फ्रान्सचे रशियावरील आक्रमण
नेपोलियन रशियाहून माघारी येताना
दिनांक | २४ जून - १४ डिसेंबर १८१२ |
---|---|
स्थान | रशियन साम्राज्य |
परिणती | रशियाचा विजय फ्रान्सच्या सैन्याचा विध्वंस |
युद्धमान पक्ष | |
---|---|
फ्रान्सचे साम्राज्य | रशियन साम्राज्य स्वीडन |
सेनापती | |
नेपोलियन लुई अलेक्झांडर बर्थियर लुई-निकोलास दाउट मिकेल ने | अलेक्झांडर पहिला मिखाईल कुटुझोव मायकेल ॲन्ड्रिआस बार्क्ले द टॉली प्यॉत्र बॅग्रेशन |
सैन्यबळ | |
६८५,००० | १९८,२५० सैन्य ९,००,००० एकूण |
बळी आणि नुकसान | |
मृत्यू: ४,००,००० १,२०,००० वाचलेल्यांपैकी २०,००० फ्रेंच, ३५,००० पोलिश व ५०,००० ऑस्ट्रियन व प्रशियन होते. | मृत्यू: २,१०,००० |
फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रॅांड आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते.
ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले.
रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे.
रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले.
७ सप्टेंबर रोजी मोस्कोपासून ७० मैल पश्चिमेला असलेल्या बोरोदिनो या गावी ठाण मांडून बसलेल्या रशियन सैन्यास फ्रेंच सैन्याने अखेर गाठले. यानंतर झालेली लढाई ही तेव्हापर्यतच्या नेपोलियनिक युद्धांमधील सर्वात मोठी एकदिवसीय लढाई होती, ज्यात अडीच लाखांहून अधिक सैनिक लढले व ७०,००० जखमी किंवा ठार झाले. हजारो सैनिक व ४९ सेनानी इतकी मोठी किंमत देऊन फ्रेंचांनी तात्पुरता विजय मिळवला, परंतु रशियन सैन्याने दुसऱ्या दिवशी स्वतःला सोडवून माघार घेण्यात यश मिळवले व आवश्यक असलेला निर्णायक विजय नेपोलियन मिळवू शकला नाही.
एका आठवड्यानंतर नेपोलियनने मॉस्कोमध्ये प्रवेश केला. परंतु सम्राटाशी भेट घेण्यास शहरातून कोणतेच शिष्टमंडळ न आल्याने फ्रेंच चक्रावून गेले. रशियनांनी अगोदरच शहर रिकामे केले होते व नगरप्रमुख काउन्ट फ्यॉडॉर रोस्तोपचिन याने मॉस्कोतील अनेक मोक्याच्या ठिकाणी आग लावण्याचे आदेश दिले होते. नेपोलियनची आशा त्याची मोहीम मोठ्या विजयामुळे पूर्ण होईल अशी होती, परंतु रणांगणावरील विजयामुळे तो युद्धात विजयी होऊ शकला नाही. मॉस्कोच्या पाडावामुळे अलेक्झांडरला तह करणे भाग पडले नाही व फ्रेंचांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे दोन्ही बाजू जाणून होत्या. रशियन सैन्यातील कथित असंतोष व खचणाऱ्या मनोधैर्याच्या खोट्या वार्ता पसरवल्यामुळे नेपोलियन तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी मॉस्कोमध्येच थांबला. तिथे एक महिनाभर वास्तव्य केल्यावर नेपोलियनने त्याचे सैन्य नैर्ऋत्येकडे जेथे कुटुझोवच्या सैन्याचा तळ होता अशा कालुगाच्या दिशेने वळवले, .
फ्रेंचांच्या कालुगावरील आक्रमणास एका रशियन तुकडीने त्रास दिला. नेपोलियनने पुन्हा एकदा रशियन सैन्याशी निर्णायक लढाईसाठी मालोयारोस्लावेत्झ सामना केला. अधिक चांगल्या स्थितीत असूनही रशियन सैन्याने एका मोठ्या चकमकीनंतर माघार घेतली. थकलेली सैन्ये, संपत चालली रसद, हिवाळी कपड्यांचा अभाव व उर्वरित घोडे वाईट स्थितीत अशा परिस्थितीत नेपोलियनला माघार घेणे भाग पडले. स्मोलेन्स्क व नंतर व्हिल्नियस येथील रसद मिळवण्याची त्याची अपेक्षा होती. यानंतरच्या आठवड्यांमध्ये रशियन हिवाळ्याला आरंभ झाल्याने ग्रान्द आर्मीचे प्रचंड हाल झाले. घोड्यांसाठीच्या चाऱ्याचा अभाव, कडाक्याच्या थंडीमुळे हायपोथर्मिया [मराठी शब्द सुचवा] व एकाकी पडलेल्या सैन्य तुकड्यांवर कोसॅक व रशियन शेतकऱ्यांकडून होणारे हल्ले या सर्व कारणांमुळे अनेक सैनिक मृत्युमुखी पडले व सैन्यातील एकजूट संपुष्टात आली. नेपोलियनच्या उर्वरित सैन्याने जेव्हा बेरेझिना नदी पार केली तेव्हा जेमतेम २७,००० सैनिक शिल्लक शिल्लक होते. ग्रान्द आर्मीचे ३,८०,००० सैनिक ठार व १,००,००० युद्धकैदी झाले. या लढाईनंतर आपल्या सल्लागारांच्या आग्रहावरून व मार्शल्सच्या (सेनापतींच्या) एकमताने दिलेल्या मान्यतेमुळे नेपोलियन सैन्य सोडून परतला. तो आपले सम्राटपद कायम ठेवण्यासाठी व आगेकूच करणाऱ्या रशियनांना विरोध करण्यास अधिक सैन्य गोळा करण्यासाठी पॅरिसमध्ये परतला. अंदाजे सहा महिने चाललेली ही मोहीम १४ डिसेंबर १८१२ रोजी खरया अर्थाने संपुष्टात आली आणि रशियाच्या भूमीवरून अखेरच्या फ्रेंच दळांनी माघार घेतली.
हे युद्ध नेपोलियोनिक युद्धांतील निर्णायक टप्पा होता. नेपोलियनच्या कीर्तीला यामुळे फार मोठा तडा गेला व युरोपवरील फ्रेंच प्रभुत्व खिळखिळे झाले. फ्रान्स व त्याच्या मांडलिक राष्ट्रांची मिळून तयार झालेल्या ग्रान्द आर्मीचा विनाश झाला. या घटनांमुळे युरोपीय राजकारणात महत्त्वाचे बदल घडले. फ्रान्सची मित्रराष्ट्रे प्रशिया व नंतर ऑस्ट्रिया यांनी त्यांच्यावर लादलेले मित्रत्वाचे तह मोडून पक्षबदल केला व त्यामुळे सहाव्या संघाच्या युद्धास प्रारंभ झाला.
कारणे
नेपोलियनचे साम्राज्य १८१० व १८११ मध्ये अत्युच्च शिखरावर असल्याचे वाटत असले तरी ते प्रत्यक्षात १८०६-१८०९ नंतर दुर्बळ बनले होते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बहुतांश पश्चिम व मध्य युरोप मैत्रीकरार, मांडलिक देश व पराभूत राष्ट्रे यांच्या स्वरूपात नेपोलियनच्या ताब्यात असला तरी स्पेन व पोर्तुगालमध्ये त्याची सैन्ये अतिशय वेळखाऊ व खर्चिक अशा द्वीपकल्पीय युद्धात गुंतून पडली होती. सततच्या युद्धांमुळे फ्रान्सची अर्थव्यवस्था, सैन्याचे मनोधैर्य व राजनैतिक पाठिंबा या सर्वांत लक्षणीयरीत्या घट झाली होती. परंतु महत्त्वाचे म्हणजे नेपोलियनची स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती पूर्वीप्रमाणे राहिली नव्हती. ऐषारामी जीवनशैलीमुळे त्याचे वजन वाढले होते तसेच तो विविध रोगांनी ग्रस्त होता. असे असूनही स्पेनमधील अशांतता वगळता कोणत्याही प्रबळ युरोपीय सत्तेकडे त्याला विरोध करण्याचे धैर्य नव्हते.
ऑस्ट्रिया व फ्रान्स यांच्यातील युद्ध शॉनब्रुनच्या तहानुसार समाप्त झाले. या तहातील एक कलम ऑस्ट्रियाकडून पश्चिम गॅलिशिया हा प्रांत पोलंडच्या राज्याला देण्याबाबत होते. रशियाने हे आपल्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात जात असल्याचे ओळखून हा प्रदेश रशियावरील आक्रमणासाठी संभाव्य आरंभ क्षेत्र असल्याचे ठरवले. १८११ साली रशियन सेनाधिकाऱ्यांनी आक्रमक युद्धाचा आराखडा डान्झिग व वॉर्सा या शहरांवरचा हल्ला गृहीत धरून तयार केला.
पोलिश देशभक्त व राष्ट्रवाद्यांकडून अधिक साहाय्य मिळण्यासाठी नेपोलियनने या युद्धाचे नामकरण पोलंडचे दुसरे युद्ध असे केले. त्याने चौथ्या संघाच्या युद्धास पोलंडचे "पहिले" युद्ध असे मानले कारण त्या युद्धात फ्रेंच अधिकृत ध्येयांमध्ये पूर्वी रशिया व प्रशिया यांत विभागल्या गेलेल्या पोलंड-लिथुआनिया या देशाच्या भूप्रदेशावर पोलंडची पुनर्स्थापना करणे हे एक ध्येय होते.
रशिया या युद्धामुळे मोठ्या आर्थिक संकटात आला. तेथील तुरळक उत्पादन व प्रचंड कच्चा माल यामुळे रशियाची अर्थव्यवस्था नेपोलियनच्या 'कॉन्टिनेन्टल सिस्टिम' (खंडीय प्रणाली) वर वित्तपुरवठा व उत्पादित माल या दोन्हीसाठी अवलंबून होती. या प्रणालीतून बाहेर पडल्याचा निर्णय रशियाने घेतल्याने युद्धासाठी नेपोलियनला आणखी एक कारण दिले.