Jump to content

बास्केटबॉल

बास्केटबॉल
मायकल जॉर्डन बोस्टन गार्डन मध्ये स्लॅम डंक करतांना
सर्वोच्च संघटना फिबा
सुरवात १८९१, स्प्रिंगफिल्ड, अमेरिका
माहिती
कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट
संघ सदस्य १३ ते १५ (५ मैदानात)
मिश्र Single
वर्गीकरण इंडोर किंवा आउटडोअर
साधन बास्केटबॉल
ऑलिंपिक १९३६

बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकून अधिकाधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.

सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच (४५.७ सेंमी) असतो व जाळी १० फूट (३.०५ मी) उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री टिंब रेषेच्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला सोपवता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा टप्पा केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.

नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरिक संपर्क साठी पेनाल्टी लावल्या जाते.

बास्केटबॉल मध्ये सहसा वापरले जाणारे शब्द शूटींग, पासिंग अणि ड्रिब्लिंग आहेत. सहसा संघातील सर्वात उंच खेळाडू सेंटर, स्मॉल फोरवर्ड किंवा पॉवर फॉरवर्ड मध्ये खेळतो व सर्वात छोटा खेळाडू किंवा चेंडू सक्षमपणे हाताळणारे खेळाडू पॉईंट गार्ड असतात.

इतिहास

सर्वात पहिले बास्केटबॉल कोर्ट: स्प्रिंगफिल्ड कॉलेज

बास्केटबॉल, नेटबॉल, डॉजबॉल, व्हालीबॉल, आणि लॅक्रोसे केवळ हेच चेंडूचे खेळ आहे ज्यांचा शोध नॉर्थ अमेरिकेत लागल्याचे मानले जाते.

डिसेंबर १८९१ मध्ये डॉ. जेम्स नैस्मिथ, कॅनडात जन्मलेल्या शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाने (वायएमसीए) (सद्य, स्प्रिंगफिल्ड कॉलेज) पावसाळी दिवसात विद्यार्थ्यांना तंदरूस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल खेळाचे प्रथम नियम व खेळण्याची पद्धती लिहिली.

भारताने १९५१ मध्ये दिल्ली येथे आशियाई सामन्यांमध्ये या खेळात प्रथमच भाग घेतला. १९५४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तनचा यशस्वी दौरा केला. १९५४ पर्यंत राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने बाद पद्धतीने (नॉक आउट) घेण्यात येत असत. परंतु त्या वर्षापासून हे सामने बाद आणि साखळी संमिश्र पद्धतीने (लीग कम नॉक आउट) घेतले जाऊ लागले. बास्केटबॉलचे स्त्रियांच्या राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने १९५२ मध्ये प्रथमतःच बंगलोर येथे भरविण्यात आले, तसेच तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरिता अजिंक्यपदाचे सामने १९५५ पासून सुरू झाले. देशोदेशी पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा आवडीने हा खेळ खेळतात. ‘इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन’च्या नियमांनुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमांनुसार होत असले, तरी कित्येक देशांत पुरुषांच्या नियमांत काही फेरफार करून स्त्रिया हा खेळ खेळतात.

नियम

‘इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन’च्या नियमांनुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमांनुसार होत असले, तरी कित्येक देशांत पुरुषांच्या नियमांत काही फेरफार करून स्त्रिया हा खेळ खेळतात. बास्केटबॉलचा सामना प्रत्येकी वीस मिनिटांच्या दोन भागांमध्ये खेळला जातो. मध्यंतरी दहा मिनिटांची विश्रांती असते. खेळाच्या प्रारंभी दोन्ही संघांचे मध्यवर्ती खेळाडू (सेंटर) मध्यवर्तुळात एकमेकांकडे व आपापल्या टोपलीकडे तोंड करून, डावा हात मागे ठेवून उभे राहतात. पंच मध्यभागी येऊन त्यांच्यामध्ये साधारण २ ते २.५ मी. (७ - ८ फुट) उंच हवेत चेंडू उडवितो. तो हवेत पूर्णपणे उंच गेल्यावरच खेळाडूस त्यास स्पर्शण्याची वा हाताने मारण्याची परवानगी असते. आरंभाप्रमाणेच दहा मिनिटांच्या मध्यंतरानंतर तसेच तांत्रिक नियमभंग होऊन मुक्तफेक केल्यानंतरही ही क्रिया केली जाते. प्रत्येक संघात पाच खेळाडू असतात. त्यांची स्थाने ठरलेली असतात. क्रमांक एक व दोनचे खेळाडू बचावाचे वा रक्षणाचे कार्य करतात, त्यांना अनुक्रमे ‘लेफ्ट गार्ड’ (डावीकडील रक्षक) व ‘राइट गार्ड’ (उजवीकडील रक्षक) म्हणतात. प्रतिपक्षाला आपल्या टोपलीत चेंडू टाकू न देणे व अशा रीतीने गोल होऊ न देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होय. क्रमांक तीन, चार व पाच या खेळाडूंना अनुक्रमे ‘लेफ्ट फॉरवर्ड’ (डावा आघाडी), ‘सेंटर’ (मध्यवर्ती) व ‘राइट फॉरवर्ड’ (उजवी आघाडी) अशी नावे आहेत. हे खेळाडू चढाई करतात. यांखेरीज प्रत्येक संघाला बदली खेळाडू खेळवता येतात. खेळामध्ये पाच वेळा खेळाडूंची बदली करता येते. रक्षकांनी बचाव करताना हाती आलेला चेंडू आघाडीपैकी जो खेळाडू मोकळा असेल, त्याच्याकडे फेकावयाचा असतो. चढाई करणारांनी चेंडू आपल्या ताब्यात घेऊन तो आपापसांत फेकावयाचा व प्रतिपक्षाच्या प्रांगणात जाऊन त्याच्या हद्दीतील टोपलीत तो वरून खाली टाकावयाचा असतो. वस्तुतः प्रत्येक खेळाडूसच बचावाचे व चढाईचे कार्य करावे लागते. हा खेळ अत्यंत गतिमान असल्याने प्रत्येक खेळाडू दक्ष व चपळ असावा लागतो व त्यास सतत धावपळ करावी लागते. खेळाच्या नियमांनुसार खेळाडूंना चेंडू हातात घेऊन एका पावलापेक्षा जास्त पुढे, मागे वा बाजूला जाता येत नाही. चेंडू जमिनीवर एका हाताने आपटून टप पाडीतच त्याला जाता येते, अथवा आपल्या जागेवरूनच त्याला आपल्या संघातील दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू फेकता येतो. चेंडू घेऊन पळत सुटणे, तसेच चेंडू पायाने मारणे वा गुद्दा मारणे हे निषिद्ध मानले जाते. प्रतिपक्षी खेळाडूस धरून ठेवल्यास, ढकलल्यास, अडखळून पाडल्यास ते वर्तन व्यक्तिगत नियमभंगाच्या (पर्सनल फाउल) सदरात येते व त्याचा फायदा प्रतिपक्षास मिळतो. ज्याच्या विरुद्ध असा नियमभंग घडला असेल त्या खेळाडूस मुक्तफेकीच्या रेषेपासून (फ्री थ्रो लाइन) प्रतिपक्षाच्या टोपलीत सरळ चेंडूफेक करण्याची संधी मिळते. खेळाडूंना धक्काबुक्की करण्याव्यतिरिक्त खेळ लांबवणे, खेळताना मधूनच बाहेर जाणे वगैरे तांत्रिक नियमभंग एखाद्या संघाकडून घडल्यासही त्याच्या प्रतिपक्षास मुक्तफेकीची संधी मिळते. मात्र अशा मुक्तफेकीने गोल झाल्यास त्यास फक्त एक गुण मिळतो. एरव्ही खेळताना झालेल्या गोलास (फील्ड गोल) २ गुण असतात. खेळताना चेंडू प्रांगणाबाहेर गेल्यास, ज्या संघाने तो बाहेर घालवला असेल, त्याच्या विरुद्ध संघास तो जेथून बाहेर गेला असेल, त्या ठिकाणाहून आत फेकता येतो. तसेच गोल झाला की, चेंडू पुन्हा मध्यभागी न आणता तिकडील प्रांगणातील खेळाडूंपैकी एकाने तो अंतिम रेषेपासून आत फेकावयाचा असतो. यामागे वेळ वाचवण्याचा उद्देश असतो. तसेच खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी वा खेळाडू जखमी झाल्यास प्रत्येक संघास तीन वेळा एकेक मिनिटाचा कालावधी (टाइम आउट) मागून घेता येतो. हा अवधीही पुढे वेळ वाढवून भरून काढला जातो. त्यामुळे प्रत्येक डाव संपूर्ण वीस मिनिटांचा होतो. खेळाच्या शेवटी जो संघ जास्त गुण मिळवेल तो विजयी ठरतो.

उंची

मैदानी स्वरूपाचा एक खेळ, सर्वसाधारणपणे २८.६६ मी. (९४ फुट) लांब व १५.२४ मी. (५० फुट) रुंद प्रांगणाच्या (आ. १) दोन्ही टोकांना पांढऱ्या दोरखंडाच्या जाळ्याची बिनबुडाची टोपली एका लोखंडी कडीपासून लोंबकळत सोडलेली असते. त्या कडीचा व्यास ०.४६ मी. (१८ इंच) असून ती जमिनीपासून ३.०५ मी. (१० फुट) उंचीवर असलेल्या एका पार्श्वफलकाला जोडलेली असते (आ. २). चेंडू गोलाकार असून त्याला बाहेरून कातड्याचे वेष्टन व आत रबराची फुगवलेली पिशवी असते. त्याचा परिघ कमीत कमी ७५ सेंमी. (२ फुट साडे पाच इंच) ते जास्तीत जास्त ७८ सेंमी. २ फुट सहा पुर्णांक तीन चतुर्थांश इंच असतो. त्याचे वजन ६०० ग्रॅमपेक्षा कमी असू नये, असा दंडक आहे. एका संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या हद्दीतील टोपलीत चेंडू टाकून गोल करणे व गुण संपादणे व त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघास गोल करण्यास अटकाव करणे हे या खेळाचे स्थूल मानाने स्वरूप होय.

संदर्भ आणि नोंदी