बिंदू
बिंदूला ठिपका असेही म्हणतात. हा एक भौमितीय आकार आहे. बिंदूला लांबी, रुंदी व जाडी नसते. बिंदू अवकाशात एक स्थान दर्शवितो.
बिंदू हा भूमितीमधील एक मूलघटक आहे. यूक्लिड यांनी बिंदूची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे : ‘बिंदूला स्थान असते पण विस्तार नसतो’. म्हणजेच लांबी, रुंदी आणि जाडी नसलेला घटक म्हणजे बिंदू होय. आधुनिक स्वयंसिद्धकानुसारी भूमितीमध्ये बिंदू हा एक अव्याख्यात (व्याख्या न केलेले) पद मानला जातो. ज्या भूमितीतील रेषा हाच मूलभूत घटक मानतात, त्या भूमितात विशिष्ट तऱ्हेने काढलेल्या रेषाजालाने बिंदू दाखवितात. प-मितीय मापीय भूमितीत प-क्रमित संख्यांच्या प-युताने बिंदू दर्शवितात. प-मितीय प्रक्षेप भूमितीमध्ये बिंदू क्रमित (प+१) युताने दर्शवितात. अर्थात सर्व (प+१) संख्या एकाच वेळी शून्य असता कामा नयेत. या भूमितीमध्ये (क्ष१, क्ष२, क्षप+१) व (य१, य२...., यप+१) हे दोन बिंदू जर क्षर =स यर असेल (र = १, २,...., प + १;स स्थिरांक), तर एकरूप मानले जातात. ज्या (प + १) युतामध्ये शेवटचा घटक शून्य असतो, त्यांना आदर्श बिंदू म्हणतात.
गुर्जर, ल. वा.