Jump to content

बेंथॅम, जेरेमी

इंग्लंडमधील उपयुक्ततावादी नैतिक पंथाचा संस्थापक असे बेंथॅम यांना मानता येईल. हाउंडस्‌डिच, लंडन येथे जन्म. ऑक्सफर्ड येथील क्वीन्स महाविद्यालयातून वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी पदवी घेतली.एकोणीस वर्षांचे असताना ‘लिंकन्स इन’ मधून ते बॅरिस्टर झाले. आपला वकिलीचा वडिलार्जित व्यवसाय त्यांनी कधी केला नाही पण इंग्लिश कायद्यांची जी संहिता होती तिला सुव्यवस्थित रूप देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. हे कायदे इतिहासात हळूहळू घडत आणि बदलत आले होते आणि म्हणून त्यांच्यात अनेक कालबाह्य गोष्टी टिकून राहिल्या होत्या आणि संदिग्धता, विसंगती, निष्कारण गुंतागुंत इ. दोष मोठ्या प्रमाणावर होते. ह्या संहितेच्या जागी एक सुस्पष्ट, सुसंगत, सरळ आणि मानवतावादी प्रेरणा आणि उद्दिष्टे यांच्यावर आधारलेल्या कायद्यांच्या संहितेची स्थापना करण्याच्या कार्याला बेंथॅम यांनी वाहून घेतले. हे त्यांचे प्रमुख जीवितकार्य होते. पण त्याच्या अनुषंगाने आणि त्याचे साधक म्हणून त्यांनी नैतिक आणि राजकीय तत्त्वज्ञान आणि ज्ञानमीमांसा या क्षेत्रांतही महत्त्वाचे कार्य केले आहे. लंडन येथे ते निधन पावले.

लेखनाच्या बाबतीत बेंथॅम बहुप्रसव होते, परंतु आपले बरेचसे लिखाण त्यांनी अर्धवट सोडले आहे आणि पूर्ण केलेले काही ग्रंथही प्रसिद्ध करण्याची तसदी त्यांनी घेतलेली नाही. त्यांचे काही लिखाण एत्थेन द्यूमॉं (१७५९-१८२९) ह्या त्यांच्या एका स्विस अनुयायाने केलेल्या फ्रेंच भाषांतराच्या स्वरूपात प्रथम प्रसिद्ध झाले.

ॲन इन्ट्रोडक्शन टू द प्रिन्सिपल्स ऑफ मॉरल्स अँड लेजिस्लेशन (म. शी. ‘नीती आणि कायदे यांच्या तत्त्वांची ओळख’) हा त्यांचा ग्रंथ त्यांनी स्वतः १७८९ साली प्रसिद्ध केला. ह्यापूर्वी शिक्षा देण्याच्या तात्त्विक अधिष्ठानाचे सोपपत्तिक विवेचन करणारा एक प्रबंध त्यांनी लिहिला होता पण ३५ वर्षांनी द्यूमॉं यांनी त्याचे, बेंथॅम यांच्या इतर काही लिखाणाची त्याच्यात भर घालून, जे फ्रेंच भाषांतर प्रसिद्ध केले तेव्हा तो प्रथम जगापुढे आला. तसेच ⇨ विल्यम ब्लॅकस्टोन (१७२३-८०) ह्या प्रसिद्ध कायदेशास्त्रज्ञाने इंग्लिश कायद्यांवर भाष्यकरणारा जो ग्रंथ लिहिला आहे (कॉमेंटरीज ऑन द लॉज ऑफ इंग्लंड – १७६५-६९) त्याच्यावरही बेंथॅम यांनी विस्तृत भाष्य लिहिले होते.

ते जवळजवळ दीडशे वर्षानंतर १९२८ मध्ये प्रसिद्ध झाले. पण त्यातील एक भाग अ फ्रॅग्मेंट ऑन गव्हर्नमेंट (‘सरकारविषयी खंड’) ह्या नावाने १७७६ मध्ये प्रसिद्ध झाला. ह्याशिवाय ब्रिटिश कायदेव्यवस्थेच्या अनेक अंगांवर आणि विशेषांवर त्यांनी बरेच स्फुट लिखाण केले आहे. त्यांची इतर तात्त्विक पुस्तके म्हणजे : अ बुक ऑफ फॅलसीज (१८२४ – ‘तर्काभास संग्रह’), रॅशनेली ऑफ ज्युडिशिअल एव्हिडन्स (१८२७ – [[‘न्यायालयीन पुराव्याची तात्त्विक उपपत्ती]’), डीऑन्टॉलॉजी (१८३४ – ‘दंडकशास्त्र’ मरणोत्तर) ही होत. ही पुस्तके त्यांनी केलेल्या कच्च्या लिखाणाचे इतरांनी संपादन करून प्रसिद्ध केली आहे. कॉन्स्टिट्यूशनल कोड (प्रथम खंड १८३० – ‘राज्यघटना – संहिता’) ह्या आपल्या ग्रंथाकडे ⇨ कॅथरिन द ग्रेट ह्या रशियन राणीचे तसेच युरोपमधील इतर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून राज्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्नही बेंथॅम यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात केला.

बेंथॅम यांचा प्रभाव रशिया, फ्रान्स इ. यूरोपीदेश तसेच नव्याने उदयाला आलेली अमेरिका यांच्यावर काही प्रमाणात पडला होता यात शंका नाही. पण त्यांचा खराखुरा व टिकाऊ प्रभाव इंग्लंडमध्येच दिसून येतो. जेम्स मिल, जॉन स्ट्यूअर्ट मिल हे पितापुत्र आणि जॉन ऑस्टिन हे न्यायशास्त्रवेत्ते बेंथॅम यांच्या प्रमुख अनुयायांपैकी काही होत. बेंथॅम यांचे अनुयायी ‘तात्त्विक जहालमतवादी’ (‘फिलॉसॉफिकल रॅडिकल्स’) म्हणून ओळखण्यात येऊ लागले. वेस्टमिन्स्टर रिव्ह्यू हे नियतकालिक तात्त्विक जहालमतवादी आंदोलनाचे मुखपत्र म्हणून सुरू करण्यात आले. लंडन येथील ‘युनिव्हर्सिटी महाविद्यालय ’ची स्थापना करण्याचे श्रेयही ह्याच आंदोलनाचे आहे. ब्रिटिश समाजव्यवस्थेचे आणि मनोवृत्तीचे ‘आधुनिकीकरण’ करण्यात ह्या आंदोनलनाने मोठीच कामगिरी बजावली. ‘फेबिअन समाजवाद’ हे ह्या आंदोलनाचेच एक अपत्य आहे, असे म्हणता येईल.


बथेंम ग्रंथसंपदा 1) Fragments of government

2) defence of Usury

3) introduction to principles of morals and legislation

4) Easy on politics tactics

5) A Treatise on judicial evidence

6) Emancipate your Colony

7) theory of punishment and rewards

8) manual of political economy

9) principle of international

10) Anarchical Fallacies

11) radicalism not dangerous

12) Chrestomathia

13) aur treasury of judicial

14) papers upon codification and public instruction