Jump to content

पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती

पोटॅशिअम अर्गोन कालमापन पद्धती (इंग्लिश: K–Ar dating, पोटॅशिअम अर्गोन डेटिंग ) ही जे. एफ. एव्हर्णडेन आणि जी. एच. कर्टिस यांनी इ.स. १९६१ मध्ये शोधून काढली. या पद्धतीत कालमापनाचा आवाका खूप मोठा असतो. अडिच हजार ते चार अब्ज वर्षे इतके जुने अवशेष या पद्धतीने कालमापीत करता येतात. पोटॅशिअम अर्गोन पद्धतीत पोटॅशिअम ४०K या घटकाचे अर्धे आयुष्य १.३ अब्ज + ४० दशलक्ष वर्ष इतके प्रचंड आहे.
पृथ्वीच्या कवचात पोटॅशिअम (K) हा घटक फार मोठ्या प्रमाणावर आढळतो. हाच घटक जवळजवळ प्रत्येक खनिजात आढळतो. याचे विघटन झाल्यावर त्यातून अर्गोन ४० हा वायू तयार होतो. याचे संक्षिप्त रूप ४० Ar असे मांडतात. खडकाच्या घडणीत हा अर्गोन ४० नाहिसा होतो. खडकाची घडण पूर्ण झाल्यावर ४०Kचे विघटन चालू राहते. ही विघटन क्रिया चालू असताना अर्गोन ४०ची निर्मिती होत असते. या अर्गोन ४० चे मापन करून त्या खडकाचा काळ मोजता येतो. या पद्धतीने प्राचीन खडकाचे कालमापन करता येते. त्यामुळे या पद्धतीचा उपयोग भूविज्ञानशास्त्राला जास्त होतो. पुरातत्त्वशास्त्रात प्रागैतिहासिक, पाषाणयुगीन हत्यारांचा काळ ठरविण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. मात्र हा काळ हत्यारांच्या बनावटित वापरलेल्या दगडांचा ठरतो.