प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९६४ साली केली. त्यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन केला. ग्रामीण भागामधील निरक्षरता आणि महिला सबलीकरणासाठी शिक्षणाची असलेली निकड त्यांनी ओळखली आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध शाळा लोणी आणि पंचक्रोशीमध्ये त्यांनी उभारल्या. त्यांना स्वतःला औपचारिक शिक्षणही भेटलेले नसताना त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणेसाठी शिक्षण हीच गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी ओळखले. त्यातूनच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना इंग्लिश मेडीयम स्कूलने झाली. प्रवरा पब्लिक स्कूल आणि प्रवरा कन्या विद्यामंदिर जोम धरत असतानाच पद्मश्रींनी आजूबाजूच्या ४० खेड्यांमध्ये मराठी शाळा सुरू केल्या.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटीलांनी लावलेल्या रोपट्याचे पुढे मा.खा.बाळासाहेब विखे पाटील यांनी विशाल वटवृक्षात रूपांतर केले. आत्ता प्रवरा शिक्षण संस्थेच्या छत्राखाली वेगवेगळी ११ तंत्रशिक्षण महाविद्यालये, ६ सिनियर महाविद्यालये, ६ इंग्लिश मध्यम शाळा आणि ३२ मराठी मध्यम शाळा ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. आज प्रवरेच्या विविध शाखांमध्ये जवळपास ४०००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
प्रवरा शिक्षण संस्थेमध्ये बालवाडी पासून पीएच.डी. पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. महिला शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार करून पद्मश्रींनी फक्त मुलींसाठी निवासी शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. आज प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासोबत इंजिनीरिंग, फार्मसी, वास्तुशास्त्र, मेडिकल, नर्सिंग, व्यवस्थापन, औद्योगिक प्रशिक्षण इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
डॉ. अशोकराव विखे पाटील हे प्रवरा संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष असून त्यांनी संस्थेची धुरा समर्थपणे पेलली आहे.