Jump to content

बळवंत मोरेश्वर पुरंदरे

बळवंत मोरेश्वर पुरंदरे
Babasaheb Purandare
बाबासाहेब पुरंदरे
जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे
टोपणनाव बाबासाहेब पुरंदरे
जन्मजुलै २९, इ.स. १९२२
शुक्रवार पेठ,पुणे
मृत्यू १५ नोव्हेंबर २०२१
पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र इतिहाससंशोधन, साहित्य
भाषामराठी
विषय शिवकालीन इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृतीराजा शिवछत्रपती
वडील मोरेश्वर पुरंदरे
पत्नीनिर्मला पुरंदरे
अपत्ये माधुरी पुरंदरे, प्रसाद पुरंदरे, अमृत पुरंदरे
पुरस्कार पद्मविभूषण[], महाराष्ट्रभूषण पुरस्कार

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (जुलै २९, इ.स. १९२२ - १५ नोव्हेंबर २०२१[]) ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथाचे लेखन केले, 'जाणता राजा' या महानाट्याचे लेखन-दिग्दर्शन केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिद्ध वक्ते म्हणुन त्यांची ख्याती जगामध्ये होती.

शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करतानाच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रावरच नव्हे, तर आख्ख्या देशावर असलेला प्रभाव शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितला अश्या शब्दात केला होता.

आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना वृद्धापकाळाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दुःखद निधन झाले.

व्यक्तिगत जीवन

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड होय.

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये. [ संदर्भ हवा ]

बाबासाहेबांच्या पत्नी निर्मला पुरंदरे या त्यांच्या शिक्षणविषयक कार्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनाही पुण्यभूषण हा किताब मिळाला होता. बाबासाहेबांची कन्या माधुरी पुरंदरे या एक गायिका-लेखिका आहेत.

कारकीर्द

तरुणपणा (इ.स. .....) पासून पुण्यातच स्थायिक झाले व भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत..

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत.

बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातील सहभाग

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

बाबासाहेब पुरंदरे यांचे लेखन

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.

पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक दस्तावेज स्वतः डोळ्याखाली घालून लिहिलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक

या पुस्तकाची १७वी आवृत्ती ३१ मार्च, २०१४ (गुडी पाडव्या)ला प्रसिद्ध झाली. पूर्वी एकच असलेले हे पुस्तक आता दोन खंडांत विभागले आहे.

नाट्यलेखन आणि दिग्दर्शन

याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५०हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे.[ संदर्भ हवा ] हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात..

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रप्रसारासाठी काही उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशांतही त्यांच्या व्याख्यानांतून आणि जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते. हे चरित्र व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे हे त्यांनी त्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले.[ संदर्भ हवा ]

दानशूरता

बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली.

महाराष्ट्रभूषण

बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार जेव्हा जाहीर केला तेव्हा अनेक मराठा जातिधारक संस्थांनी विरोध केला. त्यांच्या मते बाबासाहेब हे एक ललित लेखक असून इतिहाससंशोधक नाहीत. त्यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात चुकीची आणि शिवाजी महाराजांची बदनामी करणारी माहिती छापली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुरंदरे यांच्या योग्यतेचे दाखले घेऊन त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण मैदानातही उतरल्याने, राजकीय मैदानात सुरू झालेल्या या लढ्याला आता वैचारिक स्वरूप प्राप्त होणार असे दिसू लागले होते.

हा पुरस्कार बाबासाहेबांना याआधीच द्यायला हवा होता, असा दावा करणारे एक निवेदन आता पुरंदरे विरोधकांशी सामना करण्याकरिता सज्ज झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कारकिर्दीचा आणि कर्तृत्वाचा संपूर्ण आलेखच या निवेदनाद्वारे मांडण्यात आला असून बाबासाहेबांना इतिहास संशोधक म्हणून मान्यता देणाऱ्या मान्यवरांची यादीच त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे. डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने तर त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन १४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते, याकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य, या साऱ्या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचविले. दादरा नगरहवेली मुक्ती लढ्याचे ते स्वातंत्र्यसैनिक आहेत, आणि पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात संशोधक म्हणूनही ते सहभागी झाले आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

‘वाढलेल्या वयाचा विचार करून हा पुरस्कार देणे गैर आहे’ असे म्हणणाऱ्यांनी, वयाच्या चौदाव्या वर्षांपासून इतिहासाशी आणि विशेषत शिवचरित्राशी एकरूप होऊन त्यामध्ये झोकून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या तपश्चर्येची आदरपूर्वक नोंद घेतली पाहिजे व पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजे, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले होते. या निवेदनावर माजी खासदार प्रदीप रावत, अविनाश धर्माधिकारी, इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू द.ना. धनागरे, मृणालिनी शिवाजीराव सावंत, भारत इतिहास संशोधन मंडळाचे श्री.मा. भावे, इतिहास व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले ऐतिहासिक व अन्य साहित्य

  • आग्रा
  • कलावंतिणीचा सज्जा
  • जाणता राजा
  • पन्हाळगड
  • पुरंदर
  • पुरंदरच्या बुरुजावरून
  • पुरंदऱ्यांचा सरकारवाडा
  • पुरंदऱ्यांची नौबत
  • प्रतापगड
  • फुलवंती
  • महाराज
  • मुजऱ्याचे मानकरी
  • राजगड
  • राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार - हेमा हेर्लेकर)
  • लालमहाल
  • शिलंगणाचं सोनं
  • शेलारखिंड. (ही शिवाजी महाराजांच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी. या कादंबरीवर अजिंक्‍य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला "सर्जा‘ हा मराठी चित्रपटही निघाला होता.
  • सावित्री
  • सिंहगड

ध्वनिफिती

  • बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन - भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)
  • शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट

बाबासाहेब पुरंदरे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • राजामाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.
  • डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल डी.लिट. (२०१३)
  • ’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.
  • बाबासाहेब पुरंदरे यांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी श्रावण शुद्ध चतुर्थी होती, तो दिवस बाबासाहेबांचा तिथीने ९३वा वाढदिवस होता.
  • गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२१-२-२०१६)
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)
  • महाराष्ट्रभूषण (इ.स. २०१५)
  • पद्मविभूषण (इ.स.२०१९)[]

संदर्भ

  1. ^ प्रसिद्धिपत्रक, २०१९.
  2. ^ "बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन".
  3. ^ "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण प्रदान". लोकसत्ता. ८ मे २०१९. ३० जुलै २०१९ रोजी पाहिले.

संदर्भसूची