पेलिकन
पेलिकन (Pelecanidae) हे पेलिकन नावाच्या एका पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत झोळीवाला म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेऱ्यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.
झोळीवाले समुद्रकिनारी किंवा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनाऱ्यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी समुदायाने बांधतात.पेलिकन बहुतेक वेळा पाण्याचा तळ्यामध्ये,दबकड्यांमध्ये व नदीच्या आवारातच थांबणे पसंत करतात.चोची सोबत त्यांचे पायसुद्धा मजबूत असतात ज्याने ते पाण्यामध्ये लांबपर्यंत चालतात व आपले भक्ष्य मजबूत पाय पंज्याने जखडतात.
भुरकट पाणकोळी गिधाडापेक्षा मोठा असतो. त्याच्या शरीराची लांबी १२५–१५२ सेंमी. व वजन ४–६ किग्रॅ. असते. रंग प्रामुख्याने पांढरा असून शरीरावर राखाडी पिसे असतात. पाय आखूड व बळकट असून बोटे पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. या पायांनी ते उत्तम पोहू शकतात. उड्डाण पिसे काळसर तपकिरी आणि भुरकट तपकिरी असून शेपटीत २०–४० पिसे असतात. चोच मोठी, चपटी आणि पिवळसर असते. वरच्या चोचीच्या अर्ध्या भागावर निळसर काळसर ठिपके आणि टोकाला आकडी असते. खालच्या चोचीच्या तळाशी पिवळ्या किंवा जांभळ्या रंगाची झोळी लोंबत असते. या झोळीमुळेच पाणकोळी सहज ओळखता येतो. नर आणि मादी दिसायला सारखे असले, तरी नर आकाराने मोठा असतो.
पाणकोळी समूहप्रिय पक्षी असून तलाव, नदीमुखाचा प्रदेश, त्रिभुज प्रदेश व खाजण अशा ठिकाणी राहतात. मासे हे त्यांचे प्रमुख अन्न असले, तरी ते लहान उभयचर प्राणी, कवचधारी प्राणी व क्वचित प्रसंगी लहान पक्षीसुद्धा खातात. पाणकोळी समूहाने मासे पकडतात. पाण्यावर अर्धगोल करून पंख आपटत ते माशांना उथळ पाण्याकडे हाकलतात आणि सर्वजण मान खाली घालून चोचीखालील पिशवीमध्ये मासे भरून घेतात. पाण्याबाहेर येऊन चोचीतून पाणी बाहेर टाकतात आणि मासे गिळतात.
चित्रदालन
- पेलिकन पक्षी