बहिष्कृत भारत
बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या अंकापासून ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.
आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।
जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी।
इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे।
आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई।
एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।
संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्लिश भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
पहिला अंक
बहिष्कृत भारतच्या पहिल्या अंकात बाबासाहेब म्हणतात की, “सुधारणेचा कायदा अंमलात आला आहे. इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधीच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दयी धनी कसाबाच्या स्वाधीन करतो, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे. अस्पृश्यांची स्थिती सहा वर्षापूर्वीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे. ही शोचनीय स्थिती जगजाहीर करून होत असलेली हेळसांड टाळावयाची असेल व घडत असलेल्या अन्यायापासून व जुलुमापासून बचाव करावयाचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी सहा वर्षापूर्वीपेक्षा आज अधिक तीव्र आहे.
बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाही, तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच समजावे. कारण ब्रिटिश सरकारचे निःपक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठरवले जाईल, इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्त्विक बनलेली नाही हा घोर प्रसंग टाळावयाचा असेल तर, आतापासूनच चळवळीला सुरुवात केली पाहिजे.”
अग्रलेख
या वृत्तपत्रातील सर्व मजकूर हे डॉ. आंबेडकर हे स्वतः लिहीत असत. या वृत्तपत्रांना खूप वर्गणीदार लाभले नाहीत. पण कायमची आर्थिक तरतूद करणेही बाबासाहेबांना शक्य झाले नाही. या सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत १५ नोव्हेंबर १९२९ रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक निघाले. त्यातला ४ जानेवारी १९२९चा अंक वगळता सर्व अंकांत अग्रलेख आहेत. ३१ अंकांमध्ये ‘प्रासंगिक विचार’ या सदरामध्ये त्यांनी आजकालचे प्रश्न स्फुट लेख स्वरूपात लिहले आहेत. त्यांच्या स्फुट लेखांची संख्या १४५ आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर इ.स. १९६१ साली प्रबुद्ध भारत बंद पडले.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- मूकनायक
- जनता
- प्रबुद्ध भारत
- समता (वृत्तपत्र)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य