Jump to content

बिबट्या

बिबट्या
Late Pliocene or Early Pleistocene to Recent

प्रजातींची उपलब्धता

असुरक्षित प्रजाती  (IUCN 3.1)[]
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: फेलिडे
उपकुळ: पँथेरिने
जातकुळी: पँथेरा
जीव: P. pardus
शास्त्रीय नाव
Panthera pardus
Linnaeus, 1758

बिबट्या ,बिबळ्या किव्हा वाघरू (Leopard) हा मार्जार कुळातील मोठ्या जातींमध्ये सर्वाधिक आढळणारा प्राणी आहे, परंतु मोठ्या जातींमध्ये आकाराने सर्वांपेक्षा लहान आहे.

बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वारपेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.

याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

  • चित्याचे ठिपके हे मुखत्वे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात.
  • चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते.
  • बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत करतो.

व्युत्पत्ती

महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात, यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे.

वर्णन

बिबट्याचे पिल्लू
The pug mark of Panthera pardus fusca(Meyer), 1794-Indian leopard.This picture was taken during the project Wiki Loves Butterfly in Buxa Tiger Reserve, Alipurduar, West Bengal,India.

बिबटे चपळ शिकारी आहेत. त्यांचा जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते. बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते. दक्षिण अफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्थानातील बिबट्यांचे वजन ९० किलोपर्यंत असते, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्यांचे वजन २० किलो पर्यंत असते. ही वैविध्यता भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असल्याचे मानले जाते.
बिबट्यांच्या ठिपक्यांमधे देखील विविधता असते. त्यांचा पिवळ्या त्वचेमधे प्रदेशानुसार छटा असतात. पर्जन्यवनातील बिबट्यांची त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी असते, तर वाळवंटी भागातील बिबट्यांची त्वचा काहीशी फिकट असते; थंड प्रदेशांमधे थोडी करडी असते.

काळा बिबट्या

काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात.

काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केन्याच्या जंगलांमध्ये आहेत.

खाद्य

इतर मोठ्या मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात.

बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठे सांबर किंवा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे, हे बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात[]. रशियामध्ये ते सायबेरियाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची (ॲन्टिलोप्सची) शिकार करतात. बिबट्या ची चावण्याची क्षमता ही सिंह व वाघ यांच्या पेक्षा जास्त असते म्हणजे एखाद्या तगड्या जवान बिबट्या ची चावण्याची क्षमता ही १५०० पि एस आय इतकी असते.

महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील खेडेगावात ऊसाच्या शेतात बिबटे आढळून येत आहेत. जंगल क्षेत्र नष्ट होत आहेत. म्हणून मादा बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसुती करत आहेत. जे की फार धोकादायक आहे.

उपप्रजाती

  • भारतीय बिबट्या
  • श्रीलंकी बिबट्या
  • आफ्रिकी बिबट्या
  • उत्तर चिनी बिबट्या
  • चिनीभारतीय बिबट्या
  • जावन बिबट्या
  • अरबी बिबट्या
  • अमूर बिबट्या
  • कॉकेशियाई बिबट्या

पुस्तके

  • वन्य प्राण्यांचा जीवन संघर्ष : बिबट्या आणि माणूस (प्रभाकर कुकडोलकर)
  • मॅन इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग - रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या - ( जिम कॉर्बेट )
  1. ^ Cat Specialist Group (2002). Panthera pardus. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 12 May 2006ला बघितले..
  2. ^ धामनकर,अतुल. अरण्यवाचन.