ञा वापरली जाते. ‘बॉल’ ह्या शब्दाचा अर्थ नृत्य वा विशिष्ट सामाजिक प्रसंगी नृत्याच्या निमित्ताने एकत्र जमलेला जनसमुदाय, असा सामान्यपणे होतो. मेजवानीसारख्या प्रसंगी अगर सामाजिक समारंभाच्या वेळी भव्य दिवाणखान्यात केले जाणारे नृत्य ते ‘बॉलरूम’ नृत्य अशी संज्ञा त्यावरून रूढ झाली.
बॉलरूम नृत्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी यूरोपीय अनागर लोकजीवनात (पेगन समाजात) आढळते. त्यातील स्त्रीपुरुषांनी एकत्र येऊन स्वैरपणे व विमुक्तपणे खुल्या मैदानात केलेल्या नृत्यांत ह्याचे बीज आढळते. तदनंतर विवाहप्रसंगी, तसेच अन्य धार्मिक समारंभांतूनही हे नृत्य केले जात असे. सोळाव्या शतकातील प्रबोधनामुळे धर्मबंधने शिथिल बनली, त्यामुळे ह्या नृत्याचे धार्मिक स्वरूप गौण ठरून त्यास सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. ह्या कालखंडात हे नृत्य राजदरबारामध्ये प्रविष्ट झाले आणि अमीर-उमरावांच्या मान्यवर प्रतिष्ठित समाजात सामाजिक प्रतिष्ठेचा एक मानदंड म्हणून रूढ झाले. उच्चभ्रू समाजात ह्या नृत्याचा समावेश एक सामाजिक अपरिहार्य बाब म्हणून झाला. विवाहयोग्य तरुणतरुणींना एकत्र आणणे, त्यांच्यामध्ये आत्मगौरवाची भावना निर्माण करणे, त्यांना स्वतंत्र सामाजिक स्थान मिळवून देणे इ. उद्देशांमुळे हे नृत्य सुसंस्कृत समाजाचे एक महत्त्वाचे अंग बनले, त्यानंतर अठराव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीने बॉलरूम नृत्याचे केवळ राजदरबारी स्वरूप व अमीर-उमरावादी उच्चभ्रू समाजातील स्थान पालटले व ते बहुजनसमाजापर्यंत जाऊन पोहोचले.
बॉलरूम नृत्याचे ग्रेट ब्रिटन हे माहेरघर मानले जाते. १८१७ पर्यंत इंग्लिश बॉलरूम नृत्याचे स्वरूप हे ग्रामजीवनातील विविध लोकनृत्यांची एक सुधारित आवृत्ती एवढ्यापुरतेच मर्यादित होते. तथापि नंतरच्या आधुनिक काळात त्यात नानाविध प्रवाह येऊन मिसळले. ‘लेण्ड्लर’ या जर्मन लोकनृत्यापासून ⇨वॉल्ट्स हा नृत्यप्रकार आला. त्या वॉल्ट्सची जोड इंग्लिश बॉलरूम नृत्याला मिळाली. ह्याच सुमारास बॉलरूम नृत्यास युग्मनृत्याचे (कपल डान्स) स्वरूप येऊ लागले. पुढील पंचवीस-तीस वर्षांच्या कालावधीत बॉलरूम नृत्यांत ⇨पोल्क हे बोहीमियन नृत्य अंतर्भूत झाले. तद्वतच स्कॉटलंडमधील ‘रील्स’ हा लोकप्रिय नृत्यप्रकारही त्यात सामावला गेला. वेलेटा, लान्सर हे नृत्यप्रकारही बॉलरूम नृत्यांत केले जात. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ही परिस्थिती बदलली. रॅग्टाईमसारख्या अमेरिकन नृत्याचा त्यावर प्रभाव पडला आणि बॉलरूम नृत्यांचे पारंपरिक, चाकोरीबद्ध स्वरूप पालटले. आता त्यातील पूर्वीची नियमबद्धता कमी होऊन, नृत्य करणाऱ्या युग्माला अधिक प्रसन्न व प्रफुल्लित वाटेल असे स्वरूप त्यास प्राप्त झाले. मोठमोठी उपाहारगृहे, विश्रामगृहे इ. सार्वजनिक स्थळी बॉलरूम नृत्याचा प्रसार वाढला. जसजसे ते उच्चभ्रू समाजाकडून सर्वसामान्यांकडे येऊ लागले, तसतसे त्याचे स्वरूप जास्त रंजक व आकर्षक करण्याकडे कल वाढला. १९२४ मध्ये सर्व बॉलरूम नृत्यतज्ञांची ‘इंपीरियल सोसयटी’ ही संस्था स्थापन झाली. वॉल्ट्स, फॉक्सट्रॉट, क्विक्स्टेप, ⇨टँगो नृत्य इ. नृत्यप्रकारांकरिता सुयोग्य संगीत तयार करण्यात आले. तसेच ठराविक अभ्यासक्रम तयार करण्यात आला व नृत्याच्या परिक्षा घेण्यात येऊन प्रमाणपत्रे देण्यात येऊ लागली.
मोठ्या प्रमाणात बॉलरूम नृत्यस्पर्धाही आयोजित करण्यात येऊ लागल्या, तेव्हापासून ते आजतागायत यूरोपमध्ये या स्पर्धा हौशी व व्यावसायिक स्वरूपामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जातात. १९२२ साली व्हिक्टर सिल्व्हेस्टर हा नर्तक व त्याची जोडीदार नर्तकी फिलिस क्लार्क हे या स्पर्धेतील जागतिक विजेते ठरले. त्याचे संगीतदिग्दर्शन असलेल्या वाद्यवृंदरचना रेडिओ व दूरदर्शनवर अत्यंत लोकप्रिय ठरल्या. १९४१ मध्ये दक्षिण आफ्रिकेतही इंग्लिश बॉलरूम नृत्य लोकप्रिय झाले. १९५६ च्या सुमारास ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथे ह्या बॉलरूम नृत्याचा प्रसार झाला. १९३५ पासून जपान व जर्मनी ह्या देशांत हे नृत्य लोकप्रिय होऊ लागले तर अमेरिका व रशिया या देशांतही १९६५ पासून इंग्लिश बॉलरूम नृत्यास लोकमान्यता मिळाली. अशा प्रकारे बॉलरूम नृत्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वत्र पसरत गेली. आंतरराष्ट्रीय वॉल्ट्स स्पर्धा व तदानुषंगिक समारंभ व्हिएन्नाच्या हॅप्सबर्ग ह्या राजवाड्यात अद्यापही भव्य प्रमाणात साजरा केला जातो. १९७५ मध्ये कारमेन मिरान्दा ह्या गोमांतकीय युवतीस व्हिएन्नीज वॉल्ट्स या प्रकारात ‘फर्स्ट लेडी’ म्हणून ह्या समारंभाचे नृत्यद्वारा उद्घाटन करण्याचा सन्मान मिळाला. हा बहुमान मिळवणारी ही पहिलीच भारतीय युवती होय. आधुनिक बॉलरूम नृत्यांत पुढील नृत्यप्रकारांचा समावेश होतो : फॉक्सट्रॉट, वॉल्ट्स, टँगो, कोंगा, रम्बा, सम्बा, ट्विस्ट, पासे डबल, क्विक्स्टेप इत्यादी. पूर्व यूरोपमध्ये पोल्क, ⇨मझुर्क व झारडस हे लोकनृत्यप्रकार बॉलरूम सभागृहांतही सादर केले जातात.
त्यांपैकी काही प्रमुख प्रकारांची पुढे थोडक्यात माहिती दिली आहे :
- फॉक्सट्रॉट : अमेरिकेत उदयास आलेला हा नृत्यप्रकार मोठा आनंददायी असून तो भव्य सभागृहातून सादर केला जातो. इंग्लंडमध्येही तो लोकप्रिय आहे. ताल ४/४, एका आवर्तनात ४ ठेके. गती संथ-संथ, जलद-जलद (संथमध्ये २ ठेके).
- वॉल्ट्स : अभिजाततावादी व स्वच्छंदतावादी बॅलेंमध्ये केला जाणारा सहा मात्रांचा मूलभूत नृत्यप्रकार. ह्याचे दोन भाग असतात. एक म्हणजे व्हिएन्नामध्ये केला जाणारा लोकप्रिय जलद नृत्यप्रकार. ह्यात सर्व नाचणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या जोड्या एकाच दिशेने फिरत नृत्य करतात. दुसरा म्हणजे ‘बॉस्टन’ हा संथ नृत्यप्रकार. हा अमेरिकेतून आलेला असून ह्यात स्त्रीपुरुषांच्या जोड्या विविध दिशांनी गोलाकारफिरत फिरत नृत्य करतात. वॉल्ट्समध्ये एकदा ताल आत्मसात केल्यावर तो फॉक्सट्रॉटपेक्षा नाचण्यास सुलभ आहे.
- टँगो : प्रसन्न व उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्याचे सामर्थ्य ह्या नृत्यप्रकारात आहे. ह्याला स्पॅनिश ‘फ्लॅमेंको’ असेही म्हणतात. या नृत्यामध्ये नर्तक नृत्यभूमीवर विविध आकृतिबंध निर्माण करतात. हा नृत्यप्रकार शिकण्यास कठीण समजला जातो. ताल ४/४, एका आवर्तनात चार ठेके, संथ-संथ, जलद-जलद. संथला एक मात्रा तर जलदला अर्धी मात्रा.
- कोंगा : आफ्रो-क्यूबन उगम असलेले नृत्य. त्यातील तालमापन ४/४ असे असते. हा प्रकार एकतर स्त्रीपुरुषांच्या जोड्यांनी करतात किंवा स्त्रीपुरुष एकाआड एक असे, एका ओळीत (कोंगा लाईन) एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून, उभे राहून नृत्य करतात.
- सम्बा : हा ब्राझीलमध्ये उगम पावलेला एक नृत्यप्रकार असून, त्यातील तालमापन ४/४ असे असते. प्रतिष्ठित व सुघटित अशी बॉलरूम नृत्ये व अनघड, असांकेतिक आणि उग्र अशी सामाजिक ‘जिटरबग’ नृत्ये ह्या प्रकारांना सांधणारा हा दुवा आहे.
- ट्विस्ट : साधारण १९६० च्या दशकात उगम पावलेला एक सामाजिक नृत्यप्रकार. ह्यामध्ये जोडीदार परस्परांना स्पर्श न करता खटकेबाज, जोशपूर्ण पण तालबद्ध असे नृत्य करतात. तेरा ते वीस या वयोगटातील युवक-युवतींमध्ये हे नृत्य फार लोकप्रिय ठरले. हे एकट्यानेसुद्धा करता येते. ह्या प्रकारात पाय, नितंब व खांदे या अवयवांच्या लचकण्या-मुरडण्याच्या झटकेबाज हालचाली असतात.
- पोल्क : हे मुळात एक बोहीमियन लोकनृत्य असून, पुढे त्याचे रूपांतर बॉलरूम नृत्यामध्ये झाले. १८३० च्या दशकात त्याचा उगम झाला व गेले शतकभर ते पूर्व आणि मध्य यूरोपमध्ये प्रचलित आहे. स्त्रीपुरुष एकमेकांना हातांत हात गुंफून वर्तुळाकार फिरत जलद लयीत हे नृत्य करतात. त्याचे तालमापन २/४ असे आहे.
संदर्भ
- ^ "https://vishwakosh.marathi.gov.in/29371/". External link in
|title=
(सहाय्य)