Jump to content

फ्रेडरिक सॉडी

सॉडी, फ्रेडरिक : (२ सप्टेंबर १८७७ –२२ सप्टेंबर १९५६). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. ⇨ समस्थानिकांच्या अस्तित्वाचा शोध लावल्याबद्दल त्यांना १९२१ सालचे रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

सॉडी यांचा जन्म ईस्टबॉर्न ( ससेक्स ) येथे झाला. त्यांचे शिक्षण ईस्टबॉर्न कॉलेज, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ वेल्स ( अ‍ॅबरिस्टवीथ ) आणि मर्टन कॉलेज ( ऑक्सफर्ड ) येथे झाले. ते ग्लासगो (१९०४–१४), अ‍ॅबरडीन (१९१४–१९) आणि ऑक्सफर्ड (१९१९–३६) येथील विद्यापीठांत रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

मॅक्‌गिल विद्यापीठात ( मॉंट्रिऑल ) डेमॉन्स्ट्रेटर (१९००–०२) असताना सॉडी यांनी ⇨अर्नेस्ट रदरफर्ड यांच्याबरोबर किरणोत्सर्गासंबंधी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याच्या पदार्थाच्या गुणधर्मासंबंधी ) संशोधन करून किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या विघटनाविषयीचा महत्त्वाचा सिद्घांत मांडला. १९१२ मध्ये सॉडी यांनी किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या विघटनमालेच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढला की, काही विशिष्ट मूलद्रव्ये दोन वा अधिक स्वरूपांत अस्तित्वात असून त्यांचा अणुभार भिन्न असतो; परंतु त्यांचा अणुक्रमांक ( अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या ) तोच असून त्यांचे रासायनिक गुणधर्म मात्र साधारणपणे सारखेच असतात. मूलद्रव्यांच्या अशा निरनिराळ्या स्वरूपांना त्यांनी ‘आयसोटप’ ( समस्थानिक ) असे नाव दिले. समस्थानिक रासायनिक पद्घतींनी अलग करता येत नाहीत, असेही त्यांनी प्रतिपादन केले. १९०३ मध्ये ‘युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन’ येथे ⇨ सर विल्यम रॅम्झी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी रेडियमापासून हीलियम निर्माण होत असल्याचे सिद्घ केले. १९१३ मध्ये त्यांनी आल्फा आणि बीटा नियमांचे एकत्रीकरण करून आवर्त सारणीतील गट स्थलांतर नियम मांडला [⟶ किरणोत्सर्ग ].

सॉडी हे द केमिकल सोसायटी (१८९९ ) आणि द रॉयल सोसायटी (१९१० ) या संस्थांचे सदस्य आणि स्वीडन, इटली व रशिया या देशांतील विज्ञान अकादमींचे परदेशी सदस्य होते. त्यांना कान्नीद्झारो पारितोषिक (१९१३) आणि आल्बर्ट पदक (१९५५) हे बहुमान मिळाले. सायन्स अँड लाइफ (१९२०) या पुस्तकात त्यांनी समस्थानिकांच्या साहाय्याने भूवैज्ञानिक वय निश्चित करता येते, असे दाखविले [⟶ किरणोत्सर्गी कार्बन कालनिर्णय पद्घति; खडकांचे वय ]. त्यांनी किरणोत्सर्गासंबंधी अनेक ग्रंथ व निबंध प्रसिद्घ केले.

सॉडी यांचे ब्रायटन येथे निधन झाले.