प्रमस्तिष्क घात
प्रमस्तिष्क घात किंवा मेंदूचा पक्षाघात किंवा सेरेब्रल पाल्सी[१] हा एक लहान मुलांमध्ये जन्मताच आढळून येणारा आजार आहे. यामध्ये बऱ्याचदा हालचालीत अयोग्य समन्वय, कडक स्नायू, कमकुवत स्नायू आणि कापरे भरणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या आजारामुळे व्यक्तीच्या हालचालींवर मर्यादा येतात. सेरेब्रल पाल्सीचा शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे होतो - सेरेब्रल म्हणजे प्रमस्तिष्क (मेंदूशी संबंधित) आणि पाल्सी म्हणजे पक्षाघात (अर्धांगवायू).[२]
कारणे
सेरेब्रल पाल्सी हा मेंदूच्या हालचाली, संतुलन आणि मुद्रा नियंत्रित करणाऱ्या भागांच्या असामान्य विकासामुळे किंवा मेंदूला झालेल्या इजेमुळे होतो. बहुतेकदा, गर्भधारणेदरम्यान उद्भवलेल्या समस्यांमुळे हा आजार निर्माण होतो. ज्यात अनेकदा निश्चित कारण माहीत होत नाही, परंतु यातील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात - मुदतपूर्व जन्म, जुळे जन्माला येणे, जन्माच्यावेळी बाळाचे वजन कमी असणे, जन्मतःच बाळाने नीट श्वास न घेणे, उशिरा रडणे, गर्भधारणेदरम्यान काही संसर्ग जसे की टॉक्सोप्लाज्मोसिस किंवा रुबेला, गर्भधारणेदरम्यान मिथाइल मर्क्युरीचा संसर्ग, कठीण प्रसूती, गर्भारपणात घेतलेली औषधे आणि बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांमध्ये डोक्याला दुखापत होणे इत्यादी. सुमारे २% प्रकरणात अनुवांशिक कारण देखील असल्याचे मानले जाते. याशिवाय प्राणवायूची कमतरता, कावीळ तसेच मेंदूत जमा झालेले पाणी यापैकी काही कारणे देखील असू शकतात.[२]
आजाराची लक्षणे
जन्मतःच बाळाने नीट श्वास न घेणे, उशिरा रडणे, शरीर आखडणे किंवा एकदम ढिले पडणे ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत[२]
प्रभाव
मेंदूच्या ज्या भागावर परिणाम होतो, त्यानुसार रुग्णाची आकलनक्षमता, शिकणे, बोलणे आणि संवाद साधणे, श्रवण क्षमता, अन्न गिळणे, बुद्धी, स्वभाव, संवेदना, तसेच दृष्टीवरील परिणाम अशा प्रकारचे दोष निर्माण होतात. बऱ्याचदा, सेरेब्रल पाल्सी असलेली बाळे त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे लवकर लोळत, बसत, रांगत किंवा चालत नाही. इतर लक्षणांमध्ये झटके येणे आणि विचार किंवा तर्क करण्याच्या समस्या यांचा समावेश होतो, जे प्रत्येक प्रमस्तिष्क घात असलेल्या सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये आढळतात. आयुष्याच्या पहिल्या काही वर्षांत लक्षणे अधिक ठळक दिसू शकतात, परंतु अंतर्निहित समस्या कालांतराने वाढत नाहीत.[३]
उपचार
रुग्णाच्या प्राथमिक लक्षणांव्यतिरिक्त एमआरआय, सीटी स्कॅन, ईजीसी इत्यादी तपासणी करून आजाराचे निदान आणि तीव्रता तपासली जाते. योग्य प्रकारच्या औषधी, शल्य चिकित्सा तसेच पुनर्वसन इत्यादी द्वारे आजारावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय जलोपचार, स्वभावोपचार, स्टेम सेल थेरपी, समुपदेशन आणि व्यायाम इत्यादी अनेक विविध प्रकारच्या उपचारांचा देखील चांगला परिणाम होतो.[४]
जागतिक स्तरावर
जगात दरवर्षी अंदाजे तीन हजार मुलांमागे तीन मुले या आजाराने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ ऑक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन (World Cerebral Palsy Day) पाळला जातो.[३]
संदर्भ
- ^ "प्रमस्तिष्क-घात". shabdakosh.marathi.gov.in. 2021-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b c "सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय?". महाराष्ट्र टाइम्स. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ a b "सेरेब्रल पाल्सी आजारग्रस्ताना आशेचा किरण..." झी न्युज. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "सेरेब्रल पाल्सीचे उपचार". महाराष्ट्र टाइम्स. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.