Jump to content

फ्रांस्वा द क्यूरेल

(१० जून १८५४ – २५ एप्रिल १९२८). फ्रेंच नाटककार. जन्म मेट्स येथे. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण त्याने घेतले होते. आंद्रे-लेऑनार आंत्वान ह्या पुरोगामी नाट्यनिर्मात्याने त्याची L’ Envers d’ une Sainte (इं. भा. अ फॉल्स सेंट, १९१६) आणि Les Fossiles (इं. भा. द फॉसिल्स, १९१५) ही दोन नाटके प्रथम रंगभूमीवर आणली (१८९२). यांपैकी पहिल्या नाटकात मानवी मनोविकारांचे सूक्ष्म विश्लेषण आहे आणि दुसऱ्या नाटकात आधुनिक जगात जुन्या सरंजाम शाहीतील व्यक्तींना जाणवणारी किंकर्तव्यमूढता चित्रित केलेली आहे. त्याच्या इतर नाटकांपैकी Le Repas du lion (१८९७) मध्ये मालक-कामगार संघर्ष दाखविला आहे. वैज्ञानिक शक्तीला आवश्यक असलेल्या नैतिक बंधनाची समस्या La Nouvelle idole (१८९९) मध्ये मांडलेली आहे. Terre inhumaine (१९२२, इं. शी. इन ह्यूमन वर्ल्ड) हे त्याचे लोकप्रिय झालेले एक नाटक.

दोन शत्रुराष्ट्रांतील व्यक्ती प्रेमभावनेने एकत्र येऊ इच्छितात. त्यातून निर्माण होणारा भावनिक संघर्ष त्यात रंगविलेला आहे. विध्वंसक युद्धाचे मानवी संस्कृतीवर होणारे परिणाम ह्या नाट्यकृतीतून सूचित होतात. क्यूरेलची नाटके मुख्यतः वैचारिक स्वरूपाची असून त्यांची दखल समीक्षकांनी घेतली असली, तरी सर्वसाधारण प्रेक्षकांचा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पॅरिसमध्ये तो निधन पावला.