फ्रिगेट
फ्रिगेट : युद्धनौकेचा एक प्रकार. मराठीत याची फरगत, फरकत वा फरगाद अशीही अपभ्रष्ट रूपे प्रचारात आहेत. चिंचोळ्या आकाराची व पातळ चिलखती नौ–काया असलेली ही युद्धनौका अस्त्रसज्ज असते. उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या ‘फ्रिगेट’ या सागरी पक्ष्यावरून तिला हे नाव मिळाले आहे. ⇨ विनाशिका, कॉर्व्हेट व स्लूप या नौकांचाही फ्रिगेटवर्गात समावेश केला जातो. ⇨कृझर, ही भारी युद्धनौका ⇨विमानवाहू जहाजे तसेच व्यापारी जहाज–काफिल्यांचे संरक्षक म्हणून काम करते. पाणबुड्या, लढाऊ विमाने वा अस्त्रे यांच्या हल्ल्यापासून प्रसंगी स्वबलिदान करूनही त्यांचे संरक्षण करणे, हे फ्रिगेटचे परम कर्तव्य असते. कॉर्व्हेट वा स्लूप यांपेक्षा भारी, परंतु विनाशिकेहून लहान व हलक्या अशा युद्धनौकांना भारतीय नौसेनेत फ्रिगेट म्हणतात. अमेरिकेत विनाशीकेपेक्षा भारी, परंतु क्रूझरहून हलक्या नौकांना फ्रिगेट हे नाव दिले जाते.
यूरोपमध्ये सोळाव्या शतकात भारी युद्धनौकांच्या व व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी तसेच ⇨ गस्त व टेहळणी [⟶ टेहळणी, सैनिकी ] या कामासाठी फ्रिगेट प्रचारात आली. पुढे एक किंवा दोन तोफ–मजले असलेल्या फ्रिगेट बांधण्यात येऊ लागल्या. त्यांच्यावर २० ते ५४ तोफा असत व त्यांचे वजन सु. १,००० टन असे. त्यांची जास्तीत जास्त लांबी ६८ मीटर, व रूंदी १५ मीटर व खोली ५ मीटर असे. या तीन शिडांच्या फ्रिगेटांचा वेग सु १३·५ नॉट होता. स्लूप व कॉर्व्हेट यांच्यावर एक तोफ–मजला असे. त्यांचे शिड वल्हे यांचा उपयोग प्रचालनासाठी करीत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पाणतीरांचा [⟶ पाणतीर] विध्वंस करण्यासाठी विनाशिकांचा जन्म झाला. प्रचलित अणुयुगात फ्रिगेट नौकांना पुढील महत्वाची कामे
प्रसंगोपात्त करावी लागतात : (१) भारी युद्धनौकांना रडारद्वारे वायुहल्ल्याची पूर्व–सूचना देऊन वायुविरोधीतंत्र उपयोगात आणणे (२) भू–जलगामी कारवायांना तसेच विमानवाहक नौदलांना व वाहतूक करणाऱ्या इतर जहाज–काफिल्यांना संरक्षण देणे (३) शत्रूने सोडलेल्या अस्त्रांची पूर्वसूचना संबंधितांना देणे व (४) शत्रूची अस्त्रे मार्गावर असतानाच त्यांचा नाश करणे. पाणबुड्यांचा मागोवा घेऊन विध्वंसनासाठी उपाययोजना करणे. ही कामे पार पाडण्यासाठी फ्रिगेटवर विमान विध्वंसक अस्त्रे उदा., सि–कॅट, सिडार्ट, स्टाईक्स वगैरे आणि पाणबुडीविरोधी [⟶ पाणबुडी युद्धतंत्र] बाँब, पाणतीर व जलभारप्रेरित महास्फोटके इ. सामग्री सज्ज असते. तसेच विमानभेदी व नौकाभेदी तोफाही सज्ज असतात. भारतीय नौसेनेत [⟶ नौसेना] असलेल्या आधुनिक फ्रिगेट (‘गिरी’ वर्ग) निलगिरी, हिमगिरी, उदयगिरी व दुणागिरी या चार २,८०० टनांच्या आहेत. त्या ११५ मिमी. च्या दोन व ४० मिमी.च्या दोन अशा अनुक्रमे विमानभेदी व नौकाभेदी तोफा पाणबुडीविरोधी तीन नळ्यांची लिंबो ही उखळी तोफ आणि ‘वास्प’ हेलिकॉप्टर इत्यादींनी सज्ज आहेत. १५ मे १९८० रोजी संपूर्णतया भारतीय आखणी–नमुना व बांधणीची ‘गोदावरी’ श्रेणीतील पहिली फ्रिगेट ‘तारागिरी’ ही युद्धनौका भारतीय नौसेनेत समाविष्ट झाली. या श्रेणीतील ‘विजयगिरी’ ही १९८१ साली तयार होऊन १९८३ साली ती ‘युद्धसज्ज’ होईल, असा अंदाज आहे.