Jump to content

बॅरी कॉमनर

बॅरी कॉमनर(जन्म: २८ मे १९१७ व मृत्यू: ३० सप्टेंबर २०१२) हे प्रसिद्ध अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आधुनिक पर्यावरणीय चळवळींच्या संस्थापकांपैकी एक आहेत. शिक्षक आणि कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिकांतून सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगत त्यांनी पर्यावरण शास्त्र माणसापर्यंत नेले.

जन्म व शिक्षण

रशियामधून स्थलांतरित झालेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात ब्रुकलिन,न्यू यॉर्क येथे कॉमनर यांचा २८ मे १९१७ साली जन्म झाला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदवी तर हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व पीएचडी प्राप्त केली.[] त्यानंतर जीवशास्त्रात प्राध्यापक, नौदलात लेफ्टनंट, सायन्स इलस्ट्रेटेडचे सहयोगी-संपादक अशी त्यांची कारकीर्द सुरू झाली.

कार्य

सेंट लुईस येथे वॉशिंग्टन विद्यापीठात ‘प्लांट फ़िजिओलॉजी’चे प्राध्यापक म्हणून त्यांनी ३४ वर्षे अध्यापन केले. १९६६ मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर बायोलॉजी ऑफ नॅचरल सिस्टम्स’ या संस्थेची स्थापना केली. विषाणू, पेशीचे चयापचय आणि जिवंत उतींवरील किरणोत्साराचा प्रभाव अशा विषयांवर त्यांनी संशोधन केले. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. १९६० च्या दशकातील विज्ञान माहिती चळवळ आणि ७०व्या दशकातील ऊर्जाविषयक चर्चांमध्ये त्यांचा सहभाग होता. अणुस्फोट चाचण्या, रासायनिक व औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरणीय ऱ्हास यांच्या विरोधातील जाहीर मोहिमांत ते सहभागी होते. १९८१मध्ये कॉमनर यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनच्या सामुदायिक आरोग्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. कॉमनर यांनी अनेक वैज्ञानिक शोधनिबंध आणि पुस्तके लिहिली.

बॅरी कॉमनर यांचे पर्यावरणाचे चार नियम

  • ‘निसर्गात सर्व काही इतर सर्व गोष्टींशी जोडलेले आहे’- सर्व पर्यावरणीय यंत्रणा एकमेकांशी जोडलेल्या व संतुलित आहेत, जर एखाद्या नैसर्गिक परिसंस्थेचा काही भाग खराब झाला अथवा त्यावर ताण आला तर तो व्यापक समस्या निर्माण करू शकतो.
  • ‘प्रत्येक गोष्ट कुठेतरी जाणं क्रमप्राप्त आहे’- निसर्गात ‘कचरा’ नसतो आणि तो फेकून देता येईल अशी जागाही नसते. पदार्थाच्या अविनाशित्वाच्या भौतिकशास्त्रातील मूळ नियामाचेच हे एक अनौपचारिक रूप आहे.
  • ‘निसर्गाकडे सर्वोत्तम ज्ञान आहे’- मानवाने निसर्गात सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले पण नैसर्गिक प्रणालीत बदल करणे त्या प्रणालीसाठी हानिकारक असू शकते. त्याचा दुष्परिणाम शेवटी सर्वांवरच होतो.
  • ‘फुकट काहीही मिळत नाही’- आधीचे तीनही नियम या नियमात अंतर्भूत आहेत.मानवी प्रयत्नांनी निसर्गातून काही काढून घेतले तर त्याची परतफेड करायला हवी. ही किंमत टाळता येणार नाही. विलंब झाला तरी ती चुकवावी लागेल.[]

मृत्यू

बॅरी कॉमनर यांचा मृत्यू ३० सप्टेंबर २०१२ साली वयाच्या ९५व्या वर्षी झाला.[]

बॅरी कॉमनर यांना प्राप्त पुरस्कार

पर्यावरणसंबंधीच्या कार्यासाठी अमेरिकन असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सने त्यांना न्युकोंब क्लिवलॅंड पुरस्कार दिला.[] २०१५ मध्ये क्वीन्स कॉलेजमधील ‘सेंटर फॉर बायोलॉजी ऑफ नॅचरल सिस्टम्स’चे नाव ‘बॅरी कॉमनर सेंटर फॉर हेल्थ अँड एन्व्हायर्नमेंट’ असे ठेवण्यात आले.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Barry Commoner". c250.columbia.edu. 2020-03-22 रोजी पाहिले.
  2. ^ Egan, Michael (2009-01-23). Barry Commoner and the Science of Survival: The Remaking of American Environmentalism (इंग्रजी भाषेत). MIT Press. ISBN 978-0-262-26265-1.
  3. ^ Lewis, Daniel (2012-10-01). "Scientist, Candidate and Planet Earth's Lifeguard". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2020-03-22 रोजी पाहिले.
  4. ^ "St. Louis Walk of Fame - Inductees". web.archive.org. 2018-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-22 रोजी पाहिले.
  5. ^ "Barry Commoner Center". commonercenter.org. 2020-03-22 रोजी पाहिले.