Jump to content

बुद्ध पौर्णिमा

बुद्ध जयंती
बुद्ध जन्मकथेत वर्णन केल्याप्रमाणे बालक गौतम बुद्धांचा पुतळा
अधिकृत नाव बुद्ध जयंती
Fódàn (佛誕)
Phật Đản
Chopa-il (초파일, 初八日)
বুদ্ধ পূর্ণিমা
वैशाख
इतर नावे बुद्ध जयंती
बुद्ध पौर्णिमा
वैशाखी पौर्णिमा
साजरा करणारे जगभरातील बौद्ध अनुयायी व काही हिंदू अनुयायी
प्रकार बौद्ध, संस्कृतिक
महत्त्व गौतम बुद्धांचा जन्मदिवस साजरा करणे
दिनांक
  • ८ एप्रिल (जपान)
  • मेचा दुसरा रविवार (तैवान)
  • वैशाखी पौर्णिमा (भारत)
वारंवारता वार्षिक
यांच्याशी निगडीतवेसक

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे.[] हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.[] या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.[] आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते.[] बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.[] यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.[] भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[][]

स्वरूप

बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात.[] बिहारमधील बोधगया हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना बोधगया येथील एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.[] बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी बौद्धांसह आजूबाजूच्या परिसरातील अन्य लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात व येथील बुद्ध विहारात आस्थापूर्वक पूजा करतात. या विहाराचे महत्त्व गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांबीची मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हा विहार तयार केला आहे.[] विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले.

बुद्ध जयंतीच्या दिवशी बौद्ध अनुयायी घरांमध्ये दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहारातील तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.[१०]

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.[] या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.[] या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीलंका तसेच अन्य आग्नेय आशियायी देशात हा दिवस 'वेसक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.[११]

  • या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.
  • बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
  • बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते. आणि दिवा लावून पूजा केली जाते.
  • बोधिवृक्षाची पूजा केली जाते.
  • त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.
  • या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.
  • पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करून खुल्या आकाशात सोडले जाते.
  • गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
  • बौद्ध अनुयायींना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात.

भारतातील बुद्ध जयंतीचा इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.[१२]

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.[१२]

'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[१२]

बुद्ध जयंतीचे महत्त्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.[१३]

आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.[१४] दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.[]

हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, हे स्पष्ट करणारी काहीएक कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे. (म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता.)

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Registrar, India Office of the (1962). Census of India, 1961 (इंग्रजी भाषेत). Manager of Publications.
  2. ^ a b c d Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171820764.
  3. ^ a b c मनोहर पुरी. "बुद्ध पोर्णिमा" (एचटीएम) (हिंदी भाषेत). अभिव्यक्ति. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)
  4. ^ "क्यों मनाई जाती है बुद्ध पूर्णिमा? जानिए पूजा विधि और महत्व". आज तक (हिंदी भाषेत). 2020-05-07. 2023-05-27 रोजी पाहिले.
  5. ^ World Buddhism (इंग्रजी भाषेत). Buddhist Publications. 1961.
  6. ^ "Buddha Purnima 2023: Date, history, significance, celebrations and all you need to know about Buddha Jayanti". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-05-04. 2023-05-27 रोजी पाहिले.
  7. ^ साचा:Citebook
  8. ^ Live, A. B. P. (2022-12-26). "Mahabodhi Temple: बोधगया को क्यों कहते हैं ज्ञान की नगरी, जानें महाबोधि मंदिर के बारे में". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2023-05-27 रोजी पाहिले.
  9. ^ लेखक कुमार आनंद. "बुद्ध पौर्णिमा" (एचटीएम) (हिंदी भाषेत). नूतन सवेरा. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)[permanent dead link]
  10. ^ "Buddha Purnima 2023 : बुद्ध पौर्णिमा तिथी, महत्व आणि विशेष असण्याचे ३ कारणे". Maharashtra Times. 2023-05-27 रोजी पाहिले.
  11. ^ "बुद्ध पूर्णिमा या बुद्ध जयंती" (एचटीएम) (हिंदी भाषेत). वेब दुनिया. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)
  12. ^ a b c थोरात, ॲड. संदिप (१७ मे २०१२). "बुद्ध जयंतीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर". दैनिक सम्राट. p. ४.
  13. ^ Bansal, Sunita Pant (2005-06). Encyclopaedia of India (इंग्रजी भाषेत). Smriti Books. ISBN 9788187967712. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ Tsering, Geshe Tashi (2010-07). The Four Noble Truths: The Foundation of Buddhist Thought (इंग्रजी भाषेत). ReadHowYouWant.com. ISBN 9781458783950. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे