Jump to content

प्रकाश नारायण संत

प्रकाश संत
जन्म नाव प्रकाश नारायण संत (दत्तक नाव : भालचंद्र गोपाल दीक्षित)
जन्मजून १६, १९३७
मृत्यूजुलै १५, २००३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र कथाकार
साहित्य प्रकार कथा
प्रसिद्ध साहित्यकृती वनवास
वडीलनारायण संत
आईइंदिरा संत
पत्नी डॉ सुप्रिया दीक्षित
अपत्ये

मुलगा : डॉ अनिरुद्ध दीक्षित

मुलगी: डॉ उमा दीक्षित
पुरस्कार महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, मुंबई

प्रकाश नारायण संत (जन्म : जून १६,१९३७ - - जुलै १५,२००३) हे मराठीतील एक नामवंत कथाकार होते. 'लंपन' या लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या अर्ध-आत्मचरित्रात्मक (Semi-Autobiographical) कथा मराठी कथाविश्वातील उत्तम रचना मानल्या जातात.

अल्प चरित्र

प्रकाश संत यांचा जन्म १६ जून १९३७ रोजी बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील नारायण संत हे उत्तम ललितलेखक होते आणि आई इंदिरा संत या श्रेष्ठ कवयित्री होत्या. घरातील सुसंस्कृत व साहित्यिक वातावरणाचा प्रकाश संतांवर फार मोठा परिणाम झाला. मात्र ते १० वर्षाचे असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून भूरचनाशास्त्रात बी.एस्‌सी. केल्यानंतर संतांनी पुणे विद्यापीठातून याच शास्त्रात एम.एस्‌सी. व पीएच.डी. केले. यानंतर ते कऱ्हाड येथील 'यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स'मध्ये सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) [मराठी शब्द सुचवा] म्हणून १९६१ साली रुजू झाले. १९९७ साली ते निवृत्त झाले. दुर्दैवाने १५ जुलै, २००३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले.

लेखन

प्रकाश संत यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात केली. विशीत असतांनाच ते कथा लिहू लागले. सत्यकथा सारख्या दर्जेदार मासिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या होत्या व त्यांना मान्यवरांची दादही मिळाली होती. मात्र १९६३ साली त्यांनी आपले लेखन अचानक थांबविले. अनेक वर्षांनंतर १९९० साली त्यांनी परत कथालेखनास सुरुवात केली व हे लेखन त्यांच्या मृत्यूपर्यंत अविरत चालू होते. 'लंपन'च्या आयुष्यातील तरुणपणाच्या दिवसांवर एक कादंबरी लिहिण्याचा संकल्प त्यांनी केला होता. पण तो पूर्ण होऊ शकला नाही. त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा कथासंग्रह झुंबर प्रकाशित झाला. प्रकाश संत हे उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती.

प्रकाशित पुस्तके

क्र. पुस्तकाचे नाव प्रकाशक वर्ष पुरस्कार
चांदण्याचा रस्ता (ललित निबंधसंग्रहमौज प्रकाशन-
झुंबरमौज प्रकाशन२००४-
पंखामौज प्रकाशन२००१इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार
वनवासमौज प्रकाशन१९९४श्री. दा. पानवलकर पुरस्कार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
ग्रंथोत्तेजक पुरस्कार, इचलकरंजी
अ. वा. वर्टी पुरस्कार, नाशिक
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, मुंबई
शारदा संगीतमौज प्रकाशन१९९७महाराष्ट्र राज्य पुरस्कार

इतर

  • शारदा संगीत या कथेस नवी दिल्ली येथील 'कथा पुरस्कार' (१९९४)
  • आदम या कथेस 'शांताराम पुरस्कार' (१९९३)
  • सुप्रिया दीक्षित (माहेरच्या सुधा ओलकर) या प्रकाश संत यांच्या पत्‍नी. पतीच्या सहवासात घालविलेल्या साठेक वर्षांचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्‍न त्यांनी आपल्या 'अमलताश' या आत्मकथनामध्ये केला आहे. अमलताश या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण वाङ्‌मय पुरस्कारांमध्ये आत्मचरित्रासाठी दिला जाणारा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार मिळाला आहे. (२०१४). पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये आणि मानपत्र असे आहे.