Jump to content

बॉम्बे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट (The Bombay Scheduled Castes Improvement Trust) ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जुलै १९४४ रोजी मुंबई येथे स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती.[] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन केलेल्या अनेक संस्थांपैकी द बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ही एक संस्था होती. पण त्यापूर्वी दलितांच्या सर्वागीण विकासासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली. त्यासाठी पुरुषांकडून दोन तर महिलांकडून एक रुपया वर्गणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दलित समाजातील लोकांनी बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने या योजनेतून तब्बल ४५,०९५ रुपयांचा निधी जमा झाला. या निधीतून बाबासाहेबांनी १० ऑक्टोबर १९४४ रोजी दादर-नायगाव विभागात गोकुळदास पास्ता रोडवर २,३३२ चौरस यार्डाचा भूखंड ३६ हजार ५३५ रुपये खर्चून विकत घेतला व उरलेल्या निधीतून दी बॉंबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट बनविला. याच निधीतून या प्लॉटवर छोटे तात्पुरते साईट ऑफिस बांधण्यात आले.[] पुढे ही इमारतच बाबासाहेबांच्या सर्व चळवळींचे केंद्रस्थान बनली. बाबासाहेबांचा खासगी प्रिंटिंग प्रेस नायगाव येथे होता. जातीय दंगलीत या प्रेसचे नुकसान झाल्यामुळे बाबासाहेबांना ही प्रेस त्यांच्या नायगाव येथील साइट ऑफिसमध्ये हलवावी लागली. मात्र या वास्तूत प्रेस आणताच बाबासाहेबांनी जागेच्या भाड्यापोटी ट्रस्टमध्ये महिना ५० रुपये जमा करण्यास सुरुवात केली.[]

बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर यांना उत्पन्नाचे साधन नव्हते. म्हणून त्यांच्याकडे प्रेसच्या व्यवस्थापकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण यशवंतरावांनी बाबासाहेबांना न विचारताच या प्लॉटची जागा काही दुकानासाठी देऊन टाकली. त्यामुळे बाबासाहेबांना हा प्लॉट सोडविण्यासाठी कोर्टात जावे लागले. मात्र न्यायालयीन प्रकरणे १९७५ पर्यंत चालली. त्यानंतर ट्रस्टने बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार दलितांच्या सर्वागीण विकासासाठी समाजकेंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण अनेक अडचणींमुळे ते शक्य झाले नव्हते. दरम्यानच्या काळात मुंबई महापालिकने या प्लॉटवर माध्यमिक शाळेचे आरक्षण टाकले. ट्रस्टने माध्यमिक शाळेचा तीन मजली प्लान महापालिकेला सादर करून त्याला मंजूरी घेतली. आरक्षणामुळे या शाळेच्या प्लानमध्ये तळमजल्यावर पार्किंगची तरतूद केली होती. हे पार्किंग म्हणजे शाळेच्या मागच्या भागाला ज्याला 'आंबेडकर भवन' म्हणून संबोधले गेले. पार्किंग एरियात प्रकाश, आनंदराज आणि भीमराव या आंबेडकर बंधूंनी आपली कार्यालये निर्माण केली.[]

सध्याच्या ट्रस्टने या जागेवरील शाळेचे आरक्षण बदलून पब्लिक हॉल व संस्थात्मक उपयोग असे नवे आरक्षण बदल डिसेंबर २०१५ मध्ये करून घेतले व भव्य १७ मजली इमारतीचा आराखडा तयार केला. यात बाबासाहेबांचे भव्य म्युझियम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय-इतिहास दालन, सुसज्ज व भव्य ग्रंथालय, कायदा साहाय्य केंद्र, अन्याय अत्याचार निवारण व समाजकल्याण केंद्र, कला दालन, विपश्यना हॉल व बुद्ध धम्म साहित्य कक्ष, महिलांचे सबलीकरण व युवकांना कौशल्य प्रशिक्षण आदी सोयी-सुविधा या केंद्रात निर्माण करण्यात येणार होत्या. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो युवक, युवती, विद्यार्थी व दलित चळवळीला योग्य दिशा प्राप्त होणार होती.[]

रत्नाकर गायकवाड यांच्या मतानुसार, जे "आंबेडकर भवन" (पार्किंग एरिया) पाडण्यात आले, त्याचे बांधकाम १९७५ नंतर करण्यात आले. तसेच प्रिंटिंग प्रेस बंद होऊन ५० वर्षांचा कालावधी लोटला आहे.[]

रत्नाकर गायकवाड यांच्या मतानुसार, "या ट्रस्टच्या घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ट्रस्टच्या विश्वस्तपदावर त्यांच्या कुटुंबातील सदस्य न घेण्याचे धोरण अवलंबिले होते. तेच बाबासाहेबांचे धोरण विश्वस्तांनी गेल्या ६० वर्षांत चालू ठेवले आहे. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांनी आपल्या मुलाला म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांना २३ फेब्रुवारी १९५६ रोजी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसच्या उत्पन्नाच्या संदर्भात लिहिलेल्या पत्रात म्हणले आहे की, ही प्रेस सार्वजनिक मालमत्ता असून ती तुझी किंवा माझी मालमत्ता नाही. ... या मोडकळीस आलेल्या इमारतीस पाडण्याची रीतसर नोटीस मुंबई महापालिकने १ जून १९५६ रोजी ट्रस्टला दिली. हे बांधकाम रात्री पाडावे लागले."[]

पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अंतर्गत मुंबईतील दादरमध्ये आंबेडकर भवन बांधले गेले होते. आंबेडकर भवन ही इमारत जीर्ण झालेल्या स्थितीत दिसून आल्यानंतर तेथे नवीन १७ मजली आंबेडकर इमारत बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव दिला गेला होता. पुनर्बांधणीचा प्रस्ताव ठेवल्यानंतरच विश्वस्त आणि बाबासाहेबांच्या नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यानंतर एकदा रात्रीत आंबेडकर भवन पाडण्यात आले. ज्यामुळे हा वाद आणखी वाढला. डॉ. आंबेडकर यांचे तीन नातवंडे भीमराव, प्रकाश आणि आनंदराज पुनर्निर्माण प्रस्तावाला विरोध केला आहे. - ते म्हणतात की बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचे पुनर्बांधणीच्या बहाण्याने नुकसान केले गेले. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे या ट्रस्टचे सल्लागार होते. आंबेडकर भवन पाडल्यामुळे त्यांना आंबेडकरी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले.[]

संदर्भ

  1. ^ लोखंडे, डॉ. भाऊ (१३ एप्रिल २०१२). डॉ. आंबेडकरी प्रणाली आणि आपण. कोल्हापूर: परिजात प्रकाशन. pp. २४९-२५४.
  2. ^ "बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठीच." दैनिक लोकसत्ता. २८ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ a b c d e Ghadyalpatil, Abhiram (25 July 2016). "Do the Ambedkar monuments in Mumbai do justice to the man?". mint.
  4. ^ "महाराष्ट्र के मुख्य सूचना आयुक्त रत्नाकर गायकवाड़ पर औरंगाबाद में हमला". आज तक.