बिटटॉरेंट
बिटटॉरेंट (BitTorrent) हे 'पिअर-टू-पिअर' पद्धतीने संगणक फाईल्स् वितरण करण्यासाठीच्या एका प्रोटोकॉलचे नाव आहे. तसेच, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग करणाऱ्या एका मुक्त सॉफ्टवेरलाही 'बिटटॉरेंट' ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही डिजिटल माहितीचे (दृक/श्राव्य माध्यम व इतर विविध स्वरूपातील) इंटरनेटवरून वितरण करण्यासाठी बिटटॉरेंटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, बिटटॉरेंटचा वापर करून गाणी, सिनेमा वा टेलिव्हिजनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जातात.
बिटटॉरेंट प्रोटोकॉलची रचना सर्वप्रथम 'ब्रॅम कोहन' ह्या अमेरिकन प्रोग्रॅमरने केली. सध्या 'बिटटॉरेंट इनकॉर्पोरेटेड (BitTorrent Inc.)' ही कंपनी बिटटॉरेंटचा पुढील विकास करते.
माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर / FTP सर्व्हर) वापर करताना, वितरण करणाऱ्या संगणक आणि नेटवर्कवर अतिशय मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. (विशेषतः, मोठ्या प्रमाणावरील डिजिटल माहिती बऱ्याच लोकांना वितरित करताना.) अश्या प्रकारचा ताण कमी करणे हे बिटटॉरेंट प्रोटोकॉलच्या रचनेमागील एक मुख्य उद्दिष्ट्य होते.
बिटटॉरेंट प्रोटोकॉल हा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. सार्वजनिक संशोधन करणाऱ्या काही कंपन्यांचा दावा आहे की इंटरनेटवरील बॅडविड्थ(नेटवर्कची माहिती वाहनक्षमता)च्या जवळपास ३५ टक्के क्षमता ही बिटटॉरेंटच्या वापरासाठी खर्च होते[१]. केबललॅब्स् (उत्तर अमेरिकेत केबल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या काही कंपन्याची संशोधन संस्था) ही संस्था दावा करते की केबल इंटरनेट नेटवर्कवरील बहुतांश 'Upstream' बॅडविड्थ ही बिटटॉरेंटने वापरली जाते.[२]
सर्वसाधारण रचना
बिटटॉरेंटद्वारे फाईल्स वितरीत करण्यासाठी सर्वप्रथम बिटटॉरेंट सॉफ्टवेरचा उपयोग करून एक 'टॉरेंट' तयार केला जातो. 'टॉरेंट' म्हणजे एक फाईल असते, ज्यात वितरणासाठी गरज असलेले सगळे तपशील साठवलेले असतात. उदा. वितरीत केल्या जाणाऱ्या सर्व फाईल्सची नावे, त्यांचा आकार (क्षमता), वितरणाचे संचलन करणाऱ्या मुख्य संगणकाबद्दल (Tracker) माहिती इत्यादी. टॉरेंट फाईल तयार केल्यावर ती कोणत्यातरी एक माध्यमातून प्रसिद्ध केली जाते - उदा. एखाद्या वेबसाईट(संकेतस्थळ)वर. टॉरेंट फाईल ठेवली जाते किंवा ईमेलमधून पाठवली जाते. प्रसिद्ध केलेली टॉरेंट फाईल दुसऱ्या संगणकावर बिटटॉरेंट सॉफ्टवेरमध्ये उघडली असता, वितरित केली जाणारी माहिती त्या संगणकावर उतरवून घेतली जाते. (म्हणजेच 'डाऊनलोड' केली जाते)
कायदेविषयक
इतर कोणत्याही प्रोटोकॉल पद्धतीप्रमाणे, बिटटॉरेंटचा वापर कायदेशीर किंवा बेकायदेशीर अश्या कोणत्याही वितरणासाठी केला जाणे शक्य आहे. उदा. एखाद्या माहितीचे (जसे, पुस्तकी मजकूर, डिजिटल गाणी) वितरण करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना अशी माहिती प्रसिद्ध करणे.
अश्या बेकायदेशीर वितरणासाठी बऱ्याच लोकांनी बिटटॉरेंटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला गेल्यामुळे अनेक लोक बिटटॉरेंट म्हणजे बेकायदेशीर असे समीकरण मांडू पाहतात.मात्र, बिटटॉरेंट प्रोटॉकॉल स्वतः बेकायदेशीर नसून, त्या प्रकारे वापर करणाऱ्या व्यक्तीवर अश्या कृत्याची जबाबदाही ठेवणे जास्त संयुक्तीत आहे.
References
- ^ "(याहू डॉट कॉमवरील लेख)LIVEWIRE - File-sharing network thrives beneath the radar". 2006-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-29 रोजी पाहिले.
- ^ "BitTorrent's Swarms Have a Deadly Bite On Broadband Nets". 2006-11-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-12-29 रोजी पाहिले.