बीजांडकोश
प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूला एक-एक असे दोन बीजांडकोश असतात. बीजांडनिर्मिती करणे व योग्य वेळी त्याचे उदरपोकळीत उत्सर्जन करणे हे बीजांडकोशांचे काम आहे. त्याचप्रमाणे बीजांडकोशांतून इस्ट्रोजेन (Estrogen) व प्रोजेस्टेरॉन (Progesterone) ही संप्रेरकेही स्रवत असल्याने अंतःस्रावी ग्रंथी म्हणूनही ते काम करतात.
बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होते. हे संप्रेरक मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पोष ग्रंथीत (पिट्युटरी ग्रंथी - Pituitary gland) निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले बीजांड दर महिन्याला बीजांडकोशाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच बीजांडोत्सर्ग (ओव्ह्युलेशन - Ovulation) असे म्हणतात.
रचना
कार्य
मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा ऱ्हास होतो.