बलभीम महाराज
प.पू.संत श्री. बलभीम महाराज साडेकर
तीन पिढ्या ज्या देशमुख घराण्यात मारुतीची उपासना सातत्याने केली जात होती. त्या घराण्यात श्रीमारूतीच्या कृपाप्रसादाने दि.९ एप्रिल १८५३, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुडीपाडवा या सुमुहूर्तावर ज्या बालकाचा जन्म झाला, ते हे बलभीम महाराज साडेकर(देशमुख). सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 'साडे'या गावी त्यांचा जन्म झाला. हे घराने वारकरी सांप्रदायातील, सहाजिकच पांडुरंगाची उपासना होतीच. वयाच्या २१ व्या वर्षी खामगाव येथे पांडुरंगाने फकीररूपाने त्यांना दर्शन दिले व त्यानंतर एकदा कठीण प्रसंगी रावजी कासार रूपाने त्यांना पंढरपूरी नेले. "देव दावी ऐसा कोण भेटे गुरू | तयाचे उपकार माझे माथा ||" सद्गुरू शोधार्थ सन १८९६ मध्ये साडेगाव सोडले व पायी नाशिकमार्गे इंदूरला आले. तेथे प.पू.परंमश्रेष्ठ श्री लक्ष्मण महाराज यांनी त्यांचेवर कृपा केली, त्यावेळी त्यांचे वय होते ४३ वर्षे. त्यानंतर आजीवन त्यांनी ज्ञानभक्तीपर मार्गाने, कथा-प्रवचनाद्वारे, उज्जैन, सुजालपूर, सारंगपूर, नरसिंगगड, देवास इ.मध्यप्रदेशातील गावात व महाराष्ट्रात साडेगाव, करमला, सोलापूर पंढरपूर, पुणे इ ठिकाणी गुरूकार्य विस्तार केला. पुण्यामधील ह.भ.प.ल.रा.पांगारकर, डेक्कन कॉलेजमधील प्रो.भानू, प्र.धोंडो केशव कर्वे, श्री केशवराव खाजगीवाले इ.मंडळींनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. मध्यप्रदेशातील भोपाळजवळील नरसिंहगड येथे भाद्रपद वध्य १,'इंदिरा एकादशी', दि.९ ओक्टोंबर १९०९ रोजी रात्री ९ वाजता यांनी आपला देह वयाचे ५६ वे वर्षी पंचत्वात विलीन केला. इथेच त्यांची समाधी असून हे स्थान "न राहतायते राहावी | भ्रमतयाते बैसवी | थापटून चेववी विरक्तीते ||" या श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे येथे "निरंतर नाही | तरी आली गेली काही | होतु का मयूरेही | आम्हीना न म्हनो" याप्रमाणे मयूर, कोकिळ आदिकरून पक्षी मंजुळ रव मधून करीत असतात. प.पू.बलभीममहाराजांनी आमरण सद्गुरू परंपरेचा भागवतधर्म व दत्तसंप्रदाय प्रतिपाळला. याचे प्रत्यंतर त्यांच्या अभंगरचनेत व त्यांनी निरनिराळ्या गावच्या भक्तांना पाठविलेल्या व आज उपलब्ध असलेल्या ६९ पत्रामधून येते. संतकवी श्री दसगणू महाराज आपल्या "श्रीभक्तिसारामृत" ग्रंथात प.पू.बलभीम महाराजांविषयी लिहितात.