Jump to content

बनास नदी (राजस्थान)

राजस्थानमध्ये बनास नावाच्या दोन नद्या आहेत. दोन्ही अरवली पर्वतात उगम पावतात. एक दक्षिणेला जाऊन गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून जाऊन कच्छच्या रणात विलीन होते, तर दुसरी बनास नदी चंबळ नदीला मिळते. चंबळ पुढे यमुना नदीला मिळते.

ही दुसरी बनास नदी राजस्थानातल्या उदयपूर जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेच्या खमनौर डोंगरात कुंभलगडजवळ उगम पावून राजस्थानातच संपते. हिची एकूण लांबी ४८० किमी आहे. नाथद्वारा, कंकरोली, राजसमंद व भिलवाडा जिल्ह्यातून वहात वहात ती टोंक, सवाई माधोपूर करून चंबळ नदीला मिळते.

कोठारी नदी ही या दुसऱ्या बनासची उपनदी आहे, तीही राजस्थानमधील देवैर गावाजवळ उगम पावते. मांडलगड गावाजवळ तिचा बनासशी संगम होतो.

खारी नदीही त्याच बनासची उपनदी असून बेदल गावाजवळ उगम पावते. अजमेर जिल्ह्यात सावर गावाजवळ ती बनासला मिळते.

दाई ही बनासची तिसरी उपनदी आहे; राजस्थानच्या उनिवारा खुर्द गावाजवळ उगम पावून तिचा बिलासपूर गावापाशी बनासशी संगम होतो.

बेडच, मुरेल व धुंध याही बनासच्या उपनद्या आहेत.

बनास म्हणजे बन+आस, म्हणजे वनाची आशा.