बेगमपेठ (सोलापूर)
सोलापूरची बेगम पेठ ही एक फार जुनी ऐतिहासक व्यापारी पेठ आहे. १६९५ ते १६९९ या काळात औरंगजेब बादशहाची फौज सोलापूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी येथे वास्तव्याला असायची. औरंगजेबाची चौथी पत्नी बेगम उदयपुरी ही मुक्कामाला असायची. पुढे अठराव्या शतकात या भागाचे बेगमपुरा हे नाव पुढे बेगम पेठ असे झाले. सुरुवातीला स्वकुळसाळी आणि मुस्लिम समाजाचे वास्तव्य असलेल्या या पेठेत आता ९५ टक्के मुस्लिम समाज आहे. पूर्वी या पेठेत स्वकुळसाळी समाजाचा हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचा. मुस्लिम समाजही छोटा-मोठा व्यवसाय करून आपली उपजीविका करायचे, कातडीचा व्यापार चालायचा, एकत्रित केलेला हा माल मद्रासला पाठवला जायचा.
साड्या, ड्रेस मटेरियल, कटपीस हा कपड्याचा व्यापार या पेठेत मोठ्या प्रमाणात चालतो. खांडवा, मध्यप्रदेश, गुजरातच्या अनेक व्यापाऱ्यांनी इथे दुकाने थाटली आहेत. दाट वस्ती असलेल्या पेठेत ५१२ घरे आहेत. ख्रिस्ती समाजाचे सेवा मंदिरही येथेच आहे. अगदी अलीकडेच सुसज्ज असे यशोधरा हॉस्पिटल ही या भागात आहे.
दुचाकीपासून चार चाकी वाहनांची कुलपे दुरुस्त केली जाणारे अखलाख तोहित टंकसाळ याचे दुकान बेगम पेठेत आहे. सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर उस्मानाबाद, लातूर, विजापूर जिल्ह्यातील वाहनधारक येथे आजही विश्वासाने येतात. वडील तोहित रहिमान टंकसाळ यांनी १९७५ च्या काळात सुरू केलेला हा व्यवसाय आजही अखलाक प्रामाणिकपणे सांभाळत आहेत.
कामगार कष्टकरी समाज असलेल्या या छोट्याशा बेगम पेठेत लहान वर्गापासून ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी टिकल इंग्लिश स्कूल, फातिमा नर्सरी येथे आहेत.
बेगम पेठेतच बालपण पार पडलेले युनूस खरादी सध्या मिरज येथे न्यायाधीश आहेत. उस्मान आणि मुदस्सर खरादी हे दोन डॉक्टरही याच पेठेतून घडले. पेठेतील शांतता आणि एकोबा राहण्यासाठी सलीम कल्याणी, सलीम हिरोळी, रियाज खरादी, मैउद्दीन शेख, तानाजी गवळी, मनोज अलकुंटे शोभा शिंदे, प्रदीप बंडे, जुबेर कुरेशी ही मंडळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अश्या या छोट्या पेठेने आपला बाज जपला आहे.
संदर्भ
१. सबकुछ सोलापूर, लोकमत सोलापूर, पृ. क्र. १२२.