बाबासाहेब देशमुख
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख | |
---|---|
जन्म | पश्चिमनाथ पांडुरंग देशमुख २० फेब्रुवारी १९३९ मालेवाडी, वाळवा, सांगली, |
मृत्यू | २८ सप्टेंबर २००३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीत, शाहिरी ,कीर्तनकार |
भाषा | मराठी |
बाबासाहेब देशमुख हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शाहीर होते. त्यांचा "गड आला पण सिंह गेला..." हा सेनानी तानाजी मालुसरे यांच्यावरील पोवाडा महाराष्टात प्रसिद्ध आहे. तसेच शिवजन्म,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म, स्वराज्याची स्थापना, अफजलखान वध, बाजी प्रभू देशपांडे, आग्ऱ्याहून सुटका, सुरतेची लूट, राज्याभिषेक, क्रांतिसिंह नाना पाटील, उमाजी नाईक, राजारामबापू पाटील आणि अनेक पोवाडे प्रसिद्ध आहेत!
आधी नमन महाराष्ट्राला, ज्ञानेश्वरांना, गुरूमाऊलीला, तुकाराम महाराज, गाडगे बाबांच्या गुरूचरणाला !
हा बाबासाहेबांचा पोवाडा असून, सहसा त्यांच्या पोवाड्याने नेहमीच शिवजयंतीची सुरुवात होत असते. शिवकाळ हा त्यांच्या चिंतनाचा विषय, पण त्यांची लेखणी निव्वळ इतिहासातच कधी रमली नाही, अनेक व्यक्तींवर त्यांनी पोवाडे गायले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा मिरवला. काळजाला भिडणारा आवाज, मंत्रमुग्ध करणारी गायनशैली जणू साक्षात शिवकाळच समोर उभी करते. "मुक्कामी मालेवाडीला, शाहिरी साज चढविला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला...' अशी पहाडी आवाजातील तान एकेकाळी महाराष्ट्रभर गर्जत होती.
सन १९७०-८० चे दशक हा टेपरेकॉर्डर व स्पीकर गावोगावी पोचण्याचा कालखंड. नेमक्या याच वेळी बाबासाहेबांनी असंख्य चैतन्य निर्माण करणारे पोवाडे गायले आणि त्यांचा विलक्षण प्रसार झाला. सांगली जिल्ह्याच्या ज्ञात शाहिरीची परंपरा पठ्ठे बापुरावांपासून सुरू होते. यानंतर झालेले सुप्रसिद्ध शाहीर - ग. द. दीक्षित, र.द. दीक्षित, बापूराव विभूते, रमजान बागणीकर, अण्णा भाऊ साठे, पिराजीराव सरनाईक, अंबुताई बुधगावकर यांच्या तळपत्या शाहिरीचा वारसा बाबासाहेबांनी केवळ जोपासलाच नाही तर त्याला आधुनिक रूप व तंत्र देऊन पोवाडा वेगळ्या उंचीवर नेला. सांगली जिल्ह्याच्या, वाळवा तालुक्यातला, मालेवाडी गावातला हा शाहीर पाहता पाहता राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख झाला![ संदर्भ हवा ]
याच परंपरेत पुढे शाहीर शंकरराव निकम, संजीवन पाटील, राम सावंत, हरिभाऊ पवार, मु. वा. कुलकर्णी (पेठ), बाळ जगताप, आनंदराव सूर्यवंशी, बाळ गायकवाड, रंगराव मेथे, शंकरराव आंबी, पांडुरंग आरगे (तुंग), गहिनीनाथ देशमुख, नामदेव माळी (आळसंद) असे अनेक मोठे शाहीर सांगलीने महाराष्ट्राला दिले. महाराष्ट्राचे भूषण असलेली शाहिरीची परंपरा सांभाळणं आवश्यक आहे. असे त्यांचे म्हणणे असे.[१]
शिवमंदिर पंढरपूर
बाबासाहेब देशमुख यांनी पंढरपूर येथे भक्ती शक्ती संगम व्हावा म्हणून शिव मंदिराची स्थापना केली. पंढरपूर हे साक्षात वैकुंठ.! परंतु त्याआधीही पंढरपूर हे मोठे शिवस्थान आहे. शैव- वैष्णव पंथातील दोन्ही भक्त मंडळींसाठी वैकुंठ भूमी पंढरपूर ही पुण्यभूमी आहे. बाबासाहेब उर्फ अण्णांनी त्यांच्या हयातीत पंढरपूर येथे शिवमंदिराची उभारणी केली. ते आपल्या पोवाड्यातून नेहमीच शिवभक्तांना साद घालत-
"भू वैकुंठ भूमी वरी.!भीमेच्या तीरी,
असे पंढरी! शिवमंदिर यावे बघण्यास,
गुरू नामानंद आशीर्वादास,
शाहीर देशमुख गातो
पोवाडास जीर हा जी जी."
मुख्य मंदिराचा भाग सोडल्यास इतर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. अण्णांनी मोठ्या दिमाखात बांधलेली स्वागत कमान जमीनदोस्त झाली आहे. या शिवमंदिराच्या जिवंत स्मारकास पुन्हा उर्जितावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शाहिरी परंपरेत राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी अढळ स्थान निर्माण केले. बुलंद पहाडी आवाजाची सिंहललकारी, अभ्यासपूर्ण व्याख्यान रुपी पोवाड्यांची नवी परंपरा त्यांनी उदयास आणली. पोवाडा या महाराष्ट्रातील लोककलेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर पोवाड्यांची मोठी शृंखला त्यांनी निर्माण केले. त्याचबरोबर सांप्रत समाजातील घटनांवर ही बाबासाहेबांची लेखणी अधिकार वाणी गाजवू लागली. राष्ट्रपुरूषांचे पोवाडे, समाजातील भेदभाव, अन्याय, भ्रष्टाचार या विषयांवर बाबासाहेब पोवाड्यातून खरमरीत समाचार घेत. पोवाड्याच्या सादरीकरणात अप्रतिम वाद्यवृंद कलाकारांना सोबत घेऊन, आधुनिकतेचा साज देऊन पोवाड्याला रसिकमान्यता प्राप्त करून दिली. त्यामुळेच आजही कित्येक वर्षानंतर शिवशाहीर बाबासाहेबांचे पोवाडे हे महाराष्ट्रातील जनमानसावर अधिराज्य गाजवत आहेत.
महाराष्ट्रातील एकत्र आलेल्या शिवशाहीर सुरेश दादा जाधव, शिवशाहीर अतुल देशमुख, शिवशाहीर राजेंद्र सानप या शिष्य मंडळींनी राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या नावे शाहिरी प्रतिष्ठान स्थापन केले आहे.
संदर्भ
- ^ "वीररसाने तळपली सांगलीची शाहिरी". सकाळ दैनिक. ६ जानेवारी, इ.स. २०१३.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]