Jump to content

बाजी पासलकर

बाजी पासलकर
सरसेनापती
सरसेनापती बाजी पासलकर
जन्मअज्ञात
मोसे खोरे
मृत्यू२४ मे १६४९
सासवड

बाजी पासलकर (अज्ञात - २४ मे १६४९), हे बारा मावळपैकी एक असलेल्या मोसे खोऱ्यातील पिढीजात देशमुख होते, बाजी पासलकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा साम्राज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. स्वराज्याच्या कार्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे ते पहिलेच ठरले.

बाजी पासलकर हे मोसे खोऱ्यातील पिढीजात वतनदार. निगडे-मोसे गावापासून ते धामन-ओव्होळपर्यंतची ८४ गावांची देशमुखी त्यांना होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते, तंटे सोडविण्यात ते हुशार होते.

बेलसरची लढाई

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावळातील तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली, तेव्हा विजापूरच्या अदिलशाही दरबारात शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने ई.सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

मृत्यू

फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.

लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या पाठीमागून त्यांच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला. वेदनेने कळवळलेले बाजी त्या वार करणाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले. आपले काम फत्ते झाले हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत मागे वळून पळून गेला.

कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला. आपल्या धन्याचे जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती. पुरंदर किल्ला येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेले कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटते तसे राजे पालखीकडे धावले. छत्रपती शिवाजी महाराजच्या मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडला. त्यादिवशी २४ मे १६४९ ही तारीख होती.

वरसगाव धरण

पुण्याजवळील वरसगाव धरण जलाशयाला वीर बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे. बाजी पासलकर यांची समाधी सासवड येथे आहे. वीर बाजी पासलकर यांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोडवर आहे.

संदर्भ

  • रत्नपारखी शिवराय भाग‌ १ - बाजी पासलकर (बालसाहित्य, लेखक - उदय सप्रे)
  • सरसेनापती बाजी पासलकर (बालसाहित्य लेखक - पंडित कृष्णकांत नाईक)